mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार सातच्या बातम्या

मंगळवार दिनांक ३० जून २०२६

पोळगाव परिसरातून हत्ती जाईना…
बोलेरोचे केले नुकसान


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खरीप हंगामाची घाई सुरू असताना पोळगाव – यरंडोळ परिसरात ठाण मांडून बसलेला हत्ती काही केल्या हटेना झाला आहे. या परिसरात रोज पिकांचे नुकसान तर होत आहेच परंतु आता चार चाकी गाड्या व उभ्या झाडांचेही नुकसान हत्तीकडून केले जाऊ लागले आहे.

संभाजी नार्वेकर यांच्या चार चाकी गाडीच्या बोनेटवर हत्ती पाय ठेवून चढण्याचा प्रयत्न करत असताना चार चाकीचे नुकसान झाले आहे. परिसरातील नारळाची व केळीची झाडेही आडवी केली जात आहेत.

येथील शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे. वनविभागाकडून प्रत्यक्ष भेटी देऊन पंचनामे करण्याचे सुरू असले तरीही हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषता शेत जमिनी जवळ उभा केलेली ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, छोटी मोठी वाहने हत्तीकडून लक्ष्य बनवली जात आहेत.

चोरलं काय…’घंटा’…?


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – आंबोली मार्गालगत असणाऱ्या सुप्रसिद्ध चाळोबा देवालयातील लहान मोठ्या पितळी घंटा चोरीस गेल्याची घटना घडली आहे.

जवळ आजरा – आंबोली मार्गावरच चाळोबा हे प्रसिद्ध देवस्थान आहे.असंख्य भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे भाविक अनेक प्रकारच्या देणग्या देत असतात यामध्ये लहान मोठ्या घंटांचाही समावेश आहे.

कांही अज्ञात चोरट्यांनी येथील मोठ्या घंटा लक्ष करत चोरुन नेल्या आहेत.किमान १० ते ११ किलोच्या या पितळी घंटा आहेत.सहा ते सात घंटा चोरीस गेल्याचा अंदाज आहे.लहान घंटा चोरीस गेलेल्या नाहीत.यापूर्वी येथील दानपेटीतील रक्कम चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. छोट्या घंटा देखील चोरट्याने पळवल्या होत्या.

रस्त्यालगतच हे देवस्थान आहे.रात्रीचे येथे फारसी रहदारी नसते याचा फायदा घेत चोरट्यांनी घंटावर डल्ला मारला आहे.

बैलराजाच्या मिरवणुकांनी दुमदुमला उत्तूर परिसर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर व परिसरात भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहात बेंदूर सण साजरा करण्यात आला.

पहाटेपासूनच शेतकरी कुटुंबांनी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावले. रंगीबेरंगी झुली, फुलांचे हार, घुंगरू व विविध अलंकारांनी बैलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून बैलांना पुरणपोळी, गोडधोड पदार्थ व इतर पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला. गावातील विविध भागांत सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात या मिरवणुकींना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यंदा अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असतानाही सणाचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. शेतकरी व ग्रामस्थांनी आगामी हंगाम भरघोस जावा, जनावरांचे आरोग्य चांगले राहावे आणि शेतीत भरभराट व्हावी, अशी प्रार्थना केली. दिवसभर बेंदूर सणामुळे उत्तूर परिसरात पारंपरिक संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा उत्साहपूर्ण माहोल अनुभवायला मिळाला.

जन्मोजन्मी हाच पती मिळू दे…
तालुक्यात वटपौर्णिमा दणक्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सोमवारी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पतीच्या दीर्घायुष्यासाठी असंख्य सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडाचे पूजन केले. औक्षण करून, नैवेद्य दाखवून असंख्य महिलांनी वडाच्या झाडाला सूत बांधून, सात जन्माची गाठ मजबूत ठेवण्याचे साकडे घातले.

वटपौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून विविध फळांसह आंब्याचे वाण दिले. काही महिलांनी परंपरेपरेनुसार वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर वृक्षारोपणाचे महत्त्वही स्पष्ट केले. यावेळी सोहाळे ग्रामपंचायतच्या वतीने  लोकनियुक्त सरपंच सौ.भारती डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणातून “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

ज्येष्ठ महिलांसह नव्या पिढीतील सुवासिनींसोबत नववविवाहितांनीदेखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. त्यामुळे पौर्णिमेनिमित्त तालुक्यात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

गस्त वाढविणार; सीसीटीव्ही यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हे नगरपंचायतीकडून प्रस्ताव मागविणार : पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब सरवदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहर व उपनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आजरा यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर नगरसेवक श्री. परशुराम बामणे , नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार, माजी नगरसेवक बाळ केसरकर, माजी नगरसेवक किरण कांबळे, पांडुरंग सावरतकर , जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, संतोष बांदिवडेकर व संजय जोशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अलीकडे आजरा शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी शिव कॉलनीतील श्री. प्रकाश नवनाथ शिंदे व आयडियल कॉलनीतील युवराज जाधव यांच्या घरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली. त्याच दिवशी आनंदवन कॉलनी परिसरातून श्री. संजय भोये यांची मोटारसायकल चोरीस गेली. या घटनांच्या तपासासाठी श्वान पथक मागविण्यात आले होते; मात्र त्यातून कोणतेही ठोस निष्पन्न झाले नाही.त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत बर्डे गल्ली परिसरात आणखी एक धाडसी चोरी झाली. तसेच साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बसस्थानक परिसरात एका महिला प्रवाशाच्या हातातील सुमारे अडीच तोळे वजनाची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना घडली.

या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, बसस्थानक परिसर तसेच उपनगरातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी आणि शहरातील पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावर पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब सरवदे यांनी अलीकडील सोन्याच्या चोरीच्या प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती दिली. तसेच वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात पोलीस गस्त अधिक प्रभावी करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. सीसीटीव्ही यंत्रणेबाबत झालेल्या चर्चेत पूर्वी शहरात बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे नियमित देखभाल व दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर नगरपंचायतीकडून देखभाल व दुरुस्तीचे दरपत्रक (कोटेशन) मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सरवदे यांनी सांगितले.

या चर्चेमध्ये नगरसेवक श्री. परशुराम बामणे, माजी नगरसेवक बाळ केसरकर, माजी नगरसेवक किरण कांबळे, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर व जावेद पठाण यांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या.

ना ‘ दम ‘…ना ‘ धार ‘
फक्त हवाच ‘ गार

पावसाचा जोर नाही…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली असली तरीही पावसाला जोर नसल्यामुळे ना दम, ना धार फक्त हवाच गार अशी पावसाबाबत परिस्थिती निर्माण झाली आहे.

शनिवार दुपारपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची रिपेरिप सुरू असली तरीही अपेक्षित. असा जोर नाही. ओढे, नदी यांच्यातून पाणी वाहतात दिसत नाही. समाधानकारक पावसाअभावी रोप लावणी बऱ्याच ठिकाणी खोडळंबल्याने जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.

जून महिना संपत आला तरीही पावसाने अद्याप शंभर मिलिमीटरचा टप्पा ओलांडलेला नाही. हवेत गारवा असल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन थोडेफार थांबले आहे. परंतु पाणीसाठ्यात कोणतीही वाढ दिसत नाही.

आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याशिवाय पर्याय नाही अशी तालुक्यात अवस्था आहे.

आजरा येथील अंगणवाडी दुरुस्तीसाठी शिवसेनेचा नगरपंचायतीला इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. २ छत्रपती शिवाजीनगर येथील अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश संभाजी पाटील यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांना निवेदन देऊन इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

निवेदनात अंगणवाडी इमारतीचे छप्पर, भिंती आणि फरशी खराब झाली आहे, खराब अवस्थेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.छतातून पाणी गळण्याची शक्यता असून बालके व अंगणवाडी सेविका यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता अंगणवाडीची तातडीने दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे अशी स्पष्ट करून लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा त दिला आहे.

या निवेदनावर उपशहर प्रमुख मिकाजी विभुते, प्रकाश कोळी, शहर प्रमुख रोहन गिरी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

छाया वृत्त

मौजे देवर्ड या.आजरा येथील अनुसूचित जातीच्या समाज मंदिराचे वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित असल्याने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अंधारात साजरी करावी लागली. समाज मंदिराचे वीज बिल ग्रामपंचायत भरते. सदर लाईट बिल मागील तीन महिने संबंधित ग्रामसेवक यांनी न भरलेमुळे समाज मंदिराची वीज जोडणी खंडित करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक आणि प्रशासक यांची चौकशी व्हावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ३९ जून २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ महिना
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (१ जुलै सकाळी ०६.५० पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : ब्रह्म योग (दुपारी ०३.१८ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : बलवा करण (सायंकाळी ०६.३३ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.०१ ते सायंकाळी ०५.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!