mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक

आजरा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

आजरा:प्रतिनिधी

        उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पेरणोली ता.आजरा येथील दिनकर राणबा लोखंडे (वय ५८ वर्षे) या रुग्णाचा अल्पावधीत मृत्यू झाल्याने रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झाले त्यामुळे आजरा ग्रामीण रुग्णालय परिसरात वातावरण तंग झाले होते पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईक शांत झाले. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सदर प्रकार घडल्याची चर्चा या परिसरात होती.

        याबाबत घटनास्थळ, मयत लोखंडे यांचे नातेवाईक व आजरा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की…

        पेरणोली येथील लोखंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यासाठी शासनाच्या १०८ क्रमांकावर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णवाहिका मागविण्यात आली. रुग्णवाहिका येण्यापूर्वीच लोखंडे यांचे निधन झाले.

        लोखंडे यांचे निधन होताच नातेवाईक आक्रमक झाले.त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा पाहून वैद्यकीय अधिकारी तिथून निघून गेले. सुमारे दोन तासानंतर रुग्णवाहिका दाखल झाली. परंतु तत्पूर्वीच लोखंडे यांचे निधन झाले होते. नातेवाईकांच्या या आक्रमक पवित्राने रुग्णालय परिसरातील वातावरण तंग झाले याचवेळी आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे हजर झाले. सदर वृत्त समजताच पेरणोली येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

        अखेर पोलिसात रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या वर्दीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

रुग्णवाहिकेचा विलंब मृत्यूस जबाबदार ठरल्याचा आरोप…

     लोखंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तर ठीक- ठिकाणी झालेल्या खुदाईमुळे उत्तूर येथून रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात येण्यास वेळ झाल्याचीही चर्चा होती. आजरा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बंद असल्याचा फटकाही बसला.


राजारामबापूंनी आजरा तालुक्यात सहकार समृध्द केला :डॉ. यशवंत पाटणे

                     आजरा:प्रतिनिधी

           स्व. राजारामबापू देसाई यांनी आजरा तालुका शेतकरी संघ, जिल्हा बँक, सेवा संस्थासह विविध संस्थाच्या माध्यमातून सहकाराला समृध्दी देण्याचे काम केले. ते खरोखरच सहकाररत्न होते. नोकरीमध्ये न रमता त्यांनी समाजाच्या सुख- दुखःशी नाते जोडले. माणसं व माणसांचे संसार उभे केले. असे प्रतिपादन पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

         येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात कै. राजारामबापू देसाई यांचा १६ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.यावेळी तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणान्या व्यक्ती व संस्थाचा मान्यवरांच्या हस्ते प्रस्कार देवून सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. पाटणे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, तालु‌का संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई, वसंतराव धुरे या वेळी पमुख उपस्थित होते.

          स्व. राजाराम (बापू) देसाई फौंडेशन आजरा यांच्यावतीने कार्यक्रम झाला.स्व. राजारामबापूंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. फौंडेशनचे अध्यक्ष वृषाल हक्केरी यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष युवराज पोवार यांनी प्रास्ताविक केले.

        यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, विजय देसाई,अल्बर्ट डिसोझा, उदयराज पवार, रणजित देसाई, महादेव पोवार, रचना होलम, डॉ. राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, मनिषा देसाई, दीपक देसाई, मारुती घोरपडे, पांडुरंग तोरगले, भिमराव वांद्रे, जयसिंग खोराटे, विकास फळणीकर, उपस्थित होते.

         एकनाथ गिलबिले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


        यावेळी अण्णासाहेब गळतगे ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास १२५ पिशव्या रक्तदान करत रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


स्वाभिमानीचा आजऱ्यात चक्काजाम


                   आजरा:प्रतिनिधी

              राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेसह उपपदार्थांचे दरही वाढले असून आजरा कारखान्याने यंदाच्या ऊसाला ३५००/- रूपयांचा दर जाहीर करावा मगच ऊस तोड सुरू करावी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला. येथील संभाजी चौकात संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी संघटनेचे नेते तानाजी देसाई बोलत होते.

        गतवर्षीच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जादा ४०० रूपये देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आम्ही ही अवास्तव मागणी करत नसून आमच्या हक्काचे दाम मागत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ कारखानदारांचे हित पाहू नये, शेतकऱ्यांच्या हिताकडेही लक्ष द्यावे. पालकमंत्र्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळेच प्रश्न चिघळत असल्याचा आरोपही देसाई यांनी केला.

        येथील संभाजी चौकात मुख्य रस्त्यावर कार्यकर्त्यांनी ठाण मांडल्यामुळे आजरा- आंबोली, गडहिंग्लज, नेसरी मार्गासह मुख्य बाजारपेठेत तब्बल अर्धातास वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी संघटनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात कृष्णा पाटील, गंगाराम डेळेकर, तुळसाप्पा पोवार, संजय देसाई, सखाराम केसरकर, मारूती मोरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


छाया वृत्त :-

       मेंढोलीचे नूतन सरपंच विलास जोशिलकर यांनी चंदगड विधानसभा संपर्कप्रमुख अशोक निकम, राधानगरी विधानसभा संपर्कप्रमुख दिनानाथ चौगुले, उत्तम बोलके, आनंदा लाड यांच्यासोबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!