mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.२६ फेब्रुवारी २०२६

अग्नी तांडव…
शंभर एकर क्षेत्र भक्ष्यस्थानी
वीस लाखांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील सरंबळवाडी, मलिग्रे, कानोली परिसरात बुधवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये सुमारे १०० एकर क्षेत्रावरील काजूच्या झाडांसह मेसकाठी, बांबू, पिके, गवतासह इतर वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी सर्वच क्षेत्र जळीत झाल्यानंतर आग आपोआप विझली. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की…

बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कानोली परिसरात आग लागल्याचे स्पष्ट झाले. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दुपारची वेळ असल्याने अल्पावधीतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग सरंबळवाडी व मलिग्रेच्या दिशेने पसरत गेली. यामध्ये शिवाजी पाटील, संभाजी पाटील, सुमन पाटील, अमित पाटील, सविता पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची आंबा व काजूची झाडे, मेस काठ्या, बांबू, गवत व इतर पिके जळून खाक झाली.

सुमारे तीन तास आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु यामध्ये ग्रामस्थांना यश आले नाही आगीमध्ये अंदाजे वीस लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते.

सलग दुसऱ्या वर्षी आग…

गतवर्षीही याच भागामध्ये आग लागून मोठे नुकसान झाले होते. सदर आग हेतू पुरस्सर लावली जात असल्याचा संशयही आता व्यक्त केला जात आहे.

आज निघणार शिक्षण यात्रा…
सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आज गुरुवारी ‘ शाळा वाचवा शिक्षण वाचवा ‘ अभियानांतर्गत वस्ती तिथे शाळा अन वर्ग तिथे शिक्षक ‘ मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह सरकारच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी निघत असलेल्या शिक्षण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनील शिंत्रे होते.

यावेळी कॉ. संपत देसाई, प्रा.नवनाथ शिंदे, युवराज पोवार, संभाजी बापट, देवदास बोलके, विक्रम देसाई, कॉ.शांताराम पाटील, दशरथ घुरे यांची प्रमुख उपस्थित होती.

सुरुवातीला शिक्षण हक्क यात्रेचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी आंदोलनामागील भूमिका सांगून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले. प्रा. सुनील शिंत्रे यांनी आंदोलनाच्या तयारीत आपण सर्वांनी तन-मन-धन अर्पण करून उतरावे. उद्या सुरू होणारी ही यात्रा कोल्हापुरात २८ रोजी पोहोचेल. तिथे शिक्षणात परिषदेने या यात्रेची सांगता होईल.

यावेळी संभाजी बापट, उमाजी कुंभार, एकनाथ गिलबिले, रामदास मोरवाडकर यांनीही काही सूचना केल्या. आज होणाऱ्या यात्रेत तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीने या सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.

चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रा आजरा येथे आल्यानंतर ठीक १ वाजता छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तहसील कार्यालयावर जाईल.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार : जि.प. सदस्य सुधीर देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाने स्वतः उमेदवार समजून जिल्हा परिषद निवडणूक हातात घेऊन प्रचंड मताधिक्य दिले. यामुळे त्यांच्या ऋणात कायमस्वरूपी आपण राहू. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यास आपण बांधील आहोत,असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुधीर देसाई यांनी केले. सुळेरान ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सरपंच शशिकांत कांबळे यांच्या हस्ते श्री. सुधीर देसाई व उपसरपंच जयश्री पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्या सौ. यशोदा पोवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंगणवाड्यांकरीता देसाई व सौ. पोवार यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. दोन वर्षे गावच्या सरपंच पदाची धुरा आपण वाहीली असून सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही असे सौ. यशोदा पोवार यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, स्वाती शेडगे, शुभांगी शेडगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक पाटकर, जयसिंग पाटील, चंद्रकांत जाधव, शंकर सुतार, बावतीस बारदेकर, चंद्रकांत खरुडे उपस्थित होते.

ग्रामपंचायत अधिकारी सूर्यकांत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मायकल बारदेसकर यांनी आभार मानले.


निधन वार्ता

गुंडू साळूंखे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील स्क्रॅप व्यापारी गुंडू बापू साळुंखे ( वय ६० वर्षे ,रा. नेवरेकर कॉलनी) यांचे हृदयविकाराने काल बुधवारी निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा,चार  मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

‘ एक मूठ धान्य शिव संकल्प ‘ मोहिमेस उत्तूर परिसरात प्रतिसाद


उत्तूर ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर परिसरात सुरू असलेली ‘ एक मूठ धान्य शिव संकल्प ‘ ही मोहीम सध्या समाजातील एकजुटीचे आणि माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अनाथ मुले आणि निराधार वयोवृद्ध यांच्या थाळीत पौष्टिक अन्न पोहोचावे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, शैक्षणिक संस्था, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात डाळी, मूग, मटकी, हरभरा यांसारखी प्रथिनयुक्त कडधान्ये जमा होत असून त्यासोबतच शेंगदाणे, गूळ आणि इतर जीवनावश्यक धान्यही संकलित केले जात आहे. कडधान्ये ही प्रथिनांचा उत्तम स्रोत मानली जातात. वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी लोहयुक्त आणि तंतुमय आहार आवश्यक असतो. गुळामधील नैसर्गिक साखर आणि लोह शरीराला ऊर्जा देते, तर शेंगदाणे शरीराला आवश्यक पोषणमूल्ये पुरवतात. त्यामुळे या मोहिमेतून केवळ अन्नच नव्हे तर आरोग्यदायी पोषण देण्याचा प्रयत्न होत आहे. समाजातील विविध स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विशेषत परिसरातील शाळा व महाविद्यालयांनी सामाजिक बांधिलकी जपत भरघोस धान्य देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

उत्तूर महावितरण शाखांचे नव्या इमारतीत स्थलांतर ; २ मार्चपासून कामकाज सुरू

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ता.आजरा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या शाखा क्रमांक १ व २ यांचे आजरा रस्त्यावरील धुरे मंगल कार्यालयाजवळील नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवार, दि. २ मार्च रोजी औपचारिक उद्घाटनानंतर नव्या कार्यालयातून नियमित कामकाज सुरू होणार आहे.

शाखा क्रमांक १ अंतर्गत उत्तूरसह पाच गावांचा समावेश असून, शाखा क्रमांक २ अंतर्गत चौदा गावे येतात. दोन्ही शाखांचे कार्यालयीन वेळापत्रक सकाळी ९ ते सायंकाळी ५ असे राहणार आहे. ग्राहकांनी कार्यालयाच्या बदललेल्या पत्त्याची नोंद घ्यावी आणि आवश्यक कामकाजासाठी नव्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण उत्तूर कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

आजचे पंचांग

♦ दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६
♦ वार : गुरुवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : दशमी तिथी (२७ फेब्रुवारी रात्री १२.३३ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
♦ नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (दुपारी १२.१० पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
♦ योग : प्रीति योग (रात्री १०.३२ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
♦ करण : तैतुला करण (दुपारी १.३६ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
♦ चंद्र राशी : मिथुन राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी २.१९ ते दुपारी ३.४७ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२८ ते दुपारी १.१५ 
♦ सूर्योदय : सकाळी ७.०१
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४२
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!