mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार 

२४ जून २०२६

पुन्हा घरफोडी…
शहरवासीय धास्तावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिव कॉलनी येथे घरफोडी होऊन तब्बल २३.५ तोळे सोने चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सोमवारी रात्री चोरट्याने बर्डे गल्लीतील जैद कुद्दुस चांद यांचे घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

चांद कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने व सुदैवाने घरी सोने, रोख रक्कम व मौल्यवान ऐवज न ठेवल्याने चोरी झाली असली तरी चोरीला काही गेले नाही असा प्रकार घडला आहे.  रात्री उशिरापर्यंत याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.

चोरींच्या या सत्रामुळे शहरवासीय मात्र धास्तावले आहेत. शहरवासीयांनी घरी बंद ठेवायची की नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे शहरवासीयांची अशी अवस्था असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनासमोरही चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

पाऊस आला बळीराजा सुखावला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून प्रदीर्घ विश्रांतीनंतर लावलेल्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे.

गेले महिनाभर पावसाने ओढ दिली होती. सुरुवातीला झालेल्या वळीव पावसानंतर अनेकांनी भाताच्या तरवा पेरण्यासह भुईमूग टोकणणी केली होती. अनेकांनी पेरणीची कामे ही आटोपून घेतली होती. परंतु पावसाने ओढ दिल्याने सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून होते. मंगळवारी दुपारपासून पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेती कामे वेगावली आहेत.

अनेक गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय विधवा दिन सोहाळे ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामपंचायत मौजे सोहाळे, बाची, सोहाळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या समस्या, हक्क व शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत चर्चा सत्र, हळदी-कुंकू समारंभ तसेच वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून विधवा महिलांप्रती आदर व संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले अनुभव व विचार मांडले.

या कार्यक्रमास , सरपंच सौ. भारती कृष्णा डेळेकर, उपसरपंच वसंत कोंडूसकर ग्रामपंचायत अधिकारी श्री. रणदिवे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोंडुसकर,आनंदा पोवार,रमा कांबळे,लिला देसाई,निर्मला दोरुगडे अनंत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक फर्नांडिस व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी महिला ,बचतगट अध्यक्षा , लिपिका व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विधवा महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे व त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

आजरा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, मॉडेल करिअर सेंटर, कोल्हापूर आणि आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आजरा महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटी, आजराचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी होते. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, पदाधिकारी व संचालक मंडळ, उपप्राचार्य, दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, अधिक्षक योगेश पाटील आदि उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. मेळाव्यात १९४ रिक्त पदांसाठी भरतीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.मेळाव्यास परिसरातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार प्रभारी प्राचार्य, प्रो. के. जी. पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. अविनाश वर्धन यांनी केले, तर डॉ. रणजीत पवार यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गाचे लोकसंख्या केंद्रित प्रभागाला आरक्षण द्या…

बहुजन मुक्ती पार्टी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शासनाने कायद्यानुसार मागास घटकांसाठी दिलेल्या तरतुदींचा विचार करून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गाची लोकसंख्या ज्या प्रभागात केंद्रित आहे त्या प्रभागाला आरक्षण मिळावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ज्या प्रभागामध्ये अशा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात केंद्रित आहे अशाच प्रभागांना आरक्षित जाहीर करावे. आरक्षण निश्चिती पूर्वी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग निहाय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग याचा लोकसंख्या तपशील जाहीर करावा अशी मागणी ही करण्यात आली असून याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निवेदनावर डॉ. उल्हास श्रीरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, काशिनाथ मोरे, अमित सुळेकर, दशरथ सोनुले, गोपाळ होण्यळकर, संदीप दाभिलकर, मधुकर कांबळे, नितीन राऊत, शोभा कांबळे, राजाराम कांबळे, शकुंतला कांबळे, सुरेश दिवेकर, उषा दारुटे आदींच्या सह्या आहेत.

हिवताप प्रतिबंधासाठी उत्तूर परिसरात व्यापक जनजागृती,
८ हजारांहून अधिक नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिवताप प्रतिबंध महिन्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूरच्या वतीने कार्यक्षेत्रातील १६ गावांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत घरोघरी भेटी देऊन पाण्याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टेमिफॉस औषधाची फवारणी करण्यात आली.

मोहिमेदरम्यान सात स्वतंत्र पथकांनी २ हजार ७२ घरांना भेटी देत एकूण ८ हजार १६१ नागरिकांचे सर्वेक्षण केले. संभाव्य हिवताप रुग्णांची माहिती संकलित करून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याचबरोबर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कीटकजन्य आजारांची कारणे, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि डासांची पैदास रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली.

आजचे पंचांग 

दिनांक : २४ जून २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी (सायंकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (दुपारी ०१.५८ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : परिघ योग (सकाळी १०.२२ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : गराजा करण (सायंकाळी ०६.१२ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : तुळ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४१ ते दुपारी ०२.२० पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
कृष्णा सावरतकर

कानोली ता. आजरा येथील कृष्णा विठोबा सावतरकर ( वय ७७ वर्षे )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अशोक शेळके

अशोक कृष्णा शेळके रा. माद्याळ ( वय वर्ष ५५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात आई,वडील,भाऊ,
पत्नी व दोन मुले आहेत.

संबंधित पोस्ट

बुधवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंधरा वर्षीय मुलीचे आज-यातून अपहरण… मडिलगे येथील एकाचा मुंबईत अपघाती मृत्यू…

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!