mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.२७ फेब्रुवारी २०२६

संच मान्यतेचा शासकीय निर्णय मागे घ्या…
शिक्षण हक्क यात्रेद्वारे शाळा वाचवण्यासाठी तालुकावासीय एकवटले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

१५ मार्च २०२४ रोजी संख्या मान्यतेचा झालेला शासन निर्णय तातडीने मागे घेऊन शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, एकही शाळा बंद पडणार नाही असा नवा अध्यादेश लागलीच लागू करावा. पटसंख्येची अट कायमची रद्द करून वस्ती तेथे शाळा आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळालाच पाहिजे यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कालपासून सुरू झालेल्या शिक्षण हक्क यात्रेच्या निमित्ताने तालुकावासीय एकवटले असून चंदगड पासून सुरू झालेल्या या यात्रेचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजिक करण्यात आले. यानंतर उपस्थित शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानाचे सर्व पदाधिकारी रॅलीने आजारा तहसील कार्यालयाकडे गेले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई,प्रा.सुनील शिंत्रे, कॉ. संपत देसाई यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

राज्यातील वीस पटसंख्या पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून अशा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे, शाळा दत्तक घेण्याचे धोरण म्हणजे शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे यामुळे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे, हे धोरण तातडीने मागे घेण्याची गरज आहे. शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असल्याचे शिक्षक, सुसज्ज इमारती, ग्रंथालय, अभ्यासिका, खेळाचे मैदान या सर्व सुविधा शासकीय शाळांना मिळण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात शिक्षक भरती झालेली नसल्याने राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कला, क्रीडा शिक्षकांसह ही रिक्त पदे तातडीने भरावीत शिक्षकांची आणि अशैक्षणिक कामे थांबवावीत यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.

यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय देवणे, प्रा, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दौलती पाटील, अल्बर्ट डिसोजा, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, शिवाजीराव नांदवडेकर, सुनील शिंदे, मायकल फर्नांडिस, बयाजी मिसाळ, देवदास बोलके, काशिनाथ मोरे, बबन कांबळे, शांताराम पाटील, सुधीर सुपल, महेश पाटील, चंदर पाटील, अमित गुरव, कानोलीच्या सरपंच सौ. सुषमा पाटील, डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे, दशरथ घुरे, प्रकाश मोरुस्कर यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपंचायतीचे १५ लाख ८ हजारांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर

आजरा  घनकचऱ्यासाठी १ कोटीची तरतूद, दु‌कान गाळ्यांची २५ टक्के भाडेवाढ होणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीने सन २०२६-२७ करीता महसूली व भांडवली जमा असे १५ लाख ८ हजारांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये घनकचऱ्यांसाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. २ कोटी ५० लाखांची विशेष वैशिष्ट्यपूर्ण निधी त्याचबरोबर २ कोटींची वैशिष्ट्यपूर्णची निधीची तरतूदही करण्यात आली आहे. नगरलेखापाल दिलीप चिले व लेखा परिक्षक अमोल पाटील यांनी एकूण ४४ कोटी ५६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक नगरपंचायत सभागृहापुढे मांडले.

आजरा नगरपंचायतीची अंदाजपत्रकाविषयी आज विशेष सभा झाली. नगराध्यक्ष अशोक चराटी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे प्रमुख उपस्थित होत्या.

सभेमध्ये उत्पन्न वाढीच्या दृष्टीने नगरपंचायतकडील दु‌कान गाळ्यासाठी पंचवीस टक्के भाडेवाढ त्याचबरोबर महीला बालकल्याण, दुर्बल घटक, शिक्षण, क्रीडा, दिव्यांग निधी यामध्ये वाढ सुचविण्यात आली.

अंदाजपत्रकात मांडलेल्या काही तरतु‌दीबाबत नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या वेळी नगरसेवक विक्रम पटेकर म्हणाले, वाढीव उत्पन्न दाखवून अंदाज पत्रक फुगवण्यापेक्षा वास्तव उत्पन्न दाखवणे गरजेचे आहे.

