मंगळवार दि.१४ आक्टोंबर २०२५


सुटलो बाबा…
जिल्हा परिषद इच्छुकांनी सोडला सुटकेचा निश्वास…
दोन्ही मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेली साडेतीन वर्षे प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. काल सोमवारी जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर झालेल्या आरक्षणात उत्तर सह पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ खुल्या प्रवर्गाकरिता जाहीर झाल्याने इच्छुक मंडळी सुखावली असून राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.
मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक जण गेली कित्येक वर्षे धडपडत आहेत. काहींना आरक्षणामुळे तर काहींना नशिबाने साथ न दिल्याने जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार झालेले नाही. यावेळी मात्र इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागली आहेत. तालुक्यातील एक जिल्हा परिषद मतदार संघ कमी झाला आहे. उर्वरित दोन मतदारसंघाची भौगोलिक रचना वाढली असली तरीही इच्छुकांची संख्या कमी झालेली नाही.
एकीकडे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ खुले झाले असताना दुसरीकडे पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. पंचायत समिती मतदार संघ निहाय जाहीर आरक्षणामध्ये बांधवंत पंचायत समिती मतदार संघ हा नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरिता आरक्षित जाहीर झाला आहे. तर पेरणोली मतदार संघ सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. उत्तूर,वाटंगी पंचायत समिती मतदार संघ मात्र सर्वसाधारण प्रवर्गाकडे राहिले आहेत.
नगरसेवकातून नगराध्यक्ष…?
दावेदार लागले प्रभागांच्या शोधात

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये काल सोमवारी सकाळपासून नगराध्यक्ष निवडीचे निकष बदलणार असून नगरसेवकांमधूनच नगराध्यक्ष निवडला जाणार अशी चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी या चर्चेची शहानिशा करण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असणाऱ्या मंडळींनी सुरक्षित मतदारसंघाची/प्रभागाची चाचपणीही सुरू केली आहे.
प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी थेट नगराध्यक्ष पदावर दावा केला. काल सोमवारी सकाळपासून अचानकपणे नगरसेवकातून नगराध्यक्ष केला जाणार अशी चर्चा सुरू झाली. जिल्हास्तरीय जबाबदार अशा ज्येष्ठ नेत्याने याबाबत आपल्या कार्यकर्त्यांना कल्पना देऊन सुरक्षित मतदारसंघ शोधण्याविषयी सूचना केल्याने या चर्चेत अधिकच भर पडली आहे.
येत्या दोन दिवसात याबाबत आदेश पारित होण्याची शक्यताही संबंधित नेत्याने वर्तवल्याने ही शक्यता गृहीत धरून अनेकांची धावपळ सुरू झाली आहे. असे झालेच तर प्रभागातील अनेक इच्छुकांना नेतेमंडळींच्या घुसखोरीने रिंगणाबाहेर जावे लागणार आहे.

मतदार याद्यांवर हरकतीचा पाऊस…
ढिगाने हरकती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या निवडणूक मतदार याद्यांमध्ये सोयीनुसार अनेकांनी अक्षरशः शेकडो नावे घुसडली असून तब्बल १८०० च्या वर हरकती दाखल झाल्या आहेत. अनेकांची अपेक्षित आरक्षण न झाल्याने राजकीय गोची झाली असून मतदारसंघ बदलून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्यांनी आता आजूबाजूच्या प्रभागातील मतदार आपल्या संभाव्य मतदारसंघात आणण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत.
काल दिवसभर अनेकांनी नगरपंचायत कार्यालयात तळ ठोकला होता. एक यंत्रणाच नावे कमी करण्याकरता हरकती घेणे व नावे प्रभाग बदलून घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पुरवणे याकरिता राबवण्यात येत असल्याचे दिसत होते.
एकंदर या हरकतींची संख्या पाहता नगरपंचायत प्रशासनाने १७ तारखेपर्यंत मुदत वाढ दिली आहे.
अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

आमचा अंत पाहू नका…
वन्य प्राण्यांनी त्रस्त घाटकरवाडीकरांचे आंदोलन सुरू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साहेब वन्य प्राण्यांच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत. गवे, हत्ती, वानरे,रानडुकरे, यांच्यासाठीच आम्ही शेती करायची का? नुकसानीची मिळणारी तुटपुजी मदत, वारंवार मागणी करूनही या प्राण्यांचा होत नसलेला बंदोबस्त यामुळे आम्ही अक्षरशः संपलो आहोत. आमची शेती तुमच्या ताब्यात घ्या आणि तुम्हीच कसा. आता आमची शेती करण्याची आर्थिक कुवत राहिलेली नाही आम्ही संपलो आहोत अशा शब्दात वन अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडत घाटकरवाडी पंचक्रोशीतील तालुका वासियांनी काल सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घाटकरवाडी,अंबाडे , लिंगवाडी, किटवडे, सुळेरान येथील नागरिक मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रात उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या विनंतीनंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. आंदोलन स्थळी सभा पार पडली. सभेमध्ये आजरा कारखान्याचे संचालक गोविंद पाटील, संग्राम पाटील, आर.डी. सावंत, सुभाष पाटील, नितीन पाटील, प्रकाश मोरुस्कर आदींनी मार्गदर्शन केले. मोर्चाचे हत्यार उपसल्याशिवाय वन विभागाला जाग येत नाही का? असा सवाल ही यावेळी करण्यात आला. वनविभागाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी विलास काळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यातून अंतिम निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.
आंदोलन सुरुवात प्रसंगी किटवडे सरपंच लहू वाकर, धनगर मोळा सरपंच सौ. पाटील, उमेश पाटील, सागर पाटील, देवदास प्रभू ,सहदेव प्रभू, बाबुराव पाटील, जयवंत पाटील, सुरेश पाटील, गोपाळ पाटील, चंद्रकांत मटकर,देवदास सूर्यवंशी, दीपक खरूडे, चंद्रकांत मटकर, नितीन पाटील, यांच्यासह भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरपीआय गवई गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे,ता. आजारा येथे आरपीआयचा (गवई गट) संवाद मिळावा पार पडला. मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे होते.
उपस्थितांचे स्वागत आजरा सुतगिरणीची संचालक शशिकांत सावंत यांनी केले. दलित मित्र पी.एस. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास आर. एस. कांबळे, बबन कांबळे, सुभाष कांबळे, विष्णू कांबळे, महेश कांबळे, मोहन कांबळे, बाबुराव होन्याळकर,शशिकांत सावंत, दीपक जमणे, सुभाष तेंडुलकर, अविनाश कांबळे, भीमराव जोशीलकर, तानाजी कांबळे,अण्णा तेंडुलकर, शिवराम कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिंगणापूर येथे झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील मुलींनी तृतीय क्रमांक पटकाविला. यामध्ये श्रुती परीट, रिया जाधव, प्रतीक्षा सुतार, समीक्षा पाटील, पायल कोकितकर, अनामिका नार्वेकर, स्नेहल इलगे, सुहाना हिंग्लजकर, श्रावणी चाळके, वैभवी कांबळे, खुशी कासार, प्रियांका तेजम यांचा समावेश होता. यामधून रिया जाधव व श्रुती परीट या खेळाडूंची विभागीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, उपाध्यक्ष विलासराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे ,सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सादळे व उपप्राचार्य श्री. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक श्री. मनोजकुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक श्री. अल्बर्ट फर्नांडिस व डॉ. धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


