

दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेवर हल्ला :आजरा येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद
आजरा येथील लिंगायत गल्लीत राहणाऱ्या सौ. प्रभावती मल्लिकार्जुन हेरेकर या 65 वर्षीय महिलेवर तिच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने चाकूचा हल्ला केल्याप्रकरणी आजरा पोलिसांनी कौशिक महादेव गवंडळकर (रा. रामदेव गल्ली, आजरा) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सदर घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत आजरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कौशिक हा फिर्यादी सौ. हेरेकर या त्यांच्या घराच्या समोरील दरवाजा बंद करण्यासाठी जात असताना , त्यांच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये लपून बसलेला होता. त्याने आपल्या तोंडाला मास्क, हाताला ग्लोज घालून व हातात दोरी घेऊन सौ. हेरेकर यांच्या मानेभोवती दोरीने जोरात धरून त्यांना बेडरूम मध्ये ओढत नेऊन लोखंडी कॉट वर ढकलले व त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या ओढत असताना हेरेकर यांनी त्याला विरोध करत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्यातूनही पुन्हा कौशिक याने उठून एका हाताने त्यांचे तोंड दाबून धरून दुसऱ्या हाताने त्यांचा गळा दाबून लागला. यावेळी सौ. हेरेकर यांनी त्यांच्या हाताचा जोरदार चावा घेतला. या झटापटीत हेरेकर यांच्या ओठावर व डाव्या गालावर कौशिक याने चाकूने जखम केली असे सौ. हेरेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या वेळी सौ. हेरेकर यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कौशिक याला बेदम चोप दिल्याचे समजते. हेरेकर यांच्या फिर्यादीवरुन कौशिक गवंडळकर याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






शनिवारी राज्यात 2040 नव्या रुग्णांची नोंद, मुंबईने टेन्शन वाढवलं
♦️राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 40 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे, मागील 24 तासांत दोन हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलेय. शनिवारी मुंबईत 867 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या
शनिवार – 2040
शुक्रवार – 1975
गुरुवार – 1877
बुधवार – 1847
मंगळवार – 1782
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 2048 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,10,243 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 2040 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.
सक्रीय रुग्ण किती?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 11847 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये चार हजार 624 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाणे 1401, पुणे 2119, नागपूर 652 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी सक्रीय रुग्ण परभणीमध्ये आहेत. परभणीमध्ये 14 सक्रीय रुग्ण आहेत.
*राज्यात आज सर्वाधिक रुग्ण कुठे आढळले?*
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2040 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 80,70,258 इतके झाले आहेत. राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये आज 867 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपामध्ये 159 रुग्ण आढळले. राज्यात इतर ठिकाणी 100 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सोलापूर मनपामध्ये आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जळगाव, परभणी आणि अमरावती मनपामध्ये फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील स्थिती काय?
देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.
(बातमी सौजन्य: मराठी बातम्या)



