mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


आजरा सूतगिरणीत कामगाराचा

आकस्मिक मृत्यू

                     आजरा: प्रतिनिधी

        येथील अण्णा -भाऊ सूतगिरणीच्या कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रमेश गणपती सावेकर ( वय ५२) रा. सोहाळे यांचा अचानक पणे चक्कर येऊन मृत्यू झाला.महादेव हरी गोईलकर यांनी आजरा पोलिसात याबाबत वर्दी दिली आहे.

      पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास रमेश हे आण्णा-भाऊ आजरा तालूका शेतकरी सूतगिरणी येथे काम करीत असताना त्यांना अचानक चक्कर आली. उपचारासाठी आजरा रूग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.


पेद्रेवाडीत आगीचे तांडव…
काजू पिकासह लाखोंचे नुकसान

                     आजरा : प्रतिनिधी

       आजरा- महागाव मार्गावर पेद्रेवाडी फाट्यानजीक काल दुपारी लागलेल्या आगीत काजूसह अनेक वृक्ष आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न स्थानिक नागरिकांकडून सुरू होते.

        दुपारच्या वेळी लागलेली आग विझवण्यासाठी नागरिकांना बरीच कसरत करावी लागली. मोहरलेल्या आंबा व काजू पिकासह अनेक वृक्ष आगीत होरपळून गेले असून याचा फटका संबंधित उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

        वाटंगी येथे दोन दिवसापूर्वी दहा एकरवर उसाला लागलेल्या आगीनंतर पुन्हा एक वेळ मोठ्या प्रमाणावर लागले ल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.


मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत स्मृती दालनाचे रविवारी उद्घाटन…

                    आजरा : प्रतिनिधी

        आजरा येथे जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उद्घाटन रविवार दिनांक १८ रोजी सकाळी १०-३० वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे .

       सदर कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळ महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे,आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन.पाटील, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी अमोल येडगे, श्रीमती मृणालिनी सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.


आज-याच्या पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणार : आ.प्रकाश अबिटकर
पारेवाडी येथे ‘निसर्ग रिसाँर्ट ‘चे उद्घाटन

                    आजरा : प्रतिनिधी

        आजरा तालूक्यात रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.पारेवाडी येथे आजरा कृषी व निसर्ग पर्यटन संस्था निर्मित निसर्ग रिसाँटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील होते.

       आमदार आबिटकर म्हणाले,आजरा हा निसर्ग संपन्न परिसर आहे.त्यामूळे येथे पर्यटन व्यवसायाला संधी आहे.नैसर्गिक सौंदर्याला बाधा न आणता व्यवसाय करण्याची गरज आहे.यामूळे रोजगार निर्मिती होणार असून याला चालना देण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करणार आहे.

        जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले,तालूक्यातील तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता पर्यटनाला अनुकूल उद्योग-व्यवसाय करण्याची गरज आहे.माजी मंत्री पाटील यांनी पर्यटन व्यवसायाला शासनाने अनुदान देणेबाबत निर्णय घेण्याची मागणी केली.

      याप्रसंगी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई,डाँ.अनिल देशपांडे,नामदेव नार्वेकर,जी.एम. पाटील,विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक सुभाष विभूते यांनी केले.नाथा देसाई यांनी आभार मानले.


भाजपाचे मसोली येथे ‘ गाव चलो ‘ अभियान

                    आजरा ; प्रतिनिधी

          आजरा तालुक्यातील मसोली येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ गाव चलो अभियान ‘ अंतर्गत नागरिकांशी संवाद साधला गेला.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष रुपेश परीट,भाजपा युवामोर्चा तालुका सरचिटणीस राहुल पेंडसे, भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष शुभम पाटील, ओबीसी सेल चिटणीस गौतम भोसले, तालुका महिला मोर्चा उपाध्यक्ष नंदाताई गुरव, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


दुष्काळी उपाययोजनांची अमलबजावणी करा : मनसेची मागणी 

                      आजरा: प्रतिनिधी

           राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने १५०० महसूल मंडळामध्ये अधिकृत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी निकषात उर्वरीत महसूल मंडळे बसत नसल्याचे कारण देत राज्यातील उर्वरित महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला नाही. परंतु ज्या महसूल मंडळामध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला नाही तेथे दुष्काळी उपाययोजनांची अमलबजावणी झालेली नाही. याबाबतचे निवेदन आजरा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृषीमंत्र्याना पाठवले असून तहसीलदारांना निवेदनाची प्रत दिली आहे.

         यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने खरीप व रब्बी हंगाम हातचा गेला आहे. राज्यातील १५०० महसूल मंडळात अधिकृत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तेथे दुष्काळी उपाययोजनांची अमलबजावणी केलेली नाही. ती करावी अशी मागणी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावे. दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, पाण्याअभावी वाळत असलेला ऊस कारखान्यांनी तातडीने न्यावा किंवा तो ऊस चारा म्हणून एफआरपी दराने खरेदी करावा. दुष्काळी महसूल मंडळांना सरसकट पीक विमा देण्यात यावा तसेच रब्बीचाही पिकविमा सरसकट मिळावा, यासह विविध मागण्या केल्या आहेत.

निवेदनावर जिल्हा अध्यक्ष नागेश चाग्ले, महाराष्ट्र सैनिक सुधीर सुपल, तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, अंकुश लोहार, विभाग अध्यक्ष वसंत सावंत यांच्या सहया आहेत.


छाया वृत्त…


         आजरा येथील नवीन महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. काम वेगाने असले तरी कामाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी गटर्सवर घालण्यात आलेले स्लॅब कोसळला असल्याने नागरिकांतून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.


        पुन्हा एक वेळ आजरा येथे व्यंकटराव हायस्कूल समोरील नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.



कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा आजरा मार्फत पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसेसाठी पेपर देण्यात आले. आजरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते पेपर प्रदान करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी विलास पाटील, सुनित चंद्रमणी व श्री पाटणे या वेळी उपस्थित होते.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!