शुक्रवार १७ एप्रिल २०२६

मडिलगे जवळ अपघातात शिक्षक गंभीर जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा महामार्गावर मडिलगेनजीक झालेल्या दुचाकी अपघातात खेडे प्राथमिक शाळेचे शिक्षक गंगाराम खाडे (रा. चिमणे ) हे गंभीर जखमी झाले . गुरुवारी सकाळी ७ . ३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला .
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी शाळा असल्याने शिक्षक खाडे मडिलगे येथून खेडे शाळेकडे स्टूटीवरुन निघाले होते . यावेळी आजर्याकडून गडहिंग्लजच्या दिशेने वसंत केरकर ( रा . दर्डेवाडी) बुलट घेऊन जात होते . दोन्ही दुचाकींच्या धडकेत खाडे गंभीर जखमी झाले . तर केरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे . खाडे यांच्यावर गडहिंग्लज येथे उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे . रात्री उशिरा पर्यंत या अपघाताची नोंद पोलीसात झाली नव्हती.

मडिलगे चोरी प्रकरणी दोघे अटकेत…
दोन दिवसांची पोलीस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथे गादी बनवण्यासाठी आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मारुती अण्णा प्पा येसणे यांची गादीखाली ठेवलेली अडीच लाख रुपये इतकी रोकड संगनमताने लंपास केल्याची घटना घडली होती.
येसणे यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती गादी तयार करण्याकरता आले होते. येसणे यांनी गादीखाली काजू बिया खरेदी करता अडीच लाख रुपये इतकी रक्कम ठेवली होती. गादी बनवण्यासाठी आलेल्या दोघांनी संगनमताने सदर रक्कम घेऊन पोबारा केला होता.
आजरा पोलिसांनी तातडीने हालचाली करत हत्तरगी येथे गाद्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या प्रवीण म्हेत्री व संतोष जिनराळी या दोघांना बुधवारी रात्री अटक केली असून त्यांना आज जरा न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे यांनी सांगितले.

काँग्रेस बांधणीत निष्ठावंतांना संधी : जय शंकर पाठक

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या _‘संघटन हा सृजन’_ अभियानाअंतर्गत आजरा तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती व आढावा बैठक आज उत्साहात संपन्न झाली.
_निरीक्षक जय शंकर पाठक_ यांनी आश्वासन दिले की, आजरा तालुका मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाच्या बांधणीत योग्य संधी दिली जाईल.
यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते सचिन सावंत, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, विनायक घोरपडे, विजयानंद पोळ, नगरसेवक अभिषेक शिंपी, संजयभाऊ सावंत, अशोक तरडेकर, रवींद्र भाटले, सुमित सावंत, नौशाद बुडेखान, सुधीर पाटील, कृष्णा सावंत, नरसू शिंदे व नगरसेवक सरफराज पटेल समीर गुंजाटी विनायक पाटील भाऊसो किल्लेदार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तूर येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची ७०९ वी पुण्यतिथी भक्तिभावात संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समस्त कुंभार समाजाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
सकाळी आठ वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले, तर रात्री साडेसात वाजता महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भाविकांच्या मनोरंजनासाठी सोंगी भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भैरू कुंभार, दिनकर कुंभार, शिवाजी कुंभार, बाजीराव कुंभार, प्रकाश कुंभार, युवराज कातवरे, विलास कातवरे, आनंदा कुंभार, रवींद्र कुंभार, सुरेश कुंभार, उत्तम कुंभार, संजय कुंभार, शिवम कुंभार, सुनिल कुंभार, दत्तात्रय कुंभार, नामदेव कुंभार, दीपक कुंभार, नेताजी कुंभार, जयसिंग कुंभार, सागर कुंभार, संतोष कुंभार,सतीश कुंभार, समीर कुंभार, सुभाष कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
भादवण शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे उद्घाटन.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या सौजन्याने पी एम श्री आदर्श विद्या मंदिर भादवण येथे इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव परीक्षा उद्घाटन प्रा.सौ. माधुरी रणजित गाडे (लोकनियुक्त सरपंच भादवण) यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी श्री. जनार्दन निऊंगरे , प्राचार्य रणजित गाडे ,( संस्कार कॉलेज गडहिंग्लज), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.साधना केसरकर, श्री. संदीप सुतार, श्री. विजय गाडे, श्री सागर खुळे, श्री संतोष डोंगरे , श्री शांताराम पाटील ,माजी मुख्याध्यापक श्री.पोवार मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे , श्री रविंद्र दोरुगडे, श्री नामदेव मुळीक , सौ. सुतार , राजे फौडेंशन समन्वयक श्री संतोष पाटील व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशासन आपल्या दारी; उत्तूर येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ उत्तूर येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या विशेष शिबिरात महसूल, वन तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकत्रितपणे उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित कामांवर थेट सुनावणी करून जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी हे महाअभियान महत्त्वाचे ठरणार आहे.
तहसीलदार आजरा तसेच उपविभागीय अधिकारी आजरा व भुदरगड यांनी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, आपल्या समस्या मांडाव्यात आणि मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

जि .प .,पं.स.च्या नवनिर्वाचित सदस्यांचा पेद्रेवाडी येथे सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व विकास कामाच्या माध्यमातून आपल्या मतदार संघाचा कायापालट करावा असे प्रतिपादन गोकुळ च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले. त्या प्रेद्रेवाडी येथील केदारी रेडेकर हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. पेद्रेवाडी ग्रामस्थ व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पदी निवडून आल्याबद्दल श्री अनिरुध्द रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. जयश्री गाडे, उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. यशोदा पोवार, पचायंत समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्री. समिर पारदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जनतेने निवडून देवून काम करण्याची संधी दिली आहे. त्या संधीचे विकास कामाच्या माध्यमातून सोने करावे. असे आवाहन केले. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना श्री अनिरुध्द रेडेकर म्हणाले, मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. नूल जिल्हा परिषद मतदार बरोबरच आजरा तालुक्याच्या विकास कामांमध्ये भरिव योगदान देणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी श्री. समिर पारदे व श्री. युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. रविंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व श्री. विश्वास येजरे यांनी सूत्रसंचालन केले.

आजऱ्याजवळील कर्पेवाडी क्षेत्रात आग

आजऱ्याजवळ असणाऱ्या कर्पेवाडी क्षेत्रात गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत आंबा, काजूच्या झाडांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले असून आजरा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने आग विझवली.
आजचे पंचांग
दिनांक : १७ एप्रिल २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या (सायंकाळी ०५.२१ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (दुपारी १२.०२ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : वैधृति योग (सकाळी ०७.२१ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : चतुष्पाद करण (सकाळी ०६.४९ पर्यंत) त्यानंतर नागवा करण
चंद्र राशी : मीन राशी (दुपारी १२.०२ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०४ ते दुपारी १२.३८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.२१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
मुंबई संघ पंजाब कडून पुन्हा एक वेळ पराभूत झाला. या विजयानंतर पंजाबने गुण तक्त्यात अव्वल स्थान पटकावले असून मुंबई नवव्या क्रमांकावर फेकली गेली आहे .
गोलंदाज अर्षदीप सिंग सामनावीर ठरला आहे.
आजचा सामना
गुजरात विरुद्ध कोलकता
स्थळ : अहमदाबाद
वेळ : सायंकाळी ७.३० पासून


