
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : सौ. सरिता गावडे
(प्रभाग क्र.१७)

प्रभाग क्रमांक १७ मध्ये रस्ता गटर्ससह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. हाकेच्या अंतरावर आजरा ग्रामीण रुग्णालय तर दुसरीकडे प्रभागातच कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी असा विचित्र प्रकार सध्या प्रभागवासीय अनुभवत आहेत. वारंवार मागणी करूनही याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांसाठी चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण यासाठी विशेष काम करण्याची आपली इच्छा असल्याने आपण या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत व आपला विजय निश्चित आहे असे प्रतिपादन प्रभाग १७ मधील आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सरिता अमोल गावडे यांनी व्यक्त केला.
प्रभागाची रचना लक्षात घेता विकास कामे करण्याकरता या प्रभागात मोठी संधी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना उबाठा पक्षाच्या नेते मंडळींनी आपणाला उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाच्या जोरावर व प्रभागातील मतदारांच्या बळावर या निवडणुकीला मी सामोरे जात आहे.
या प्रभागामध्ये सर्व धर्मीय नागरिक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. शेती व अलीकडेच उभारण्यात आलेल्या काजू प्रक्रिया प्रकल्पांशिवाय इतरत्र रोजगाराची संधी सध्या तरी उपलब्ध नाही. ती उपलब्ध करून देण्यासाठी आपला नेहमी प्रयत्न राहील.
पती अमोल गावडे यांची प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे धडाडीचे कार्यकर्ते व उद्योजक अशी प्रभागातील नागरिकांना ओळख आहे. २४ तास उपलब्ध असणारे आपले कुटुंब आहे. मुळात आपणच कष्टकरी असल्यामुळे कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची आपणाला चांगली जाण आहे. स्वच्छ सुंदर प्रभाग बनवणे हे स्वप्न घेऊन आपण निवडणूक रिंगणात उभी असून मतदारांच्या पाठबळावर निश्चितच आपण यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





