mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरसामाजिक

गाळे वाटपात ‘गाळा’ मारला कुणी? आजऱ्यात सुरू आहे जोरदार चर्चा… काय आहे हे प्रकरण

गाळ्यात ‘गाळा’ मारला कोणी…?

आजरा येथील गाळ्यांमध्ये झाल्या ‘अर्थपूर्ण ‘वाटाघाटी…?

काही नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात… मनसे कार्यकर्ते मात्र आक्रमक

आज-यातील जुन्या सरकारी दवाखान्याशेजारी घाईगडबडीने बांधण्यात आलेल्या नऊ दुकान गाळयांच्या वाटपात मोठ्या ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. या प्रकरणात कांही नगरसेवकांचा हात असल्याचीही सध्या चर्चा सुरू आहे. केवळ नगरसेवकांच्या पाठबळावर वाटप करण्यात आलेले हे गाळे खरोखरच गरजुंच्या दृष्टीने उपयुक्त असताना नगरसेवकांच्या बगलबच्च्यांना व नगरसेवकांना देण्यात आले असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्याशेजारी सदर गाळे बांधण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अंधारात ठेवून परस्पर गाळ्यांचे बांधकाम करण्यामागचा उद्देश केवळ ‘पैसे मिळवणे’ हा एकमेव असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. एकीकडे शहरांमध्ये पार्किंगअभावी वाहतुकीचा बोजवारा उडत असताना पार्किंग करता वापरण्यायोग्य असणाऱ्या या जागेवर गाळे बांधून नगरपंचायतीच्या कारभाऱ्यांनी नेमकं काय साध्य केले? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या जागेवर असणारी पूर्वीची खोकी हलवून येथील मूळ दोन-चार व्यवसायिकांना या मंडळींनी रस्त्यावर आणले असल्याचा आरोपही आता होऊ लागलाा आहे. वास्तविक नवीन गळ्यांचे बांधकाम करताना जुन्या व्यवसायिकांना प्राधान्य देणे गरजेचे होते परंतु ज्यांचा कोणताही व्यवसाय नाही अशा मंडळींनी केवळ गाळे घेऊन इतरांना जादा दराने भाडोत्री देण्याच्या उद्देशाने या सगळ्या उठाठेवी केल्या आहेत. यापूर्वीही ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य म्हणून मिरवणा-या मंडळींनी शहरातील ग्रामपंचायत मालकीचे गाळे, मोक्याच्या जागेवर असणारे खोकी अल्पभाड्याने ताब्यात घेऊन गरजूंना जादा दराने जागा भाड्याने देऊन आपल्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे. नगरपंचायतीशी संबंधीत मंडळींचे हे व्यवहार आता गावभर चर्चिले जाऊ लागले आहेत. सत्ताधारी आघाडीतील नगरसेवक किशोर पारपोलकर यांनी या प्रश्नावर आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता. परंतु यातून कोणताही बोध न घेता संबंधितांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. शहरातील अनेक विकास कामे काही नगरसेवक ठेकेदारांना हाताशी घेऊन ‘नावाला ठेकेदार पण प्रत्यक्षात काम नगरसेवकांना’ या तत्त्वावर करत असल्याचे समजते. वास्तविक या सर्व प्रकारात मुख्याधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे परंतु त्यांच्याकडूनही याबाबत फार अशी आक्रमक भूमिका दिसत नाही. एकंदर या प्रकारामुळे नगरपंचायतीच्या कारभाराची चर्चा आता शहरभर होऊ लागली आहे.

मनसेची आक्रमक भूमिका

तालुका मनसेने या गाळयाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हे गाळे कोणी बांधले? त्यांचा लिलाव का करण्यात आला नाही? हे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत? बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देण्यात आली आहे का? असे प्रश्न उपस्थित करत हे गाळे लवकरात लवकर हटवले नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. त्याबाबतचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले असून या पत्रावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, तालुकाध्यक्ष अनिल नेउंगरे, चंद्रकांत सांबरेकर, पूनम भादवणकर, आनंदा घंटे, प्रकाश कांबळे, प्रमोदिनी देसाई, तेजस्विनी देसाई, सरिता सावंत, शोभा कांबळे, अश्विनी राणे, अमर घेवडे, राहुल पेंडसे आदींच्या सह्या आहेत.

अतिक्रमणे काढण्याचा नगरपंचायतीला नैतिक अधिकार आहे का?

एकीकडे शहरभर अतिक्रमण हटाव मोहीम नगरपंचायतीकडून राबवली जात असून वाहतुकीला अडथळा ठरणारे साहित्य काढून घेण्यास दुकानदारांना सूचना केल्या जातात प्रसंगी गटर्स बाहेर ठेवलेले साहित्य काढून नेले जाते. अशावेळी अखंड नऊ गाळ्यांचे बांधकाम झालेले नगरपंचायतीच्या निदर्शनास येत नाही का? हे अतिक्रमण नाही का? असा प्रश्‍न उपस्थित करत मनसे कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अतिक्रमण काढून दाखवण्याचे धाडस करावे असे खुले आवाहन केले आहे. जर हे अतिक्रमण काढण्याचे धाडस नसेल तर सर्वसामान्यांच्या वर केली जाणारी कारवाई थांबवावी असा सल्लाही दिला आहे. एकंदर हे गाळे प्रकरण नगरपंचायतीच्या नगरसेवकांना शेकणार असे दिसू लागले आहे.

