
आजरा आगार व्यवस्थापक विनय पाटील यांचा आकस्मिक मृत्यू

आजरा येथील आजरा आगाराचे व्यवस्थापक विनय धनंजय पाटील (वय 45 वर्षे ) यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे आज निदर्शनास आले.आजरा -आंबोली मार्गावरील राहत्या घरामध्ये त्यांचा मृतदेह
. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विनय पाटील हे काल बुधवारी दुपारी कामावरून त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर आज गुरुवारी ते कामावर न आल्याने येथील सुरक्षारक्षकाने त्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनही लागत नसल्याने अखेर त्यांच्या निवासस्थानी जाऊन खिडकीतून पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळला .तातडीने सदरची माहिती आजरा पोलिसांना देण्यात आली .आजरा पोलिसांनी दरवाजा तोडून निवासस्थानामध्ये प्रवेश केला असता पाटील हे तोंडाला फेस आलेल्या मृत अवस्थेत असल्याचे आढळले त्यांना तातडीने आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अधिक चौकशी केली असता पाटील यांचा झोपेतच मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत .पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून ते मूळ कोल्हापूर येथील रहिवासी आहेत.
सदरचे वृत्त समजताच आजरा शहरवासीयांनी त्यांच्या आंबोली रस्त्यावरील निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.



सप्टेंबर अखेर पर्यंत सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार….
श्रमिक मुक्ती दलासोबतच्या बैठकीत पुनर्वसन अधिकाऱ्यांचे आश्वासन
पारपोली व गावठाण या गावातील घरांच्या संपदानाबरोबरच जमीन वाटपासह इतर प्रश्न मार्गी लावण्याचा कालबध्द कार्यक्रम आज आजरा येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला. बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता एस आर पाटील, श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्यासह प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत खालील महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पारपोली व गावठाण मधील घरांचे संपादन लवकर पूर्ण करून पावसाळ्यानंतर लगेच निवाडा जाहीर करून घरांच्या संपादन रकमेचे वाटप करण्यात येईल. ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी व भूखंडांची मागणी केली आहे त्यांना सप्टेंबर अखेर जमीन वाटपाचे आदेश देऊन पावसाळा संपला की जमिनीचा ताबा देण्यात येईल. लाभक्षेत्रात वाटप झालेल्या चढ -उताराच्या जमिनी सपाटीकरण व खडकाळ जमिनीवर माती टाकून त्या कसण्यालायक करून दिल्या जातील. पारपोली येथील गायरान जमिनी संपादित केल्या असून त्याचे सपाटीकरण करून जमिनीचे प्लॉटिंग केले जाईल व त्यानंतरच त्यांचे वाटप केले जाईल.
पारपोली आणि गावठाण ही गावे विस्थापित होऊन पुनर्वसित होत असल्याने खेडगे गावाला स्वतंत्र महसूल गावचा दर्जा दिला जाईल त्याचा प्रस्ताव लवकर तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी साठी पाठवण्यात येईल. गट नं १२५ मधील खातेदाराना स्वतंत्र त्यांच्या त्यांच्या क्षेत्राप्रमाणे संपादनाची रक्कम दिली जाईल त्यासाठी भूमी अभिलेख कार्यलयाकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल. यासह सार्वजनिक व अनेक वैयक्तिक प्रश्नावर चर्चा होऊन त्याच्या अमलबाजवणीचा कालबध्द कार्यक्रम ठरविण्यात आला.
यावेळी तहसीलदार विकास अहिर, उपअभियंता एस वाय पाटील, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अमरसिंग ढोकरे, तुकाराम गुंजाळ, श्रावण पवार, धोंडिबा सावंत, वसंत राणे, एकनाथ गुंजाळ, गोविंद पाटील, महादेव पाटील, मारुती ढोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने हजर होते.




