कारखान्याची निवडणूक दणक्यात होणार…
आजरा साखर कारखाना वार्षिक सभेत गोंधळ…

समोर असणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडसाद आज आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. संचालक मंडळात असणारा बेबनाव आरोप – प्रत्यारोप व गोंधळामुळे आज सभासदांसमोर आला. व्यासपीठावरून संचालकांनीच एकमेकावर आरोप केल्याने येती पंचवार्षिक निवडणूक दणक्यात होणार हेही स्पष्ट झाले. तर सदर सभा गुंडाळल्याचा आरोप काही सभासदांनी केला आहे. सभेत कारखान्याला संस्थापक अध्यक्ष स्व.वसंतराव देसाई यांचे तर परिसराला स्व. अमृतकाका देसाई यांचे नाव देण्याचा ठराव स्व.वसंतराव देसाई यांच्या कन्यांच्या साक्षीने मंजूर करण्यात आला.
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रा.सुनील शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये तज्ञ संचालक तानाजी देसाई यांनीच सभेसमोर ठेवलेला अहवाल बोगस असल्याचा आरोप केल्याने अध्यक्ष प्रा.शिंत्रे समर्थक सभासद व तानाजी देसाई यांच्यात मोठी शाब्दिक चकमक उडाली. तुम्ही संचालक असताना असे आरोप करणे योग्य आहे का असं सवाल यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी देसाई यांना उद्देशून केला. त्यामुळे सभेत मोठा गोंधळ उडाला.
यावेळी अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, बंद असलेला कारखाना पुन्हा सुरु केला. ३७ कोटी ४० लाख रुपयांची जुनी देणी कारखान्याने दिली. शेजारील कारखान्यांची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. आजरा मात्र सहकार तत्वावर चालवला जात आहे. ऑक्टोबरमध्ये गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखाना सज्ज आहे. देशांतर्गत साखर विक्री सुरू आहे. विक्रीसाठी मर्यादा असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. इथेनॉल व डिस्टलरी प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी विषय वाचन केले. स्वाभिमानीचे इंद्रजीत देसाई यांनी शेतकऱ्यांची १२ कोटी देय रक्कम ताळेबंदात नसल्याने ती रक्कम देण्याची मागणी केली. देय १२ कोटीचा मुद्दा ठरावात घेण्याची मागणी कॉ. संपत देसाई यांनी केली. कारखान्याचे कर्ज कमी करून संस्थापक अध्यक्ष वसंतराव देसाई यांचे कारखान्याला नाव देण्याची मागणी सभासद सुनील शिंदे व हरिबा कांबळे यांनी केली. कॉ. शांताराम पाटील यांनी सभासदांना साखर देण्याची मागणी केली. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई,उपाध्यक्ष गणपतराव सांगले, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील,माजी सभापती उदयराज पवार, मुकुंद तानवडे, मधुकर यलगार, विजयकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक देसाई, शिवसेना तालुका अध्यक्ष युवराज पोवार, अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी,श्रीमती अंजनाताई रेडेकर, विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे,जनार्दन टोपले, एम.के. देसाई, राजेंद्रसिंह सावंत, दशरथ अमृते, विलास नाईक, अनिल फडके, दिगंबर देसाई, मलिककुमार बुरूड, राजू होलम,सौ.सुनीता रेडेकर, रणजीत देसाई, संजय सावंत इत्यादीसह सभासद,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत मुकुंदराव देसाई यांनी केले. आभार उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी मानले.
तोटा असतानाही नफ्याचा ताळेबंद सभासदांसमोर : तानाजी देसाई यांचा आरोप
आज आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसमोर अध्यक्षांनी सादर केलेला कारखान्याचा एक कोटी नफ्याचा अहवाल बोगस, बनावट व सभासदांची फसवणूक करणार आहे. संस्थेला आर्थिक वर्षात १९ कोटी ५५ लाख रुपये तोटा झालेला आहे ही वस्तुस्थिती आपण मांडली आहे. ती वास्तव व खरी आहे त्याचा खुलासा त्यांनी सभेत करायला हवा होता पण आपल्या समर्थकांकरवी आपणाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला. संचालक मंडळाच्या सभेमध्ये आपण खोट्या नफ्याला विरोध केला पण आपले मत विचारात घेतले गेले नाही.सभासदांना विश्वासात घेऊन कारखान्याचा तोटा त्यांच्यासमोर मांडा अशी मी विनंती केली पण अध्यक्षांनी जुमानले नाही. कारखाना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक नफ्याचा ताळेबंद सादर केला असल्याचा आरोप कारखान्याची तज्ञ संचालक स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते तानाजी देसाई यांनी केला आहे.

