लढत चराटी विरुद्ध देसाई... स्वरूप मात्र चराटी विरुद्ध ना. मुश्रीफ
ज्योतिप्रसाद सावंत
आजरा तालुक्यातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरीता विकास सेवा संस्था गटातून अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी व आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. वरकरणी ही लढत चराटी विरुद्ध देसाई अशी असली तरी सध्याच्या राजकीय हालचाली पहाता या लढतीचे चराटी विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असे स्वरूप तयार होऊ लागले आहे.
ना.मुश्रीफ यांनी आजरा तालुक्यात गांभीर्याने लक्ष घातल्याने चराटी यांच्या दृष्टीने ना. मुश्रीफ यांचा हस्तक्षेप डोकेदुखी ठरत आहे. स्व. काशिनाथअण्णा चराटी यांच्या निधनानंतर राजकीय पटलावर अशोक चराटी यांचा खऱ्या अर्थाने उदय झाला. या कालावधीत ना. हसन मुश्रीफ, तत्कालीन मंत्री व सध्याचे आमदार विनय कोरे यांनी चराटी यांना चांगलीच साथ दिली नकळतपणे चराटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध वाढत गेले. स्व. बाबा कुपेकर, ना.हसन मुश्रीफ, तत्कालीन आमदार के.पी. पाटील यांच्या माध्यमातून आजरा ग्रामपंचायतीला भरघोस निधी आणण्यात चराटी यशस्वी झाले. त्यापाठोपाठ झालेल्या आजरा साखर कारखाना निवडणूकित या सर्वांच्या मदतीने चराटी यांचा आजरा साखर कारखाना संचालक म्हणून प्रवेश झाला हा प्रवेश त्यांना पुढे अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेला मागील पाच वर्षात भाजपा-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत अशोकअण्णा यांनी थेट भाजपात प्रवेश केला.यामुळे राष्ट्रवादीची मंडळी चांगलीच दुखावली. याच दरम्यान अशोकअण्णा व सुधीर देसाई यांच्यातील अंतर्गत संघर्ष सुरूच राहिला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही अनेक वेळा चराटी यांनी आपले नेते, आपले मार्गदर्शक म्हणून ना. हसन मुश्रीफ यांचा जाहीर उल्लेख केला आहे. मात्र चराटी यांनी भाजपाशी केलेली सलगी ना.मुश्रिफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंडळींना रुचलेली नाही. भक्कम संस्थांचे जाळे पाठीशी असणाऱ्या चराटी यांनी भाजपा प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे नुकसान तर झालेच परंतु त्याच बरोबर आजरा साखर कारखान्यासह नगरपंचायतीमधील सत्तेपासूनही राष्ट्रवादीला बाजूला व्हावे लागले होते.
एकीकडे राष्ट्रवादीपासून चराटी बाजूला झाले तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर जि. प. सदस्यपदी विराजमान झालेले जयवंतराव शिंपी यांचे व राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळी मधील संबंध ताणत गेले. केवळ स्थानिक मंडळींच्या विरोधामुळे गोकुळच्या संचालक पदापासून आपणाला दूर राहावे लागले ही सल शिंपी यांच्या मनात निश्चित आहे. परिणामी शिंपी देखील राष्ट्रवादी पासून दूर होत गेले. राष्ट्रवादीपासून दूर झालेल्या शिंपीनी सध्या भाजपामध्ये असणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांच्याशी थेट हातमिळवणी केली. याचा परिणाम म्हणून ना. मुश्रीफ यांनी चराटी यांच्या विरोधात थेट सुधीर देसाई यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये शिंपी व गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची जवळीक वाढली असली तरीही शिंपी यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश न केल्याने शिंपी यांनी चराटी यांच्यासोबत राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी गृहराज्यमंत्री पाटील कितपत सहमत असणार हा वेगळा विषय आहे. त्यामुळे मंत्री पाटील हे चराटी यांच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा ठेवणे तूर्तास चुकीचे ठरू शकते. जिल्हा बँकेपाठोपाठ आजरा साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जनता सहकारी बँक, तालुका खरेदी विक्री संघ अशी निवडणुकांची मालिका असल्याने चराटी यांना या जिल्हा बँक निवडणुकीतच अडविण्यात यश आले तर भविष्यात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीची वाटचाल सुखकर होणार आहे याचीदेखील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळीना निश्चितपणे जाणीव आहे. याच कारणास्तव ना. मुश्रीफ यांची सर्वतोपरी मदत घेऊन अशोकअण्णांसह जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांना थोपविण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार व्युहरचना सुरु केली आहे. यात त्यांना कितपत यश येणार हे महिनाभरातच स्पष्ट होईल. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता जिल्हा बँकेकरीता आजरा तालुक्यातून अशोकअण्णा चराटी विरुद्ध सुधीर देसाई अशी लढत होत असली तरीही अप्रत्यक्षरीत्या अशोक अण्णा चराटी विरुद्ध ना.हसन मुश्रीफ असेच चित्र तयार होऊ लागले आहे.
