

आम.पी.एन.पाटील यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व काँग्रेसचे निष्ठावान नेते आमदार पी.एन.पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
राहत्या घरामध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले होते. गेले तीन दिवस त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यानच त्यांचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.
गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते व काँग्रेसचे निष्ठावान अशी त्यांची ओळख होती. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा चांगलाच दबदबा होता.त्यांच्यावर मूळ गाव सडोली खालसा येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज : ह.भ.प. धना पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सामाजिक कार्यातून पुण्य मिळवण्यासाठी, सेवा भावी असावे, अहंकार आणि गर्वाने प्रगती होत नाही. भ्रष्टाचारामुळे देशाचे समाजाचे नुकसान होत असून, निकोप समाजासाठी देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज असल्याचे मत ह.भ.प. धना पाटील, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी सिरसंगी ता आजरा येथील वारकरी मेळावा व आजरा तालूका कार्यकारणी समिती उदघाटन सोहळा प्रसंगी व्यक्त केले .
स्वागत सी. आर. देसाई यांनी तर प्रास्ताविक ह.भ.प. गौरव सुतार, तालूका अध्यक्ष यांनी केले
पुढे बोलताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अभिनंदन करून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी वारकरी मंडळाने पुढं यावे इतरांना मोठे करा. तुम्ही मोठे व्हावे मुलांना चांगले संस्कार देवून, आध्यात्मिक सांगड घालावी. मोबाईल वापर कमी करत, कृतीशीलता रहावे. असा सल्ला देत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विचार गावा गावात पोहोंचविण्याचे पाटील यांनी आवाहन केले.
काॅ. संपत देसाई यांनी वारकरी चळवळ ही जाती भेदाच्या पलिकडे समतेचा पुरस्कार करणारी असून, ही चळवळ पुढे नेण्याकरिता आजरा तालूका वारकरी भवन उभारणी साठी जागेची मागणी चे निवेदन देण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही वारकरी मंडळ सोबत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. कृष्णात खाडे,ह.भ.प. राजाराम जाधव, सिरसंगी गावचे सरपंच संदीप चौगले, कारखाना संचालक सुभाष देसाई, बाळासाहेब सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आजरा चंदगड गडहिंग्लज येथून आलेल्या दिंड्याना व कार्यकारणी समितीला प्रमाणपत्राचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संतू कांबळे, गंगाराम येडगे, नामदेव सुतार, जानबा धडाम, कल्पना जाधव, पांडूरंग जोशिलकर, लक्ष्मण शिंत्रे, संभाजी पालकर, रेणुका सुतार, दिपाली गुरव, मंगल बुडके, सुशिला परीट, महादेव सुतार, हरिबा आडे, शिवाजी सुतार, गणपती कांबळे यांच्यासह वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले .आभार बाबूराव आडे यांनी मानले.

अन्यथा एक जून रोजी लाक्षणिक उपोषण…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगाराचा कारभार प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसंदर्भात आठवडाभरात तातडीने बैठक न घेतल्यास आजरा आगारासमोर एक जून रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा प्रवासी संघटनेच्या वतीने एसटी महामंडळाच्या जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन इंदुलकर म्हणाले एस.टी. आगाराचा कारभार अत्यंत भोंगळ पद्धतीने सुरू आहे. एखादी तक्रार घेऊन गेल्यास ती तक्रार सोडवण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न न करता जुजबी उत्तरे देऊन वेळ मारून घेण्याचे काम आगार व्यवस्थापक करताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये एस.टी.बस फेऱ्या कमी करण्यात आले आहेत. आठवडाभरात शाळा व महाविद्यालये सुरू होणार असल्याने एस.टी. बस फे-यांचे नियोजन व्यवस्थापनाने जाहीर करावे. प्रवाशांना कल्पना न देता कोणत्याही बस फेऱ्या रद्द करू नयेत. यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सदर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फोटो क्लिक

नवीन आजरा नळ पाणीपुरवठा योजनेच्या या मुख्य पाईप मधून नेमके पाणी कुठे जाणार याचे उत्तर शहरवासीयांना मिळेल का ?



