

गाळयांबाबत चुकीचे घडले असल्यास संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत… अशोक चराटी
आजरा नगरपंचायत मासिक सभा
आजरा नगरपंचायतीच्या हद्दीमधील गाळे पाडण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जशी तत्परता दाखवली तशी खड्डे मुजवण्याबाबत दिसत नाही. उपलब्ध होत असलेल्या माहीतीप्रमाणे संबंधीत जागा ही आजरा नगरपंचायतीची आहे. मग बांधकाम विभागाने गाळे कसे पाडले याबाबत नगरपंचायत प्रशासनाने माहीती घ्यावी, हे जर चुकीचे घडले असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी केली. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले जातात. याबाबत नगरपंचायतीने संबंधीताकडून विशिष्ट रक्कमेची आकारणी करावी. कोणाचाही मुलाजमा ठेवू नये, असेही चराटी यांनी सांगीतले. रामतीर्थ पर्यटनस्थळाला ब वर्ग दर्जा मिळावा याबाबतही सभागृहात ठराव झाला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी अध्यक्षस्थानी होत्या.
बांधकामचे अभियंता निखील पाटील आढावा घेत असताना त्यांनी नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्ते हस्तांतरण करून घ्यावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याचे सभागृहाला सांगीतले यावर संतप्त होत श्री. चराटी म्हणाले, या विभागाला रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. मात्र अन्य गोष्टींच्याबाबत त्यांची भारीच तत्परता आहे. आजरा पेट्रोलपंप ते मिनर्वा हाटेल पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. जनतेचे हाल होत आहेत. मात्र हे हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत झाल्याचे सांगतात. नगरपंचायतीची अधिसूचना निघाल्यावर नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्ते नगरपंचायतीकडे आले. अशी आपली माहीती आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत खात्री करून घ्यावी. हे जर खरे असेल तर त्यांनी दोन महिन्यापूर्वी कोणाच्या सांगण्यावरून गाळे पाडले? चुकीच्या पद्धतीने गाळे पाडणा-यांच्यावर गुन्हा नोंद करावा लागेल असा इशाराही दिला.
आजरा शहरात ठिकठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक उभारले जातात. त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम भाडे स्वरूपात नगरपंचायतीने घेतली पाहीजेत. फलकांना आठवड्याचा कालावधी ठेवावा. कोणाचाही मुलाहीजा ठेवू नका अशीही सूचना चराटी यांनी केली. रामतीर्थ पर्यटनस्थळाचा विषय श्री. चराटी यांनी मांडल्यावर आनंदराव कुंभार यांनी ‘ब’ व ‘क’ वर्गाबाबत माहीती दिली. यासाठी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. मंजीरीमधून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत काही जणांनी आपल्याविषयी दोन्ही समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे हे चुकीचे आहे. असा खुलासा करून त्यांनी जनावरांच्या बाजारात पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न मांडला. यामुळे या भागातील नागरीकांना मोठा त्रास होत असल्याचे सांगीतले. नगरपंचायत शहरातील टॉवर, मोबाईल कंपन्यांकडून टाकली जाणारी केबल यासह विविध बाबीतून आर्थिक उत्पन्न कररुपाने मिळवू शकते पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक आनंदा कुंभार यांनी केला.
उपनगराध्यक्ष अनिरुध्द केसरकर, संजीवनी सावंत, किरण कांबळे,धनाजी पारपोलकर ,शकुंतला सलामवाडे, अस्मिता जाधव, शुभदा जोशी, सुमैय्या खेडेकर, यास्मीन बड्डेखान, यासीराबी लमतुरे, सीमा पोवार, रेश्मा सोनेखान यासह अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
थकबाकी वसुलीसाठी जाहीर फलक लावा :नगराध्यक्षा चराटी
वारंवार सूचना करूनही जे मिळकतधारक नगरपंचायतीचे कर वेळेत भरत नाहीत व थकबाकीदार आहेत अशा शहरवासीयांची थकबाकी मागणीसाठी जाहीर फलक लावावेत अशी सूचना नगराध्यक्षा सौ. चराटी यांनी केली.
………





