रविवार
२८ जून २०२६

पिकअपच्या धडकेतच युवकाचा मृत्यू…
आजरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – गडहिंग्लज मार्गावर वन विभागाचे कार्यालय ते म्हसोबा देवस्थान नजिक शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील विलास गंगाराम पेडणेकर ( वय २८ वर्षे रा. गवसे ) याचा जागीच मृत्यू झाला तर आल्याचीवाडी येथील ज्ञानदेव लक्ष्मण भांदुरगे हा जखमी झाल्याची घटना घडली होती. धडक देणारा पिकअप गाडी चालक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून जखमी ज्ञानेश्वर यांने दिलेल्या फिर्यादी बरोबर अज्ञात पिकप गाडी चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा हलवण्यात होते. परंतु उपचारापूर्वीच पेडणेकर यांचा मृत्यू झाला. माडभगत याच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

विद्युत पंपाच्या केबल चोरीचे सत्र सुरूच…
साळगावात शेतीपंपांच्या केबल चोरीला
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिरण्यकेशी नदी काठावरील साळगाव येथील तब्बल २५ शेतकऱ्यांच्या सुमारे चार लाख रुपये किमतीच्या मोटर पंपाच्या केबल्स चोरीला गेल्या आहेत. वारंवार होणाऱ्या केबल चोरीने आता शेतकरी त्रस्त झाला आहे.
चांदेवाडी व हाजगोळी खुर्द गावातील २० शेतकऱ्यांच्या मोटर पंपाच्या तांब्याच्या केबल्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ताजी आहे . २७ मार्च रोजी पेद्रेवाडी नदीकाठावर असाच प्रकार घडला होता. तांब्याचे दर वाढल्याने चोरट्यांनी हा प्रकार अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
सध्या केबलचे दर वाढल्याने याचा फटका शेतकरी वर्गास मोठ्या प्रमाणावर बसत आहे
आजरा तालुक्यातील साळगाव परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतीपंपांच्या वीज केबल चोरी करून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हिरण्यकेशी नदीवरील देवर्डे बंधारा ते रेडापाड शेत परिसरादरम्यान अनेक शेतकऱ्यांचे विद्युत शेतीपंप आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या परिसरातील अनेक शेतीपंपांच्या वीज केबल कापून लंपास केल्या. सकाळी शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या चोरीमध्ये कृष्णा निवृत्ती पाटील, बंडू तुकाराम वेंगुळकर, पांडुरंग मारुती पाटील, सुरेश जोतिबा कुंभार, धोंडीबा मारुती पाटील, प्रकाश पांडुरंग कुंभार, मनोहर नारायण पाटील, बाबासो शंकर पाटील, अनिल रामा पाटील, उत्तम विष्णू गावडे, धाकलू भाऊ गजरकर, स्वप्निल विष्णू पाटील, दत्तात्रय गोपाळ पाटील, भगवान महादेव पाटील, आनंदा कृष्णा गजरकर, विष्णू लक्ष्मण गावडे, सुरज म्हमुलाल मुजावर, रामचंद्र भाऊ गावडे, बाबाजी संभू पाटील, पंडित राजाराम पाटील, शिवाजी गणेश पाटील, अरुण विष्णू गावडे आणि धोंडीबा रामा गावडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन आजरा पोलीस स्टेशनला दिले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बालीकेसह महिला बेपत्ता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर भाडोत्री म्हणून राहणाऱ्या पवार कुटुंबीयांमधील सौ. अनिता संतोष पवार वय ३० वर्षे व तिची ४ वर्षीय मुलगी मोनिका संतोष पवार ही २५ जूनपासून आंबोली रोड येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची वर्दी संतोष पवार यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
नागनेटी तांडा ता. शहापूर जि. यादगिर/ कर्नाटक येथून रोजी रोटी साठी आलेल्या पवार कुटुंबीयातील सौ. अनिता या मुलगी मोनिकासह कॅरीबॅग मधून गाऊन घेऊन शिवण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडल्या ते अद्याप परतलेल्या नाहीत असे या वर्दीत म्हटले आहे.
हवालदार शिकलगार पुढील तपास करीत आहेत.
(छायाचित्र संग्रहित व प्रातिनिधिक आहे.)