नगरसेवक परेश पोतदार म्हणाले, वस्तुस्थितीला धरून अंदाजपत्रकात खर्चाच्या तरतूदी कराव्यात. एकदा भरमसाठ तरतुदी केल्या तर त्या खर्च करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामु‌ळे नाहक कांही बार्बीवरचा खर्च वाढत जातो. यावेळी डॉ. स्मिता कुंभार यांनी बजेटपूर्व सभा घेण्याची गरज असतांना काही मोजक्या मंडळीना बोलावून बजेटसह विविध बाबीवर चर्चा केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. सदर प्रकार हा केवळ योगायोगाने घडला असून कोणालाही पूर्व सूचना दिली गेली नसल्याचे नगराध्यक्ष श्री. चराटी यांनी सांगीतले. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने नगरपंचायतीच्या दु‌कानगाळ्यांच्या भाडेवाढीसह विविध विषयावर स्वतंत्र बैठक घेवून चर्चा करण्याचे ठरले. नगरसेवकांनी अभ्यास दौरा व नगरसेवकांचे मासिक बैठक मानधन वाढवण्या करीता तरतुद करण्याविषयी सूचविले.

दृष्टिक्षेपात अंदाजपत्रक…

सन २०२६-२७ करिता एकूण महसूल जमा रक्कम रू.४,९८,८२,७९०/- इतकी अपेक्षित असून एकूण महसूली खर्च रक्कम रू.४,९६,२८,७८९/- इतका अपेक्षित आहे. तसेच एकूण भांडवली जमा रक्कम रू.३०,०१,७३,२५०/- इतकी अपेक्षित असून एकूण भांडवली खर्च रक्कम रू.३८,८९,१८,५००/- इतका अपेक्षित आहे. त्यानुसार एकूण अर्थसंकल्प रक्कम रू. ४४,००,५६,०४०/- चा असून रक्कम रू.१५,०८,७५१/- इतकी शिल्लक रक्कम

अनिकेत चराटी, परशराम बामणे, निशांत चॉद, सरफराज पटेल यांनी सूचना मांडल्या. कलावती कांबळे, अन्वी केसरकर, रहेमतबी खेडेकर, आसावरी खेडेकर, अश्विनी चव्हाण, निसार लाडजी, डॉ . इंद्रजीत देसाई, असिफ सोनेखान यांच्यासह नगरसेवक स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे, पाणीपुरवठा व विद्युत अभियंता मानसी कदम, कर निरीक्षक निहाल नायकवडी, बांधकाम अभियंता प्रविण बैले, वैभव म्हाकवेकर उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी निहाल अत्तार यांनी सभेचे कामकाज सांभाळले.

ना  योग्य जागी निधी… ना सन्मान जनक वागणूक…
नगरसेविका निशांत चॉंद यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

साबाज फार्म हाऊस सारख्या ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही तेथे गरज नसताना लाखो रुपये खर्चून रस्ता तयार केला आहे परंतु दुसरीकडे मदरसा कॉलनी, साई कॉलनी यासारख्या नागरिक राहत असणाऱ्या वस्त्यांमध्ये मात्र दुर्लक्ष होत आहे. नगरसेविका म्हणून धड आपणाला सन्मानाची वागणूक नाहीच परंतु नगरपंचायत निधीचा वापर ही अयोग्य पद्धतीने होत आहे. सर्वसामान्यांना कर्मचारी वर्गाकडून दिली जाणारी वागणुकीची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. निधीची उधळपट्टी सुरू असल्याचाही आरोप करत सत्ताधारी आघाडीच्या नगरसेविका निशांत चांद यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.

सध्या शहरात विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. परंतु बांधकाम परवान्याबाबतची माहिती व्यवस्थित दिली जात नसल्यामुळेच हा प्रकार सुरू आहे. अधिकारी केवळ सभेमध्येच गोड बोलून वेळ मारून नेतात परंतु प्रत्यक्षात सभा संपल्यानंतर त्यांच्याकडून मिळणारी वागणूक ही विचार करण्याजोगी आहे. अल्पसंख्यांकांकरीता असणाऱ्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे त्यासाठी आपला प्रयत्न निश्चित राहणार आहे.

अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष सभेची आदल्या दिवशी रात्री माहिती देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सत्ताधारी गटातील चॉंद यांच्या या पावित्र्यामुळे  निश्चितच नगरपंचायत कारभारामध्ये सुधारणा होण्याची गरज अधोरेखित होत आहे.