सातच्या बातम्या…
…….
आजरा साखर कारखान्याची आज वार्षिक सभा
संचालक मंडळाची कसोटी

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवार दिनांक ३० रोजी दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळी होत आहे. एकीकडे पंचवार्षिक निवडणुकीचे नगारे वाजत असताना दुसरीकडे वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून संचालक मंडळाला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न कितपत यशस्वी होणार हे सभा झाल्यानंतर समोर येणार आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांचे नाव कारखान्याला देण्याबाबतचा महत्त्वाचा ठराव आज पारित होण्याची शक्यता आहे.
आजरा साखर कारखान्यामध्ये गेल्या सात वर्षात बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. कारखान्यावर कर्जाचा डोंगर असतानाही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. कारखान्यावरील दिवसेंदिवस वाढत असलेले कर्ज, शेअरसाठी १२५० रुपये प्रमाणे ऊस उत्पादकांच्या भरून घेतलेल्या रकमा व अद्यापही न मिळालेले सभासदत्व , ऊस तोडणी ओढणी यंत्रणेमध्ये अडकलेले पैसे, कारखाना संचालक मंडळातील संघर्ष या सर्व बाबींचे पडसाद आज होणाऱ्या वार्षिक सभेमध्ये उमटणार असल्याचे दिसते.
संचालक मंडळ ताकतीने या सभेला सामोरे जाणार की ही सभा गुंडाळणार याकडे सभासद व तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.
पावसाचा व्यत्यय
सकाळीच पावसाला जोरदार सुरुवात झाली असल्याने या सर्वसाधारण सभेत उपस्थित रहाताना सभासद वर्गाला पावसाचा व्यत्यय येणार आहे.यामुळे सभासदांची उपस्थिती रोडावण्याची शक्यता दिसत आहे.
स्व. वसंतराव देसाई यांचे नाव
आजरा साखर कारखान्याला संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांचे नाव द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. तसा विषयही विषय पत्रिकेत आहे. हा विषय मंजूर होण्याची शक्यता असली तरीही स्व. देसाई यांच्या ध्येय धोरणाप्रमाणे कारखाना चालू आहे का ? हा प्रश्न मात्र निश्चितच सभासदांसमोर आहे.
अध्यक्ष सभेला सामोरे…बाकीचे बघे…?
साखर कारखान्याची सभा सुरू असताना सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास अध्यक्षांच्या हातात माईक दिला जातो.त्यामुळे सभासदांच्या प्रश्नांचा व आपला काहीही संबंध नाही असे समजून वागणाऱ्या संचालकांनी किमान वर्षातून एकदा तरी आपले तोंड उघडावे अशी रास्त अपेक्षाही सभासदांकडून व्यक्त होते.

संक्षिप्त ;-
आजरा अर्बन बँकेचा गौरव…

कोल्हापूर जिल्हा बँक असोसिएशन कडून पाचशे कोटी वरील ठेवी गटात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक आजरा अर्बन बँकेस बँकेस मिळाला आहे.
जनता बँकेचा गौरव…

येथील जनता सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा बँक असोसिएशन कडून पाचशे कोटी रुपयांच्या ठेवी गटामध्ये विशेष कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे.

आज आज-यात…
ह.भ.प.पू. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहानिमित्त विठ्ठल मंदिर शिवाजीनगर आजरा येथे जागराचा कार्यक्रम…


