mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार 

२३ जून २०२६

गोकुळचे राजकारण तापले…तालुक्यात अनेक ठिकाणी ठरावांसाठी स्थानिक कारभाऱ्यांत वादावादी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गोकुळच्या राजकारणाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. ठरावावरून अनेक संस्थांमध्ये संचालकामध्येच जुंपली आहे. प्रसंगी शिवीगाळ, मारामारी यासारखे प्रकार घडू लागले आहेत. स्थानिक पोलिसांची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. देवर्डे, हांदेवाडी, लाकूडवाडी येथे असे प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

गोकुळच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून मतदानासाठी प्रतिनिधी निवडण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दूध संस्थांचे राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक चुरशीची होईल असे समोर दिसत असल्याने अनेकांनी ठरावाच्या नावावर टोकन रकमा तर काहींनी नोकरी, संस्थांच्या इमारतींसाठी रकमा, तर काही मंडळींनी पूर्ण रक्कम आधीच ऍडव्हान्स स्वरूपात मागण्यास सुरुवात केली आहे.

नेतेमंडळीही जास्तीत जास्त ठराव मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने दूध संस्था प्रतिनिधींचा दर वधारला आहे.अंतिम टप्प्यात ही निवडणूक कोणत्या थराला जाणार हे यातून स्पष्ट होऊ लागले आहे.

सुनेकडून सासूला मारहाण…
सुने विरुद्ध गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सासूच्या घरातील भांडी सून नेत असताना सासूने सुनेला भांडी का नेली ? असे विचारल्याच्या कारणावरून सुनेने सासूला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना माद्याळ ता. आजरा येथे घडली आहे.

याबाबतची फिर्याद  सासुने आजरा पोलिसात दिली असून या फिर्यादीवरून सुने विरोधात गुन्हा नोंद केला आहे‌.

हवालदार अनिल सरंबळे पुढील तपास करीत आहेत.

जून अखेरीस साळगाव बंधारा दुरुस्तीसाठी मुहुर्त मिळाला


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अखेर साळगाव बंधारा दुरुस्तीसाठी उशिरा का असेना मुहूर्त मिळाला असून सध्या या बंधाऱ्याची डागडुजी सुरू झाली आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २६ जून पर्यंत बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वास्तविक या बंधाऱ्याची यापूर्वी दुरुस्ती होणे आवश्यक होते. तसे झाले नसले तरी उशिरा का असेना पावसापूर्वी सदर बंधारा दुरुस्त होऊन तो भक्कम होईल अशी अपेक्षा वाहन चालक व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात योग प्रात्यक्षिक व
मार्गदर्शन कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

योगगुरू श्री. बाळकृष्ण दोरुगडे यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक तणाव कमी होतो तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतात, असे सांगितले.

यावेळी अशोकअण्णा चराटी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील व कार्यालयीन अधीक्षक, योगेश पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एन. सी. सी. प्रमुख लेफ्ट. डॉ. संजय चव्हाण, एन. एस. एस. प्रमुख डॉ. अविनाश वर्धन व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. धनंजय पाटील, आजरा हायस्कूल, एन सी सी प्रमुख श्री. सुनील नाईक व व्यंकतराव हायस्कूल, आजरा एन.सी.सी. प्रमुख, श्री. महेश पाटील, इतर प्राध्यापक व स्वयंसेवकांनी विशेष योग प्रशिक्षण घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

निधन वार्ता
सौ.प्रमिला पोतदार


सोमवार पेठ, आजरा येथील सौ. प्रमिला परेश पोतदार ( वय ४६ वर्षे ) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर वडाचा गोंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नगरसेवक परेश पोतदार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता आहे.

शंकर सावंत

परोलीवाडी येथील रहिवासी व पोळगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक, कासार कांडगाव सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर लक्ष्मण सावंत ( वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

माध्यमिक शिक्षका रणजीत सावंत यांचे ते वडील होत.

पार्वती  गुरव

आरदाळ ता. आजरा येथील पार्वती महादेव गुरव ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २३ जून २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी (दुपारी ०४.३९ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (सकाळी ११.५३ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : वरीयान योग (सकाळी १०.१२ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : कौलव करण (दुपारी ०४.३९ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कन्या राशी (२४ जून रात्री १२.५२ पर्यंत) त्यानंतर तुळ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५९ ते सायंकाळी ०५.३९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

वाटंगी येथील अल्पवयीन मुलीचे आजऱ्यातून अपहरण… देशी दारू विक्री करताना मडिलगे येथे एकास ताब्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!