mrityunjaymahanews
अन्य

वाटंगी येथे आमदार खासदारांना रोखले…

वाटंगी येथे मराठा समाज आक्रमक..

खासदार व आमदारांना ‘जलजीवन ‘ च्या उद्घाटनापासून रोखले


                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

      मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता आजरा तालुक्यातील ग्रामीण भागावतही उमटू लागले असून आज वाटंगी येथे होणाऱ्या जलजीवन मिशन योजना अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्यापासून स्थानिक खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांना ग्रामस्थांनी रोखले. अखेर या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत खासदार मंडलिक व आमदार राजेश पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन न करण्याचा निर्णय घेत आरक्षणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

      यावेळी खासदार व आमदारांच्या गाडीखाली जाण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांनी केला पोलिसांनी तो कार्यकर्त्यांना बाजूला करून हाणून पाडला.

      वाटंगी येथे आज जलजीवन मिशनचे पाणी योजनेचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होते या पार्श्वभूमीवर जय्यत तयारीही करण्यात आली होती परंतु मराठा समाजाने आक्रमक होत संघटित रित्या या उद्घाटन सोहळ्यास विरोध करण्याचे ठरविले. सकाळपासूनच वाटंगी येथील बस स्थानक परिसर व गावांमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातामध्ये काळी निशाण घेऊन यावेळी सर्व नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेश नाही अशी भूमिका घेत निषेधाच्या घोषणा दिल्या.

       दरम्यान खासदार मंडलिक व आमदार पाटील यांचे गावांमध्ये आगमन झाल्याबरोबर त्यांच्या गाडीखाली जाण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हा प्रयत्न रोखला. ग्रामस्थांच्या वतीने विजय देसाई, सदानंद देसाई, संदीप देसाई , गणपत  कानडे, बाळू तेजम, चंद्रकांत देसाई यांनी मराठा समाज बांधवांच्या भावना खासदार मंडलिक व आमदार पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या आमचा उद्घाटनाला विरोध नाही परंतु मराठा आरक्षणाची कागदपत्रे घेऊनच या आणि मग उद्घाटन करा उद्घाटन तुमच्याच हस्ते होईल असेही यावेळी सांगितले.आंदोलकांच्या वतीने खास.मंडलिक व आम.पाटील यांना निवेदन देण्यात आले.

       कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण हे उद्घाटन करत नसल्याचे यावेळी खासदार मंडलिक व राजेश पाटील यांनी जाहीर केले मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारमध्ये आवश्यक ते प्रयत्न करण्यास आपण बांधील आहोत आपणही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत असेही दोघांनी स्पष्ट केले.

        यावेळी मराठा बांधव यांच्यासह वाटंगीचे ज्येष्ठ नेते अल्बर्ट डिसोजा,एम.के. देसाई जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,अनिल फडके, संभाजी पाटील,सुभाष देसाई, भिमराव वांद्रे, भिमराव सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाण्याचे कलश घेऊन महिलांचा सहभाग..

योजनेच्या उद्घाटनासाठी पाण्याचे कलश घेऊन स्थानिक महिला उपस्थित होत्या. परंतु उद्घाटन न झाल्याने पाण्याचे कलश तसेच घेऊन येथून महिला माघारी परतल्या.

शिक्षण आमच्या हक्काचे…

आज-यातून लॉंग मार्च सुरू

सरकारवर विश्वास नसल्याचा आरोप


                  ◼️आजरा ; प्रतिनिधी◼️

        महाराष्ट्रातील सरकारची भांडवलशाही व खाजगीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सर्वसामान्य व बहुजनांना शिक्षणापासून वेगळे करण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळेच शिक्षण क्षेत्रात अन्यायकारक असे निर्णय धडाधड घेतले जात आहेत. शासनाकडून केवळ आश्वासने देण्याचा प्रयत्न सुरू असून जे सरकार जरांगे यांना फसवू शकते ते आम्हाला का फसवणार नाही ? असा सवाल उपस्थित करत शाळा बचाव समितीच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानाच्या दिशेने आजरा येथून लॉंग मार्च सुरू करण्यात आला आहे.

     जोपर्यंत सरकार शिक्षण विरोधी निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच राहणार असे यावेळी काँ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.

        या लॉंग मार्चमध्ये तालुक्यातील नेतेमंडळींसह सर्वसामान्य स्त्री पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

                   सहभागी मंडळी

      कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, जयवंतराव शिंपी, संभाजीराव पाटील, अनिल फडके, रणजित देसाई, कॉ. शिवाजी गुरव, संभाजी बापट, सुनील शिंदे, युवराज पोवार, मारुती मोरे, मायकल फर्नांडिस, बंडोपंत चव्हाण, संभाजीराव इंजल, विठ्ठलराव देसाई, डॉ. नवनाथ शिंदे, बयाजी मिसाळ, निवृत्ती कांबळे, हरिबा कांबळे, अमर चव्हाण, बाळेश नाईक

                  जोरदार घोषणाबाजी

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लॉन्ग मार्चला सुरुवात झाली यावेळी हलगीसह जोरदार घोषणांनी आजरा बाजारपेठ दुमदुमून गेली.

हत्तीचा प्रश्न मार्गी लावा… मगच मृतदेह ताब्यात घेणार

पश्चिम विभागातील कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे वातावरण तंग


                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       वन्य प्राण्यांपासून संरक्षणाची वेळोवेळी मागणी करूनही वनविभाग सुस्त असल्याने आणखी किती माणसे घालवणार? असा प्रश्न उपस्थित करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्याच्या पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी चांगले धारेवर धरले. प्रथम हत्तीचा बंदोबस्त करा मगच मृत प्रकाश पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार अशी भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. अखेर परिक्षेत्र वनाधिकारी व उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या आश्वासनानंतर वातावरण निवळले.

