mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  दि. १ जानेवारी २०२५    

टेहळणी पथके पार्ट्या रोखण्यासाठी जंगलात गेली

वाघाच्या डरकाळ्या ऐकून निघून आली

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी वनक्षेत्रामध्ये तरुणाईकडून आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आजरा वनविभागाच्या वतीने निरीक्षण ठेवण्याकरता टेहळणी पथके तैनात करण्यात आली होती. यातील एक पथक किटवडे येथील तळीवर गेले असता तेथे वाघाच्या डरकाळ्या ऐकून पथक माघारी परतले.

     दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर पथक वनक्षेत्रामध्ये गेले होते. अचानकपणे वाघाच्या डरकाळ्या ऐकून येऊ लागल्यामुळे टेहळणी पथकाने माघारी परतणे पसंत केले. या परिसरामध्ये गेले पंधरा दिवस पट्टेरी वाघाचा वावर आहे. दोन वाघ असल्याची शक्यता वनविभागातून व्यक्त केली जात होती परंतु आता तिसरा वाघही असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. जंगलामध्ये ठिकठिकाणी मृतावस्थेत व खाल्लेल्या स्थितीत आढळणारे वन्यप्राणी वाघाचे अस्तित्व अधोरेखित करीत आहेत.

भारत बंदला आजऱ्यात प्रतिसाद


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आजरा शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

      ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे, गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेले वक्तव्य, परभणीत संविधानाची विटंबना झालेली घटना व सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या, मराठा आरक्षण अशा विषयांच्या पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता.

       दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंद कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

स्मार्ट व प्रीपेड मीटर विरोधातील मोर्चात हजारहून अधिक आंदोलन सहभागी होणार …
आजरा येथील  बैठकीत निर्धार…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      अदानी उद्योग समुहाला स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका देऊन गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा बंद करण्यासाठी सोमवार दि. ६ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा निर्धार आज जनता बँकेच्या सभागृहात बोलावलेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते.

      वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्यातील वीज ग्राहकांचा मोर्चा निघणार असून हा मोर्चा मोठ्या संख्येने सहभाग घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार आज करण्यात आला.

      यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा ठेका अदानीला देऊन गोरगरिबांना लुटण्याचा जणू परवानाच सरकारने अदानीला दिला आहे. एका बाजूला वीज ग्राहकांची लूट आणि दुसऱ्या बाजूला वीज कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कु-हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही लढाई मोठ्या भांडवलदारासोबत असून ती आपल्याला नेटाने लढवावी लागेल. याविरोधात एक वादळ उठवावे लागेल, ते वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घोंगवेल.

      अल्बर्ट डिसोझा म्हणाले, आता रस्त्यावर उतरावे लागेल प्रत्येकाने जबाबदारी घेऊन घरोघरी जाऊन याचे गांभीर्य सांगावे जास्तीतजास्त माणसे कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत.

      यावेळी कॉ. शांताराम पाटील, तानाजी देसाई, कॉ. संजय तरडेकर, युवराज पोवार, समीर चांद, दत्ता कांबळे,डॉ. रोहन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.प्रकाश मोरुस्कर, नामदेव फगरे, दत्ता पाटील यांनीही सूचना मांडल्या.

      यावेळी रशीद पठाण, मारुती पाटील, मायकेल बारदेस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

      रवींद्र भाटले यांनी आभार मानले.

बुरूडे-भटवाडीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारूती देशमुख

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         बुरूडे – भटवाडीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारूती देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी धोडिंबा रेडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच वैशाली गुरव, उपसरपंच संजय कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक केसरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना आदरांजली…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     माजी पंतप्रधान व प्रसिध्द अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांना शोकसभा घेऊन आजरा येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

      कॉ. शांताराम पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. आजरा पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा अध्यक्षस्थानी होते. या वेळी चित्री नदीत बुडून मरण पावलेले ख्रिश्चन समाजातील कृतिन्हो बंधू यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली.

      कॉ. संपत देसाई म्हणाले, शालीन, सुसंस्कृत, अभ्यासू असे माजी पंतप्रधान डॉ .मनमोहन सिंग होते. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबत ठाम भूमिका घेतली. त्यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणाबाबत आमचे मतभेद आहेत. पण त्याची देशहिताची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. डिसोझा म्हणाले, सिंग हे मितभाषी होते. त्यानी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर दिला. त्यांनी घेतलेली धोरणे आजही देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल त्यांनी ठाम भूमिका घेतली. शेती व शेतकन्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष युवराज पोवार, समीर चाँद,रोहन जाधव, शांताराम पाटील, कॉ, संजय तर्डेकर, रणजित कालेकर, दत्ता कांबळे यानी मनोगत व्यक्त केली. या वेळी आजरा कारखाना संचालक रशिद पठाण, नौशाद बुड्डेखान, दत्ता पाटील, मारुती पाटील, प्रकाश मोरूस्कर याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

       रवी भाटले यांनी आभार मानले.

निधन वार्ता
विष्णू सुतार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सुतार गल्ली, आजरा येथील आजरा अर्बन बँकेचे माजी संचालक विष्णू चिटू सुतार (वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे.

शिवानंद बिडकर

     गांधीनगर, आजरा येथील सराफ व्यावसायिक शिवानंद शिवपुत्र बिडकर ( वय ४६ वर्षे )यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मडिलगे येथे हत्तीचा धिंगाणा…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!