मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५



अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या आजरा शहरातील शिवतीर्थ येथील पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा प्रचंड उपस्थितीत व उत्साहात पार पडला. याची देही याची डोळा अनेकांनी या सोहळ्याची क्षणचित्रे आपल्या हृदयात जपून ठेवली.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये काल सोमवारी मुख्य पुतळा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. तरुणाईच्या प्रचंड जल्लोष… जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा… नेत्र दीपक आतषबाजी… कलश पूजन, पोवाडे धार्मिक कार्यक्रम, नाशिक ढोल लेझीम अशा कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर होती. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सदर लोकार्पण सोहळा पार पडला.गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आमदार शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, पद्मजा आपटे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष महादेव टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम तालुकावासियांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संदीप पारळे यांनी प्रेरणा मंत्र म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा आनंददायी दिवस आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आजरा तालुक्यातील जनतेची तपश्चर्या होती. भव्य दिव्य पुतळ्याचे सर्वांचे स्वप्न होते, जे आज पूर्णत्वास गेले आहे. ही मूर्ती उभारण्यासाठी ज्या ज्या घटकांनी योगदान दिले ते सर्वजणच अभिनंदनास पात्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पणाचे भाग्य लाभले, हेच आयुष्याचे सार्थक वाटत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागली आहे. आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सर्वांचेच काम सार्थकी लागल्याचे समाधान प्राप्त झाले आहे.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, वैचारिक बैठकीचा तालुका असलेल्या आजऱ्यामधील सर्वपक्षीयांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला याचा विशेष आनंद होत आहे. यावेळी आमदार शिवाजी पाटील, नाविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळच्या सत्रात अभिषेक, होम-हवन असे धार्मिक कार्यक्रम, दुपारी ढोल ताशा सादरीकरण तर त्यानंतर शिवशाही पोवाडा मंचच्या शिवशाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध पोवाडे सादर केले.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, सुनील शिंत्रे, जनार्दन टोपले, परशुराम बामणे, नागेश चौगुले, विजयकुमार पाटील, संभाजी इंजल, मारुती मोरे, आलम नाईकवाडे, सुधीर कुंभार, वैभव सावंत, शैलेश पाटील, गणपतराव डोंगरे, शिवाजी गुडूळकर, दत्तात्रय मोहिते, दिवाकर नलवडे, संभाजी पाटील, बाळ केसरकर, सौ.रचना होलम,सौ. राजलक्ष्मी देसाई, विजय थोरवत, नाथा देसाई, , संजयभाऊ सावंत, रवी तळेवाडीकर, विजय नेवरेकर, संदीप ओतारी, महेश दळवी, अतुल पाटील, ओंकार माद्याळकर, जानकी मडगावकर, निशांत जोशी, अभिषेक शिंपी, युवराज पोवार, गौतम भोसले, अमानुल्ला आगलावे, अप्पा शिवणे, जितेंद्र शेलार, सुरेश होडगे, गौरव देशपांडे, महेश कुरूणकर, शंकरराव पाटील, राजेंद्र सावंत, काका देसाई, धनंजय पाटील, मारुती डोंगरे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कुंभार यांनी आभार मानले.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडून मूर्तीला छत्र देण्याची घोषणा…
लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आजरा शहरात लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने छत्र देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच आमदार शिवाजी पाटील यांनीही दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले.
प्रचंड आतषबाजी
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण होताच प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीमुळे संपूर्ण आकाश उजळून निघाले.

रवळनाथ’ तर्फे सभासदाच्या वारसांना १ लाख ४४ हजारांची मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज या संस्थेच्या गडहिंग्लज शाखेचे सभासद श्री. बबन शाहू माने यांचे महिन्याभरापुर्वी निधन झाले. ‘रवळनाथ’ संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून बबन माने यांच्या वारसाला १ लाख ४४ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. मयत सभासदाचे वारस पत्नी श्रीमती सिंधुताई बबन माने यांना उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांच्याहस्ते धनादेश सुपुर्द करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सभासद, ठेवीदारांच्या, विश्वासावरच संस्थेने अल्पावधीत उतुंग प्रगती केली आहे. त्यामुळे संस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताचे धोरण राबवले आहे. सभासदांचा वेळोवेळी सन्मान करण्याची संधी संस्थेने कधीही सोडलेली नाही. स्थापनेपासून कर्जदार सभासदांच्या हितासाठी सभासद कल्याण ठेवीमधून निधी उभारला आहे. या निधीतून नैसर्गिक व अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना जमा सभासद कल्याण ठेवीच्या १० पट रक्कम आर्थिक मदत देवून त्या कुटुंबाला आधार दिला जातो. सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होण्यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. एम. एल. चौगुले यांनी सांगितले.
यावेळी संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, श्री. महेश मजती, प्रा. विजय आरबोळे, प्रा. डॉ. मनोहर पुजारी, सौ. रेखा पोतदार, सीईओ श्री. डी. के. मायदेव उपस्थित होते.

थोडक्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोवा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सामाजिक , शैक्षणिक, उद्योज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, महाराष्ट्रासह पाच राज्यातून देण्यात येणाऱ्या, राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती दिल्ली यांच्याकडून मसोलीतील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री . सुरेश गणपतराव होडगे यांना सामाजिक सेवेबद्दल विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात आले.

छ. शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळा आज विशेष…

आज मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० पर्यंत महिलांची शोभा यात्रा
संध्याकाळी ४ ते पुढे…
श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची सहवाद्य मिरवणूक मिरवणूकिचे खास आकर्षण, मंगलनाथ प्रो साऊंड एक्सट्रिम नियोस सीरीज साई लाईट अँड टस कराड व स्वामी एलईडी स्क्रीन कोल्हापुर यांचा विशेष कार्यक्रम व छ.शिवाजीनगर यांच्या वतीने अघोरी हा खास कार्यक्रम…

निधन वार्ता…
विष्णू पाटील

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.





