जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंपी-चराटी यांचे महाविकास आघाडी समोर कडवे आव्हान राहणार..
( … ज्योतिप्रसाद सावंत…)
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने पारंपरिक विरोधक असणारे अशोकअण्णा चराटी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी एकत्र आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधिर देसाई यांनी बाजी मारली. एकास एक झालेली लढत व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पुरवलेली रसद यामुळे सुधीर देसाई यांना विजयापर्यंत पोहोचता आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र ही समीकरणे चालतील असे दिसत नाही.
आजरा तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यामध्ये अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांचा गावागावात गट आहे. अण्णा-भाऊ संस्था समूहाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे तालुकाभर पसरले आहे. जयवंतराव शिंपी यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनीही आपले राजकीय अस्तित्व गावागावात टिकवून ठेवले आहे. प्राधान्याने तालुक्याच्या पश्चिम भागात जयवंतराव शिंपी यांना मानणारा मोठा गट आहे. मुळातच महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार की घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभा करून निवडणुकीमध्ये कौल आजमावण्याचा प्रयत्न केला तर याचा निश्चितच फायदा चराटी-शिंपी यांच्या उमेदवारांना होणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्ररचनेमध्ये आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मतदान हे पूर्णपणे बाजूला झाले आहे. राहता राहिला प्रश्न तो उर्वरित तालुक्याचा.उर्वरित तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे परंतु जर घटक पक्षानी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर मात्र राष्ट्रवादी अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी गेली पाच वर्षे मतदारसंघांची चांगलीच मशागत केली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अण्णा- भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी निश्चितच लागला आहे. या निवडणुकीत शिंपी यांच्या कांही कार्यकर्त्यांनी चराटी यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवत सुधीर देसाई यांना मदत केली होती. परंतु हे कार्यकर्ते भविष्यात जर शिंपी हे निवडणूक रिंगणात राहिले तर त्यांच्या पाठीशी राहुल मूळ प्रवाहात सामील होतील असेही दिसते. यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक यांची राजकीय समीकरणे ही वेगळी राहणार आहेत.
येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुका होणार असे गृहीत धरून इच्छुकांनी मतदार संघात आपला संपर्क वाढवून मतदारांच्या गाठीभेटीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेकरिता सौ. सुनिता रेडेकर,अनिरुद्ध रेडेकर विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, उमेश आपटे, संजय पाटील, जयवंतराव शिंपी, अशोकअण्णा चराटी, उदय पवार, जनार्दन टोपले, युवराज पोवार आदींची नावे पुढे येऊ लागली आहेत. तर पंचायत समितीकरीता इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास इच्छुकांच्या संख्येमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. परंतु सद्यस्थितीत विचार केल्यास चराटी-शिंपी यांची युती महाविकास आघाडीच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणार आहे हे नक्की…
दावा एका पक्षाचा… इच्छुक दुसऱ्या पक्षाचे
जिल्हा परिषदेच्या उत्तूर विभागावर विद्यमान सदस्य उमेश आपटे यांच्या मुळे राष्ट्रीय काँग्रेसचा दावा तर पश्चिम विभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहणार आहे. उत्तुर विभाग हा विधानसभेकरीता कागल मतदारसंघाला जोडला असल्याने मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहणार आहेत. पश्चिम भागामध्ये राष्ट्रवादीचा दावा राहणार असला तरी शिवसेना आपला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे. कोळींद्रे विभागात मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून आणण्याकरिता जोरदार प्रयत्न चालवले आहेत. येथे सध्या ताराराणी आघाडीच्या सौ.सुनीता रेडेकर या प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळीही त्यांची उमेदवारी निश्चित समजली जाते.









