शनिवार १८ एप्रिल २०२६

पेरणोलीत चौरंगी, तर कोरीवडेत सरपंचपदासाठी दुरंगी सामना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोली व कोरीवडे येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी तर मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे व हरपवडे येथील सदस्यपदाच्या सहा जागासाठी पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर झाला होता. काल शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी, पेरणोली येथील सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे. तर कोरीवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाकरीता दोन उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले.
दरम्यान मडिलगे येथे दोन सदस्यपदांच्या जागा तर हरपवडे येथील एक जागा बिनविरोध निवडली गेली आहे. बहिरेवाडी व धामणे येथे प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देऊळवाडी येथील अनुसुचित प्रवर्गातील सदस्यपदाची जागा पुन्हा एकवेळ रिक्त राहीले आहे. सरपंचपदासाठी पेरणोली येथून १० तर कोरीवडे येथून ४ उमेदवारी अर्ज असे १४ अर्ज दाखल झाले होते. यातील ८ जणांनी माघार घेतली आहे. सदस्यपदासाठी दाखल १६ अर्जापैकी ९ जणांनी माघार घेतली आहे.
पेरणोलीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महीलेसाठी राखीव आहे. या ग्रामपंचायतीसाठी राजश्री उदयराज पवार, संजीवनी मारुती नावलकर, शीतल लक्ष्मण हळवणकर, वनश्री रविंद्र देसाई यांच्यात सरळ सामना होत आहे.
कोरीवडे सरपंचपद हे नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या ग्रामपंचायतीसाठी विवेक पाटील, दामाजी पाटील यांच्यात दुरंगी लढत होत आहे. बहिरेवाडी प्रभाग १ मधे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गसाठी प्रिती सचिन कांबळे, मंगल कल्लाप्पा आयवाळे तर धामणे प्रभाग ३ सर्वसाधारण प्रवर्गासाठी पांडुरंग दत्तात्रय मगदूम, शंकर दादू लोकरे यांच्यात दूरंगी सामना होणार आहे. हरपवडे येथे प्रभाग क्रमांक १ मधे अनुसुचित जातीसाठी सुचिता शिवाजी कांबळे, मडिलगे प्रभाग ३ मधील सर्वासाधारण स्त्री प्रवर्ग सुनिता निवृत्ती येसणे व याच प्रभागातील सर्वसाधारण प्रवर्ग आनंदा महादेव मुरुकटे यांचे प्रत्येकी एक अर्ज राहील्याने या दोनही गावची सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. देऊळवाडीमधे अनुचित प्रवर्गासाठी एकही अर्ज न आल्याने हे रिक्त राहीले.
बिनविरोधची चर्चाच…
पेरणोली व कोरीवडे ग्रामपंचायत सरपंच पद निवड ही बिनविरोध होणार अशी चर्चा होती. यासाठी स्थानिक नेते मंडळींचे प्रयत्नही सुरू होते. परंतु माघारीच्या दिवशी नेत्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने मतदान प्रक्रिया होणार हे स्पष्ट झाले. पेरणोली येथे जंगी मुकाबला होण्याची शक्यता आहे.

कासार कांडगाव येथे हत्तीचा धिंगाणा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कासार कांडगाव तालुका आजरा येथे हत्तीने गुरुवारी रात्री धूमाकूळ घालत येथील तुकाराम तर्डेकर यांच्या शेतातील नारळाच्या झाडांसह पाण्याच्या टाक्यांचे नुकसान केले आहे .
रात्रीच्या दरम्यान आलेल्या हत्तीने पाण्याच्या टाक्या फोडून नारळाची झाडे उपसली आहेत. संग्राम सरदेसाई यांचेही त्याने नुकसान केलेले आहे.
हत्तीचा उपद्रव थांबणार तरी कधी ? असा प्रश्न आता शेतकरी वर्ग उपस्थित करू लागला आहे. गेले काही महिने तालुक्याच्या पूर्व भागात हत्ती ठाण मांडून आहे.

बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे ता. आजरा येथे रहात्या घराच्या मागे झाडाच्या खाली उघड्यावर बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या देशी दारूसह किशोर परसू गावडे रा. किणे याला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार दयानंद बेनके यांनी आजरा पोलिसांत दिली असून हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेची सेवा करा : शिरीष देसाई ‘महाराजस्व समाधान शिबिर’ संपन्न.
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रजेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने काम केले, तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील, असे मत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी व्यक्त केले. आजरा तालुक्यातील चौथ्या ‘महाराजस्व समाधान अभियान’ अंतर्गत उत्तूर येथे आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत संदीप पाटील यांनी केले. यावेळी शासनाच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती देत त्यांचे फायदे समजावून सांगितले.
मनोगत व्यक्त करताना कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी हे अभियान दरवर्षी राबविण्याची गरज व्यक्त करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, महसूल नायब तहसीलदार विकास कोलते, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, सरपंच किरण आमणगी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर कांबळे यांनी केले.
कार्यक्रमानंतर विविध खात्यांनी उभारलेल्या स्टॉलमध्ये नागरिकांना दाखले वितरित करण्यात आले तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. या शिबिरात मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी गीता कुंभार, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ मिसाळ, रमेश यादव, जितेंद्र देसाई, वैभव पाटील, अशोक कुंभार, विलास चव्हाण, सुधीर गोरे, स्नेहल कुंभोजकर तसेच कोतवाल व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सुधारित सूचनेत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा समावेश करा मराठा महासंघाचे मुख्यमंत्री, शिक्षण आयुक्तांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वर्ष नव्या शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासचे खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण दाखविलेले नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या १ टक्के जागा कशा झाल्या? हे शिक्षण आयुक्तांनी जाहीर करावे व प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी सुधारित सूचनेत या प्रवर्गाचा समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ शाखेच्या वतीने मुख्यमंत्री व शिक्षण आयुक्तांकडे केली. निवेदन आजऱ्याचे महसूल नायब तहसीलदार विकास कोलते यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, खासगी शाळांमध्ये वंचित घटकांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असतात. परंतु प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडील पत्रामध्ये आर्थिकदृष्ट्य मागास प्रवर्गाचा समावेश नसल्याने गोंधळ उडालेला आहे. पोर्टलवर आरक्षित जातीचा प्रवर्ग निवडल्यानंतर उत्पन्न दाखला स्वीकारला जात नाही. सर्व कॅटेगिरीसाठी १ लाख रुपयांपर्यंत दाखला बंधनकारक आहे.
निवेदनावर मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, प्रकाश देसाई, चंद्रकांत पारपोलकर, शिवाजी इंजल, शंकरराव शिंदे आदींच्या सह्या आहेत.

खानापूर शिवारात विद्युत पोल आडवा…
शेती पंपांचा वीज पुरवठा बंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या एक महिन्यापासून खानापूर मध्ये शेतीचा विद्युत पोल पडला आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पंपासाठी वीज पुरवठा बंद झाला आहे.
वारंवार तक्रार करूनही अजून काहीच तोडगा निघाला नाही.शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सदर पोल उभा करून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी होत आहे.
आजचे पंचांग
दिनांक : १८ एप्रिल २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम (दुपारी ०२.१० पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (सकाळी ०९.४२ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : प्रीति योग (रात्री ११.५५ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : भाव करण (दुपारी ०२.१० पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२९ ते सकाळी ११.०४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
गुजरातने कोलकत्याला पाच गड्यांनी नमवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. ५० चेंडूत ८६ धावा काढणाऱ्या शुभमन गिलला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
आजचे सामने
बंगळुरू विरुद्ध दिल्ली
स्थळ : बंगळूरु
वेळ : दुपारी ३.३० वाजता
हैदराबाद विरुद्ध चेन्नई
स्थळ : हैदराबाद
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


