शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४




मुहुर्त मिळाला…
अखेर शहरात गतिरोधक झाले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातून जाणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून आजरा शहरवासीयांसह वाहनधारक व अन्याय निवारण समितीकडून केली जात होती. या मागणीची दखल घेत अखेर आजरा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध भागामध्ये रस्त्यावर पट्टे मारून गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. पट्टे मारून सदर गतिरोधक केल्याने शालेय मुले व इतरांच्या दृष्टीने होणारे अपघातासारखे धोके कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरवासीयांतून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
महामार्ग कधी उजळणार…?
नवीन महामार्ग जाणाऱ्या विविध गावांमध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूला पथदिवे लावण्यात आले आहेत. परंतु अद्यापही ते सुरू नसल्याने हे पथदिवे कधी सुरू करणार व महामार्ग कधी उजळणार ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.



आजरा तालुक्यात बांबू हब बनण्याची क्षमता : आशुतोष जाधव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा तालुका बांबू उत्पादनासाठी अग्रेसर आहे. आजरा हा बांबूचा हब बनु शकतो. उत्पादनाबरोबर प्रक्रिया उद्योगासह मुल्यवर्धन साखळी विकसीत करायला हवी. यातून मोठ्या प्रमाणात महीला व तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. असा विश्वास नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव यांनी केले.
आजरा येथे बांबू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. या वेळी श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनिलकुमार, ॲड, विकास पाटील, भूमि उत्पादक शेतकरी गट चिमणेचे अध्यक्ष वसंत तारळेकर, माजी सभापती निवृत्ती कांबळे प्रमुख उपस्थित होते. हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट व आजरा बांबू कल्स्टर फौंडेशनच्यावतीने मेळावा झाला.
हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाचे सचिव सतिश कांबळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात बैठकीचा हेतू स्पष्ट केला. श्री. जाधव म्हणाले, बांबू या पिकात खुप मोठी संधी आहे. नाबार्डने नाविण्यपूर्ण प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्याचे सुरु केले आहे. बांबू उत्पादक शेतकरी संघटीत झाल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. डॉ. सुनिलकुमार म्हणाले, बांबू लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी काही वर्ष वाट पहावी लागते. याऐवजी सुरवातीच्या काळापासून शेतकऱ्यांना बांबू लागवड, त्यातील आंतरपिक संशोधनाच्या पातळीवरील आवश्यक मदत केली जाईल.
या वेळी झालेल्या चर्चत कृष्णा वरेकर, शिवाजी गुरव, संजय घाटगे, कृष्णा सावंत, बाबासाहेब पाटील, शिवाजी इंगळे, दीपक डोंगरे, सुरेश कालेकर, के. डी. पाटील यांनी चर्चत भाग घेतला. या वेळी प्रशांत कांबळे, आप्पासो पाटील, अबदुलवाहीद सोनेखान, विजय कांबळे, सुभाष कोरी, अशोक पोवार, विश्वास तानवडे, नामदेव चव्हाण, भाऊ तारळेकर, श्रीपती पाटील यासह शेतकरी उपस्थित होते. रणजित कालेकर यांनी आभार मानले.



‘व्यंकटराव’ येथे क्रांतीज्योती म. ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेत पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन पूर्वा इंजल व आर्या हेब्बाळकर यांनी केले. शालिका राठोड हिने स्वरचित कविता व ओमकार हसबे यांने आपले विचार मांडले. उच्च विद्या विभूषित महात्मा फुले यांनी त्यावेळी स्त्री शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आणि सावित्रीबाईच्या मदतीने शाळा सुरू केली त्यावेळेला त्यांना समाजातून आलेले बरे वाईट अनुभव नाटीकेच्या सादर करण्यात आले.
विलास गवारी यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. महात्मा फुले यांचे शिक्षण, स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी घेतलेले निर्णय, आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी संयमाने उभारलेला लढा. दीन- दलित ,दुःखी पिडीत यांचे बद्दल त्यांच्या मनात असणारे अपार प्रेम तसेच अस्पृश्यतानिवारण यासाठी त्यांनी उचललेले पाऊल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन त्यांची जयंती साजरी केली या सर्वांची दखल घेत इंग्रज गव्हर्नरनी त्यांचा केलेला यथोचित सन्मान याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार चिराग घोळसे यांनी मानले.


प्रेमानंद खरुडे यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धनगरमोळा ,आजरा येथील प्रेमानंद खरूडे यांची गवसे पंचायत समिती गणात विभाग प्रमुख म्हणून निवड करणेत आली. आजरा शिवसेना पक्ष कार्यालयात समारंभ पुर्वक शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री. राजेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख श्री संजय पाटील यांनी निवडीचे पत्र दिले त्यां प्रसंगी शहर प्रमुख विजय थोरवत, दयानंद निऊंगरे व इतर शिवसैनिक हजर होते.


आज-यात आज महाप्रसाद व दशावतारी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील श्री मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आज दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रात्री नऊ वाजता अष्टविनायक दशावतार नाटक मंडळाची (निरवडे /सावंतवाडी) यांचे दशावतारीचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
सुतार गल्ली येथील मरगुबाई मंदिर परिसरात सदर कार्यक्रम होणार आहे.





