सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५


महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील छ. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज सोमवार (ता. २८) रोजी होत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण होईल. वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहाणार आहेत. या निमित्त आजरा शहरात विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती छ. शिवाजी महाराज मूर्ती परिसर सुशोभिकरण व उत्सव समिती आजराच्यावतीने प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली.
सोमवारी सकाळी ७ ते १२ पर्यंत होमहवन व मुर्तीस जलाभिषेक, सवाद्य महीलांची कलश मिरवणुक निघेल. दुपारी ३ वाजता ढोल ताशा वाद्यांचे सादरीकरण व सायंकाळी शिवशाहू पोवाडा मंच शिवशाहीर दिलीप सावंत शिवाजी पेठ, कोल्हापुर हे पोवाडा सादर करतील. सायंकाळी ६ वाजता उद्घाटन व लोकार्पण सोहळा होईल. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्मजा रविंद्र आपटे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार (ता. २९) रोजी पारंपारिक शिवजयंती उत्सव होईल. सकाळी ९. ते १९ वाजेपर्यंत महीलांची शोभायात्रा होईल. संध्याकाळी ४ वाजता छ. शिवरायांच्या प्रतिमेची शहरात मिरवणूक निघेल.
बुधवार (ता. ३०) संभाजी भिडे गुरुजी व वारकरी सांप्रदाय आजरा तालुका यांचे उपस्थित छ. शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याचे पुजन होईल.

कारखान्याच्या सर्वच सभासदांना साखर द्या…
विष्णुपंतांचा संचालक मंडळाला घरचा आहेर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचा दहा हजार व पंधरा हजार रुपये शेअर्स धारकांना साखर वाटप करण्याचा घेतलेला निर्णय हा कारखाना उभारणीत मोलाचे सहकार्य असणाऱ्या व तीन हजार रुपयांच्या शेअर्स धारकांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करून सर्वांना सरसकट साखर वाटप करावे अशी मागणी करत कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी कारखाना व्यवस्थापनाला घरचा आहेर दिला आहे.
याबाबत बोलताना केसरकर म्हणाले, आपण कारखान्याचे संस्थापक संचालक आहोत. त्यामुळे कारखाना स्थापना कालावधीतील सभासद आपल्याकडे साखर वितरणाबाबत चौकशी करू लागले आहेत. वास्तविक या सभासदांना प्राधान्याने साखर मिळणे आवश्यक आहे. असे असतानाही केवळ अपुऱ्या सभासद वर्गणीचे कारण पुढे करून अशा कारखाना उभारणी कालावधीत मदत केलेल्या सभासदांना साखरेपासून वंचित ठेवणे निश्चितच अन्यायकारक आहे. मुळातच साखर वितरणात अनियमितता आहे. कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने सभासद वर्गणी भरणे आवश्यक असले तरीही सभासदांनी केवळ साखरेसाठी जादाच्या सभासद रकमा भरल्यास भविष्यात साखर मिळेलच याची हमी देता येत नाही. दहा व पंधरा हजार रुपयांचे शेअर्स असणारे केवळ पंधरा ते वीस टक्के इतकेच सभासद आहेत. इतर ऊस उत्पादक सभासदांना आजतागायत कोणताच लाभ कारखान्याच्या माध्यमातून झालेला नाही. ही नाराजी वाढली तर भविष्यात कारखान्याला गळीतासाठी ऊस मिळणे अडचणीचे होऊन बसेल. किमान सवलतीच्या दरातील साखर तरी त्यांना मिळावी अशी आपली भूमिका असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
साखर वितरणाबाबतच्या एकंदर प्रतिक्रिया पाहता साखर कारखाना संचालक मंडळाने या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एस्.टी.बस अपघातातील जखमींची चौकशी नाही…
प्रवाशांचा आरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२६ एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान सातारा – कराडच्या मध्ये अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाले. बऱ्याच जणांना मार लागला एका महिलेच्या कपाळावर मोठी जखम झाली रक्त पडू लागले. मात्र जखमी प्रवाशांकडे चौकशी न करता नवीन गाडी किती खराब झाली याकडे ड्रायव्हरचे लक्ष होते यामुळे जखमींवर वेळेत उपचार न झाल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सर्व प्रवासी झोपेत व बेसावध असताना अपघात झाला. वास्तविक जखमी प्रवाशांना जवळच्या दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. ड्रायव्हर बदली झाल्यानंतर त्याची गाडी चालवण्याची पद्धत बघून प्रवाशांनी त्याला गाडी थांबवून झोप घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.
सदर एस्.टी. एका खाजगी ट्रॅव्हल्सला मागून धडकली व प्रवासी जखमी झाले. डेपो मॅनेजर यांनी पण या अपघाताबाबत गांभीर्याने घेतले नाही अशी तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचेकडे देण्यात आली आहे.
हे अपघात प्रकरण संबंधितांना शेकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दाभिल येथे १ मे ते ३ मे हनुमान मंदिर कळसारोहण कार्यक्रम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री. सदगुरू ह.भ.प. पर्वता महाराज परब स्वामी (दाभिल) यांच्या कृपा छायेखाली प्रकाश आबीटकर मंत्री आरोग्य व कुटुंबकल्याण महाराष्ट्र शासन) यांच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदीरच्या जिर्णोद्वार कळसारोहणानिमित्य गुरुवार दि.१ मे ते शनिवार दि.३ मे पर्यंत मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे.
दि १ मे रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत घटस्थापना, ध्वज पुजन, विणापुजन, तुळस पुजन,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पुजन,नित्य पुजा, काकडा आरती, पंचपदी, नामजप होणार आहे. सकाळी ११.०० वाजता श्री हनुमान देवाची प्रतिमा व कळस मिरवणूक, दिंडी नगर प्रदक्षीणा तर सायंकाळी ५ वाजता हरिपाठ वरात्री ९ ते ११ वाजेपर्यंत श्री. ह. भ. प. वारकरी भुषण नारायण एकल महाराज (जोगेवाडी ता. राधानगरी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर जागर होईल.
शुक्रवार दि. २ मे रोजी सकाळी ७ ते १०.३० काकड आरती, होमहवन पुजा विधी सकाळी १०.३० नंतर माहेरवासीर्नीचा गारवा,
सुवासीनींचा कलश आगमन व पुजन गुरूवर्य श्री. ह. भ. प. नारायण दादा अलिबागकर, वाजे महाराज मठाधिपती पंढरपूर यांच्या हस्ते काळसारोहण व मुर्ती प्राण प्राण प्रतीस्थापना गुरूवर्य प. पू. किसन महाराज रामदासी
(समर्थ सेवा ट्रस्ट, भडगांव मठ गडहिंग्लज) यांचे हस्ते होईल. सायंकाळी ५.०० वा. हरिपाठ, रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन रात्री ११.३० नंतर पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळाचा हरिजागर होणार आहे.
शनिवार दि. ३ मे रोजी काकड आरती, नित्य पूजा, नाम जप व काल्याचे किर्तन होणार आहे.

थोडक्यात…

गटर्स गायब… आता रस्ताही गायब होण्याची शक्यता रवळनाथ कॉलनीत दिसत आहे. रस्त्यांशेजारी वाढलेली झुडपे तातडीने काढून घेण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत.