शॉर्टसर्किटने आग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मेंढोली पैकी बोलकेवाडी (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत वाटाण्याचे पिक जळून खाक झाले. नागोजी बोलके यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचे घटनास्थळावर चर्चा होती. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

नागोजी बोलके यांचे गावंदर नावाचे शेत आहे. येथे बोलके यांनी दहा गुंठ्यात वाटाण्याचे पिक काढले आहे. हा वाटाणा बोलकेनी काढून मळणीसाठी रचून ठेवला होता. या ठिकाणी वीज वितरण कंपनीची वीज वाहीनीही गेली आहे. वाटाण्याची सायंकाळी मळणी काढण्याचे ठरले होते. आजारी पत्नीला घेवून ते आजऱ्याला उपचारासाठी आले होते. दरम्यान दुपारी रचून ठेवलेला वाटाण्याने पेट घेतला. दुपारचे उन असल्याने आग चांगलीच भडकली होती. परिसरातील शेतकरी आग विझवण्यासाठी धावून घटनास्थळी आली. तोपर्यंत वाटाण्याचे सर्वच पिक जळून खाक झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. बोलके यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजरा हे ‘कोकणाचे प्रवेश‌द्वार’ राहणार का ?

वृक्षप्रेमींचा सवाल : १३ पुरातन वटवृक्ष धोक्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चंदगड – हलकर्णी मार्गाचे काम सुरु आहे. हा मार्ग आजऱ्याजवळून महागावकडे जात आहे. या मार्गाचे रुंदीकरण होणार असल्याने मार्गाजवळील १३ वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही झाडे रुंदीकरणामुळे तोडली जाण्याची शक्यता आहे. ही झाडे वाचावीत यासाठी एकीकडे वृक्षप्रेमीनी लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दूसरीकडे आजरा तालुका कोकणचे प्रवेशद्वार म्हणून आळखले जाते. हे ‘कोकणाचे प्रवेश‌द्वार’ राहणार का? असा संतप्त सवालही वृक्षप्रेमीनी उपस्थित केला आहे.

दरम्यान वृक्षप्रेमींच्यावतीने आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांना निवेदन देण्यात आले.

वाटंगी फाटा ते महागाव दरम्यान असलेले १३ पुरातन वटवृक्ष सध्या मरणाच्या दारात उभे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ‘वृक्षप्रेमी समूह, आजरा’ हे वृक्ष वाचवण्यासाठी धडपडत असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सह्याद्री देवराई सारख्या संस्थांकडून मार्गदर्शन मिळत आहे. लढा निर्णायक वळणावर असून ही झाडे वाचलीच पाहीजेत असा वृक्षप्रेमींचा आग्रह आहे. १३ वडाच्या झाडांपैकी एखाद-दूसरा अपवाद वगळता कोणतेही झाड वाहन चालकाला अडथळा ठरत नाही. याच मार्गावर होनेवाडी येथील वनविभागाची झाडे जर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत नाहीत, तर मग हीच मोजकी झाडे अचानक ‘धोकादायक’ कशी काय ठरू शकतात? असा सवाल करून निसर्गाचा ठेवा पृढच्या पिढीसाठी टिकवून 
ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात गांभीर्याने हस्तक्षेप केला, तरच हे वटवृक्ष वाचू शकतील, अन्यथा आजऱ्याचा निसर्ग वैभवाचा वारसा केवळ फक्त कागदावरच उरेल अशी भिती व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषद सदस्य देसाईंचा पुढाकार...

जिल्हा परिषद सदस्य स्थीर देसाई यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून पुढाकार घेत घटनास्थळी वृक्षप्रेमी, वनक्षेत्रपाल, ठेकेदार व एमएसआयडीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ही झाडे वाचवण्याबरोबर रस्त्याचे काम दर्जेदार करावे. अशी सूचना केली. या वेळी डॉ. गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, डॉ. अंजनी देशपांडे, युवराज पोवार, वृषाल हुक्केरी यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते.

आजचे पंचांग

♦ दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
♦ वार : शुक्रवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : एकादशी तिथी (रात्री १०.३२ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
♦ नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (सकाळी १०.४८ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
♦ योग : आयुष्मान योग (रात्री ७.४३ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
♦ करण : वाणीजा करण (सकाळी ११.३१ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
♦ चंद्र राशी : मिथुन राशी (२८ फेब्रुवारी पहाटे ०३.५२ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.२४ ते दुपारी १२.५१ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
♦ अभिजित : दुपारी १२.२८ ते दुपारी ०१.१५
♦ सूर्योदय : सकाळी ७.००
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४२
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत.

 

संबंधित पोस्ट

आजरा साखर कारखान्याकडून चालू हंगामातील संपूर्ण ऊस बिले अदा

mrityunjay mahanews

माझी भूमिका

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!