
रिक्षा चालकाचा रिक्षातच हृदयविकाराने मृत्यू

चांदेवाडी (ता. आजरा) येथील संभाजी भाऊ बेलकर( वय ५९) या रिक्षा चालकाचा आजरा- गडहिंग्लज मार्गावर रिक्षा चालवत असतानाच हृदयविकाराने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास म्हसोबा देवस्थान नजीक सदर प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी… बेलकर हे रीक्षा दुरुस्ती कामासाठी गडहिंग्लजला गेले होते. तेथून ते चांदेवाडीच्या दिशेने येत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना रिक्षा चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना स्थानिक दवाखान्यात दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी असा परिवार असून याबाबतची वर्दी दिनकर विष्णू गिलबीले (रा. चांदेवाडी) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत .

पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग आजरा शहरातूनच जाणार
आजरा येथील बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती

नव्यानेच तयार होत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे संकेश्वर ते बांदा या रस्त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे आजरा शहरातून हा पहिल्या टप्प्यातील मार्ग जाणार असून पहिल्या टप्प्याचे साठ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, स्थानिक भूमी अभिलेख विभाग आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त पाहणी नंतर सिटी सर्वेच्या नकाशाप्रमाणे शहरातून दहा मीटर रुंदीचा रस्ता केला जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. मुधाळे यांनी आजरा येथे आयोजित बैठकीत बोलताना दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबीटकर होते.
शहरातून जाणाऱ्या या मार्गाबाबत नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे. महामार्गाचे अधिकारी याबाबत स्थानिक रहिवाशांना प्रत्यक्ष येऊन योग्य ते मार्गदर्शन करतील असे यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
यावेळी समीर मोरजकर, संजय पाटील,सचिन भोई, राकेश करमळकर, रामचंद्र इंजल व दत्तात्रय मोहिते यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
बैठकीस उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे, तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, मानसिंग देसाई,गणपतराव डोंगरे, शिवाजीराव गुडुळकर, प्रशांत बिल्ले,प्रवीण बिल्ले,दीपक बल्लाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पावसाळ्यानंतरच शहरातील काम सुरू होणार
राष्ट्रीय महामार्गाच्या आजरा शहरातून जाणाऱ्या मार्गाचे पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता के.डी. मुधाळे यांनी दिली.

इतिहास म्हणजे माणसाला शहाणं करणारी विद्याशाखा

महापुरुष कोणत्या जातीचे नसून या मातीतील जनतेचे आहेत, हे समजून घेतले पाहिजे. आम्हाला खरा इतिहास सांगितला अथवा शिकविला नाही तो समजून घेण्याची गरज आहे. माणसाला शहाणं करणारी ती विद्याशाखा म्हणजे इतिहास असल्याचे प्रतिपादन मधुकर पाटील यांनी केले. येथील गंगामाई क वाचन मंदिर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढावे छत्रपती संभाजीराजांसारखे या विषयावर ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. यावेळी पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगण्यातून नियोजन, अर्थनिती, प्रशासन जाणून घेतलं पाहिजे. महाराजांच संघटन, राजनिती त्यांच्या कार्यातून समजून घेतली पाहिजे. लढणारी माणसं महाराजांनी निर्माण केली म्हणून स्वराज्य उभं राहिलं असे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, युवराज संभाजीराजांना अनेक इतिहासकारांनी बदनाम केले. संभाजीराजे चारीत्र्यावान, व्यसनमुक्त, करारी बाण्याचे होते. आजची व्यवस्था आणि अवस्था बदलायची असेल तर या दोन्ही राजांच जगणं, त्यांच समर्पण समजून घेण्याची गरज आहे. इतिहास वाचून नवनिर्मिती करणारी पिढी निर्माण करण्याचं आव्हान आजच्या पिढीसमोर असल्याचेही मधुकर पाटील यांनी सांगितले.
यावेळी विजय राजोपाध्ये, डॉ. सुधीर मुंज,सौ. गीता पोतदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

व्यंकटराव हायस्कूल चे शासकीय चित्रकला परीक्षेत उज्वल यश

व्यंकटराव हायस्कूलचा शासकीय चित्रकला स्पर्धेचा १००% निकाल लागला.. यामध्ये ११ विद्यार्थी पहिल्या श्रेणीत व ०९ विद्यार्थ्यी दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.
‘अ’ श्रेणी प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे…
स्वराज नाथ देसाई,नावलकर प्रेरणा रवींद्र,मिसाळे तनुजा महादेव,जाधव राजलक्ष्मी व्यंकटराव,कोंडुसकर पार्थ मारुती,ढेकळे प्रणव प्रकाश,नाईकवाडी स्वालेहा जमीर,सुतार किरण नारायण,पापरकर श्रावणी लिंगेश्वर,नाईक संचिता सुभाष,देसाई आदित्य सतीश
ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी….
प्रधान नियती विकास,ऋतुजा लक्ष्मण चौगुले,देसाई प्रसाद अशोक,गोविलकर स्वरूप संतोष,पाटील कल्याणी देवबा,कसलकर सुकन्या सागर
,मिरजे तृप्ती गजानन,नरके विराज नितीन,तर्डेकर संचिता शिवाजी.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व कलाशिक्षक कृष्णा दावणे यांचा आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सचिव एस पी कांबळे, माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई , संचालक सचिन शिंपी , प्राचार्य खोराटे एस.जी., पर्यवेक्षक एस. एन. पाटील यांचे हस्ते व्यासपीठावर पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.