बिनविरोधची केवळ चर्चाच…
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार अशी सध्या आजरा तालुक्यात चर्चा सुरू आहे. अशोकअण्णा चराटी यांनी विकास सेवा संस्था गटा बरोबरच इतर मागास प्रवर्गातूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनीही इतर मागास प्रवर्गातून अर्ज दाखल केल्याने जागावाटपात तडजोड होऊन निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. परंतु याला राजकीय मंडळींचा दुजोरा नसल्याने ही चर्चा केवळ चर्चाच असल्याचेही बोलले जाते.

पेद्रेवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी – अन्यथा उपोषण…
पेद्रेवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेला कारभार हा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. ग्रामस्थांना खोटी माहिती देऊन तत्कालीन ग्रामसेवक कुंभार यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार करून ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात गटविकास अधिकारी व इतर यंत्रणेकडे मागितलेल्या माहितीमध्येही हे स्पष्ट झाले असतानाही गटविकास अधिकार्यांकडून या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत आहे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी अन्यथा पंचायत समितीच्या दारातच उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य अशोक लोहार, महादेव चव्हाण यांच्यासह काही सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पेद्रेवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायतीमध्ये कारभाराबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीमध्ये एकच खर्च दोनदा दाखवणे, वाहन खर्चाच्या नावावर भरमसाठ खर्च करणे, डॉलर मध्ये खर्च करणे, इतीवृत्तामध्ये मध्ये रिकाम्या जागा ठेवणे, खाडाखोड करणे यासारख्या प्रकारातून सुमारे साडेचार लाख रुपयांचा गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता केवळ दहा हजार रुपयांची वसुली ग्रामसेवक कुंभार यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. शासकीय परिपत्रकांचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढणे, किर्द व इतर ताळेबंद पत्रक यांच्यामध्ये ताळमेळ नसणे, माहिती देण्यास दिरंगाई करणे अशा अक्षम्य चुका वेळोवेळी होत आले आहे या सर्व चुका प्रिंटिंगच्या चुका आहेत असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. ग्रामनिधीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. वनसंवर्धन, संगणक दुरुस्तीच्या नावावर झालेला खर्च हा खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यात आला आहे प्रत्यक्षात मात्र असे खर्च झालेलेच नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची शहानिशा होऊन ग्रामपंचायत कारभाराची चौकशी न झाल्यास आजरा पंचायत समितीसमोर ग्रामपंचायतीचा कारभार व गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका याच्या निषेधार्थ येत्या आठ दिवसात उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
‘डॉलर’ मध्ये खर्च……?
ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या काही खरेदी बिलांवर सदर रकमा डॉलरमध्ये खर्च केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि विशेष म्हणजे लेखापरीक्षणात देखील ही बाब फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. सर्व चुका छपाईच्या चुका असे सांगून किती दिवस वेळ मारून नेणार? असा सवालही लोहार यांनी उपस्थित केला आहे.
आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या ग्रामउद्योजकांची मार्गदर्शन बैठक संपन्न.
आजरा येथील आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी लिमिटेडची ग्राम उद्योजकांची बैठक पार पडली.
अध्यक्षस्थानी आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.अनिल देशपांडे होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक संभाजी जाधव यांनी केले. यावेळी आजरा तालुक्यातील उपस्थित असलेल्या ग्राम उद्योजक यांना मार्गदर्शन करताना डॉ. देशपांडे म्हणाले, आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी, विकासासाठी आपल्या दारी आलेली आहे. फक्त ११० रुपये भरुन सभासद होऊन कंपनीच्या माध्यमातून हत्ती गवताचे उत्पादन घेऊन कंपनीला द्यावे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही कंपनी भारतात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज भारताची हवामानाची परिस्थिती ही अत्यंत घातक आहे. या सीएनजी गॅस मुळे प्रदूषण कमी होणार आहे. . आजरा तालुक्यात जास्ती – जास्त शेतकरी वर्गाने सभासद व्हावे. कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे म्हणाले, प्रत्येक गावातील ग्राम उद्योजकांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. आजरा तालुक्यातील ७० टक्के गावामध्ये ग्राम उद्योजक नेमले आहेत. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून त्या – त्या गावातील शेतकरी वर्गाने सभासद होवून स्वत:सोबत तालुक्याचा व देशाचा विकास करूया असे आवाहन केले. यावेळी वडकशिवाले व उत्तुर येथील ग्रामउद्योजकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. नुतन संचालक नारायण मुरुकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजरा तालुक्यातील ५२ गावातील ग्राम उद्योजक तसेच संचालक शिवाजी रावण, नारायण मुरकुटे, रामचंद्र मुरकुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
नूतन संचालकाना नियुक्ती पत्रे …..
आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीने नूतन संचालक म्हणून नारायण मुरकुटे, पत्रकार संभाजी जाधव, रामचंद्र मुरकुटे यांची निवड केली असून कंपनीचे कार्यकारी संचालक श्री. वाघमारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देशपांडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला.




लढत