         शनिवारी सकाळी हत्ती हूसकावून लावण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रकाश गोविंद पाटील या ५३ वर्षीय वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर गवसे, घाटगरवाडी, किटवडे, अंबाडे, लिंगवाडी,मसोली सह पश्चिम भागातील शेतकरी आक्रमक झाले. शवविच्छेदनासाठी पाटील यांचा मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयाजवळ आणल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी रुग्णालयासमोर जमा झाले. झाल्या घटनेला वनखाते जबाबदार असल्याचा आरोप करत जोपर्यंत हत्तीसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली.

        यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, मारुती डोंगरे आदींनी स्थानिक वनाधिकाऱ्यांची तातडीने बदली करा अन्यथा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला.

      उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद ,सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली अखेर मृत पाटील यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक सहाय्य करण्याबरोबरच वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. यावेळी पाटील यांना वन शहीद म्हणून यापुढे ओळखले जाईल असेही जी.गुरूप्रसाद यांनी स्पष्ट केले.

    महिन्यात दोघांचा मृत्यू…

      ऑक्टोबर महिन्याच्या दोन तारखेस उस्मान कानडीकर या ६५ वर्षीय वृद्धाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, तर महिनाअखेरीस काल दिनांक २८ रोजी हत्तीच्या हल्ल्यात प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाला. महिनाभरात घडलेल्या या दोन घटनांमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

खबरबात ग्रामपंचायत निवडणुकीची…

इटे ग्रामपंचायतीकरता दुरंगी                   लढत

       इटे ता. आजरा या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता रबळनाथ ग्राम विकास आघाडी व चाळोबादेव परिवर्तन आघाडी या दोन आघाड्यांमध्ये थेट लढत होत आहे.रवळनाथ विकास आघाडीचे नेतृत्व विलास पाटील तर चाळोबादेव परिवर्तन आघाडीचे नेतृत्व रामचंद्र पाटील,शिवाजी रामा पाटील करीत आहेत.

◼️◼️◼️अशी आहे लढत...


◼️◼️◼️प्रभाग १.

रवळनाथ विकास आघाडी

सौ.गीता विष्णू सुतार व सौ प्रियांका अनिल पेडणेकर नामदेव भैरू फगरे

विरुद्ध

चाळोबादेव परिवर्तन आघाडी
सौ. पूजा पुंडलिक परीट व सौ. जयश्री गणपती पाटील
विलास बाळकू पाटील


◼️◼️◼️प्रभाग २

रवळनाथ विकास आघाडी
सौ. सुरेखा युवराज कांबळे, विलास शामराव पाटील

विरुद्ध

चाळोबादेव परिवर्तन आघाडी
सौ मनीषा किरण चव्हाण, विजय पांडुरंग तेजम


◼️◼️◼️प्रभाग ३

रवळनाथ विकास आघाडी
सौ.सुरेखा बंडू पाटील
लक्ष्मण बाळू पाटील

विरुद्ध

चाळोबादेव परिवर्तन आघाडी
अंजना मारुती पाटील
संदीप रामचंद्र पाटील


🟣🟣सरपंच लढत…

सौ.ज्योती आनंदा चव्हाण
(रवळनाथ विकास आघाडी)

विरुद्ध

सौ.शीतल आनंदा कांबळे
(चाळोबादेव परिवर्तन आघाडी)

देऊळवाडी येथे सरपंचपदी सौ. यशोदा पोवार बिनविरोध

एका जागेसाठी लढत……

                      ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

        देऊळवाडी – सातेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदी सौ. यशोदा युवराज पोवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचे पाच सदस्य बिनविरोध निवडून आले असून एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे 

🟣प्रभाग १- संजयभाई महादेव सावंत, सौ.सुमन राजाराम पोतनीस,सौ. स्नेहल गोपाळ कदम

🟣प्रभाग २- सौ. प्रियांका जोतिबा खोत
🟣प्रभाग ३- सौ. माधुरी मंगेश पोतनीस

प्रभाग दोन मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील एका जागेसाठी संतराम बाबू सावंत व तुळसाप्पा अण्णाप्पा पोवार यांच्यात थेट लढत होत आहे. प्रभाग तीन मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील जागा रिक्त राहिली आहे.

बाबुरावजी कुंभार यांचा उद्या स्मृतिदिन
मान्यवरांचा होणार गौरव


                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते स्व. बाबुरावजी कुंभार यांचा सातवा स्मृतिदिन उद्या सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी असून यानिमित्त आजरा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा कार्यगौरव करण्यात येणार आहे.

       जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थिती होणाऱ्या या कार्यक्रमास अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, प्रा. डॉ. सुधीर मुंज, संभाजीराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता सदर कार्यक्रम होणार असल्याचे स्वर्गीय बाबुरावजी कुंभार गौरव समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण प्रश्न…

भावेवाडी व वाटंगी ग्रामस्थ आक्रमक


                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       मराठा आरक्षण बाबत आजरा तालुक्यातही आता संतप्त प्रतिक्रिया लागल्या असून तालुक्यातील वाटंगी व भावेवाडी येथील ग्रामस्थांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळी व राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्याचे फलक सोशल मीडिया वरून व्हायरल केले आहेत.

       आज रविवारी वाटंगी येथे खा. संजय मंडलिक व आम. राजेश पाटील यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास खासदार मंडलिक व आमदार पाटील उपस्थित राहणार का ? याबाबत आता तालुकावासीयांना कुतूहल लागून आहे.



 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!