अनुष्का गोवेकर यांच्या ‘शब्दवेल ‘काव्यसंग्रहाचे प्रकाशन

केंद्रशाळा पेरणोली(ता. आजरा)येथील शिक्षिका अनुष्का अनिल गोवेकर यांच्या ‘शब्दवेल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते पुणे येथे झाले. अध्यक्षस्थानी मुंबईच्या अष्टपैलू कला व सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष शिवाजी खैरे होते.
यावेळी बोलताना डॉ.घाणेकर म्हणाले,अनुष्का गोवेकर यांची कविता आश्वासक व सकारात्मक आहे.कोणत्याही चौकटीत न लिहिता त्यांची कविता मनमोकळी आहे. त्यांच्या काव्यातून संस्कारित प्रतिभेचे दर्शन घडते.
अनुष्का गोवेकर म्हणाल्या, कवितांच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या मनातील भावना प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याने शब्दवेल काव्यसंग्रह आकारास आला.
कार्यक्रमास प्रकल्पाधिकारी प्रताप पाटील, ज्ञानदेव पाटील, प्रल्हाद सुपेकर अनुसया खैरे,अनिल गोवेकर,अलका झरेकर,सुरेखा नाईक प्रतिमा काळे ,चंदन तरवडे उपस्थित होते.

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न

येथील व्यंकटराव हायस्कूल व  ज्यू्नियर कॉलेज आजरा येेेेेेथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य तसेच आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक श्री. सुनील देसाई यांचे हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य श्री.शिवाजी गुरव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य कथन करत डॉ. बाबासाहेबांचे विद्यार्थिदशेपासून ते त्यांच्या शेवटपर्यंत त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची अचाट इच्छाशक्ती तसेच वाचन केलेले,चिंतन करून त्यावर आपले विचार मांडण्याची एक स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली होती असे सांगितले. एस .जी. देसाई यांनी आपल्या मनोगतात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी समजले.आपल्या अस्पृश्य बांधवांना त्याने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उपदेश दिला.त्याचप्रमाणे  मागासलेल्या समाजाला स्वच्छतेचे महत्व सांगितले.आपली जर शिकण्याची इच्छा असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण परदेशात जाऊनही शिकू शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले असे सांगितले
श्री. एस. पी. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अपार ज्ञानाच्या जोरावर अहोरात्र जगातल्या विविध देशांच्या घटनांचाअभ्यास करून आपली आदर्श व सर्वात मोठी तसेच सर्व भारतीय ,विविध जाती-धर्माच्या नागरिकांना न्याय देणारी व सामावून घेणारी घटना लिहिली. यावरून त्यांची विद्वत्ता संपूर्ण जगाला दिसून आली.आपल्या देशातील दलित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. असे स्पष्ट केले.
यावेळी पर्यवेक्षक श्री. एस.जी.खोराटे, श्री.आर.जी.कुं भार,श्री. संजयकुमार पाटील, श्री.कृष्णा दावणे,श्री.पी. व्ही.पाटील, श्री.विलास गवारी,सौ. व्ही.जे.शेलार, सौ.एस.डी. ईलगे, सौ.व्ही. ए.वडवळेकर, श्रीमती ए.के. गुरव,श्री.शिवाजी पारळे, श्री. एस.व्ही. कांबळे,श्री.एम.ए.पाटील, श्री.जी.ए. पाटील, तसेच माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

किसान संघर्ष समितीची १३ रोजी विजयी मिरवणूक

आजरा तालुका किसान संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दि.१३ रोजी आजरा येथे किसान आंदोलन विजयी मिरवणुक काढणेत येणार असल्याची माहिती कॉ. शांताराम पाटील यांनी दिली. शेती व शेतकऱ्यांचे अधिकार नाकारणारे विद्यमान केंद्र सरकारने मंजुर केलेले तीन काळे कायदे शेतकऱ्याच्या १ वर्षाच्या प्रदीर्घ रेट्यानंतर केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. हा विजय भारतीय शेतक-यांचा एकजुटीच आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या न्याय व समता याची जपणुक करणाऱ्या संविधानाचा विजय आहे असे स्पष्ट करत लालुक्यातील शेतकरी बांधवांनी १३ डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याजवळ एकत्र यावे असे आवाहनही केले  आहे. यावेळी कॉ. दौलत राणे
कॉ.काशिनाथ मोरे, कॉ. तानाजी देसाई, बी.के.
कांबळे, पद्‌मिनी पिळणकर,राजा शिरगुप्पे,कॉ.निवृत्ती मिसाळ,कॉ. संपत देसाई,
कॉ. संजय घाटगे,कॉ. प्रतिभा कांबळे,कॉ. शिवाजी गुरव उपस्थित होते.
‌‌

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेवर चाकू हल्ला :आजरा येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

आंबोली घाटात चिरा डंपर कोसळला…सौ. संजीवनी सावंत यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव…क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे घवघवीत यश…चंद्रशेखर फडणीस यांची निवड

mrityunjay mahanews
error: Content is protected !!