मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४

पुन्हा वाघाचा हल्ला…
दोन जनावरे ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पट्टेरी वाघाची दहशत कायम असून आवंडी धनगर वाडा क्रमांक दोन येथून जवळच असणाऱ्या गवसे
वनक्षेत्राच्या हद्दीत पुन्हा वाघाच्या हल्ल्यामध्ये दोन पाळीव रेडे ठार झाले आहेत. एक रेडा खाऊन फस्त केला तर दुसरा मृतावस्थेत आढळला आहे. यामध्ये रामू बमू गावडे कान्हू विठू शेळके यांच्या पाळीव रेड्यांचा समावेश आहे. घटनास्थळी वाघाच्या पायाचे ठसे सापडले असल्याचे वन विभागाने सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी वाघांच्या हल्ल्यामध्ये किटवडे येथील बचाराम विष्णू चव्हाण मधुकर पांडुरंग राणे व सूळेरान येथील रघुनाथ भाऊ पाटील यांची एकूण तीन जनावरे मृत्युमुखी पडली होती. हे हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.
वाघांचे अस्तित्व यापूर्वीच सिद्ध झाल्याने जंगलाशेजारी राहणाऱ्या शेतकरी वर्गाने दक्षतेची काळजी घ्यावी असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी यांनी केले आहे.

परभणी घटनेच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा…
सरकारचा निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केलेल्या घटनेसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे आंबेडकरवादी संघटना, सेक्युलर मुव्हमेंट, रिपब्लिकन सेना, सर्व श्रमिक संघटना, दलित मानवी हक्क संघटना, वंचित बहुजन युवा आघाडी,भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन महिला आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुक्ती संघर्ष समिती यासह विविध संघटनांच्या वतीने आजरा तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजरा येथील कुतिन्हो बंधूंना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह निषेध करण्यात आला.
मुख्य बाजारपेठेतून मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहाण करून झालेल्या मृत्यू बाबत संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा पुन्हा नोंद करण्याबरोबरच संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी डॉ . नवनाथ शिंदे, अजय देशमुख, विजय सरतापे, प्रवीण कश्यप, संग्राम सावंत, रूपाली कांबळे, शांताराम पाटील, शशिकांत सावंत, डॉ. उल्हास त्रीरत्ने दत्तात्रय उर्फ डि.के. कांबळे, काशिनाथ मोरे, व्ही.डी. जाधव, ओवी देशमुख, शिवाजी सम्राट, समीर खेडेकर आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
मोर्चामध्ये रवी भाटले, किरण कांबळे,संतोष मासोळे, एस. पी. कांबळे माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, मंगल कांबळे, सुवर्णा कांबळे, सुनीता कांबळे, स्मिता कांबळे, फुलाताई कांबळे, गौतम कांबळे, विश्वास कांबळे, मारुती देशमुख, नारायण भडांगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अशोक पाटील यांचे निधन

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड येथील महसूल नायब तहसीलदार अशोक कामण्णा पाटील (वय ५४ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने रविवारी रात्री निधन झाले.
पाटील हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मुळगाव हलकर्णी ता.गडहिंग्लज असणाऱ्या पाटील यांनी आजरा, गडहिंग्लज, शिरूर येथे महसूल विभागात नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. सध्या ते चंदगड येथे कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आजरा साखर कारखान्याची रू. ३१००/- प्रमाणे ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आज अखेर १,३३,४५० मे. टन उसाचे गाळप झाले. कारखान्याकडे दि.१७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन ३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री.वसंतराव धुरे यांनी दिली.
कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षवातील ऊस आणून ऊस उत्पादकाना दिलासा दिला जाणार आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेला ऊस वेळेत गाळपास आणण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. सध्या कार्यक्षेतील हत्ती, गवे इत्यादी जंगली प्राण्यांनी नासधूस केलेल्या ऊसाच्या तोडणीस प्राधान्य दिले जात आहे. सदर बाधीत क्षेत्र आटोक्यात येताच ज्या गावात यंत्रणा नाही किंवा अपुरी आहे तेथे प्राधान्याने यंत्रणा लावून ऊस उचल करीत आहोत स्थामुळे कार्यक्षेशातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न गावचा थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री वसंतराव धुरे यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष एम. के. देसाई यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

निधन वार्ता
अशोक पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरोळी ता. आजरा येथील अशोक रामचंद्र पाटील ( वय ७१ वर्षे) यांचे निधन झाले. ते मुंबई महानगरपालिका येथून सुरक्षा अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. मुंबई ग्रामस्थ मंडळ, सरोळीचे अध्यक्ष तर सरोळी येथे नव्याने स्थापन झालेल्या भावेश्वरी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,भाऊ , सुना, नातवंडे असा परिवार आहे.
उत्तरकार्य रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी सरोळी येथील घरी आहे