छायावृत्त

तिथी नुसार आजरा शहरांमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा तालुका प्रमुख श्री. संदीप परळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित वारकरी संप्रदाय व निष्ठावंत धारकरी यांच्या समवेत संपन्न झाला. यामध्ये नित्य अभिषेक तसेच देवदर्शन पदयात्रा साखर पेढे वाटप करून पूर्ण नगर प्रदक्षिणा घालण्यात आली.

वझरे मुक्कामी बस हवी तर चालक-वाहकांसाठी मूलभूत सुविधा द्या!

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे: (ता. आजरा) येथील मुक्कामी बससेवेसाठी चालक-वाहकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आजरा आगार प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे केली आहे.
मुक्कामस्थळी स्वच्छतागृह, मुतारी व विश्रांतीगृहाची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चालक-वाहकांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी पाठपुरावा करून स्वच्छतागृह व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, सुविधा नसल्यामुळे गडहिंग्लजहून सुटणारी वझरे मुक्कामी बस एका दिवशी महागोंड येथे मुक्कामासाठी थांबविण्यात आली होती. त्यावेळी एका महिला प्रवाशाला व तिच्या मुलीला महागोंड येथे उतरविल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर वझरेचे सरपंच व ग्रामस्थांनी आजरा आगारात जाऊन संताप व्यक्त केला. सरपंच आणि संबंधित महिलेने चालक-वाहकाविरोधात तक्रारही दाखल केल्याचे समजते.
दुसरीकडे, चालक-वाहक संघटनांचे म्हणणे आहे की, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा दबाव आणला जात आहे. आगाराने ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून आजरा आगारातील बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत एसटी मंडळाची बदनामी केल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
सरपंच, ग्रामस्थ आणि चालक-वाहक यांच्यातील या वादाचा फटका सामान्य प्रवाशांनाही बसत असून, मुक्कामी बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

छ.शाहूंना अभिवादन…
व्यंकटराव शिक्षण संकुल…

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संचालक श्री. पांडुरंग जाधव म्हणाले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श राज्यकर्ते आणि सामाजिक सुधारणांचे अग्रदूत होते. त्यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांचा पुरस्कार करत समाजपरिवर्तनाचा नवा आदर्श घालून दिला. वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत आपण सर्वांनी समतामूलक व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.”
त्यानंतर प्राचार्य श्री. एस. एन. पाटील यांनी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास संकुलाच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. देसाई, जुनिअर कॉलेज विभागप्रमुख श्री. एम. ए. पाटील, श्री. शिवाजी पारळे, श्रीम. एन. ए. मोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. पी. होरटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. पी. व्ही. पाटील यांनी मानले.
आजरा हायस्कूल आजरा...

कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय मुख्याध्यापक श्री ए. एल. तोडकर, विभागप्रमुख सौ. एम. एस. शेलार तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर श्री. व्ही. ए. पोतदार यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा दिली. तसेच त्यांनी मोहरम या सणाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्वही उपस्थितांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. व्ही. पी. हरेर यांनी केले.
या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पं.दिनदयाळ विद्यालय…


आजचे पंचांग
दिनांक : २८ जून २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी राशी (२९ जून पहाटे ०३.०६ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (२९ जून रात्री ०१.०८ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : शुभ योग (दुपारी ०१.२८ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : गराजा करण (दुपारी ०१.५४ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (२९ जून रात्री ०१.०८ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३९ ते सायंकाळी ०७.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी ११.१५ ते दुपारी ०१.०८
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
निधन वार्ता…
संतोष येसणे

मडीलगे ता. आजरा येथील संतोष श्रीपती येसणे ( वय ४५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे.


