सोमवार दि.६ आक्टोंबर २०२५


मसणू सुतार यांच्या निधनाने तालुक्याचे मोठे नुकसान… शिरसंगी येथे शोकसभा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समितीचे माजी सभापती मसणू सुतार हा एक धडाडीचा नेता होता. सर्वसामान्यांशी त्यांची असणारी नाळ, काम करण्याचा धडाका, गोरगरिबांविषयी असणारी तळमळ आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते तालुकावासीयांच्या निश्चितच स्मरणात रहातील अशा शब्दात सुतार यांना शिरसंगी येथे आयोजित शोकसभेत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
सुतार यांच्यासोबतचे अनुभव अनेकांनी यावेळी बोलून दाखवले. प्रामाणिकपणा हा त्यांच्या नसानसात भिनला होता. त्यामुळे ते भौतिक सुखापासून अलिप्त राहिले. शेवटपर्यंत एसटी महामंडळाच्या गाडीने प्रवास करणारा सर्वसामान्यांच्या मिसळणारा एक नेता अशी त्यांची ओळख बनली. तालुका त्यांना कदापीही विसरणार नाही असेही गौरवोद्गार यावेळी काढले गेले.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, श्रीमती अंजनाताई रेडेकर, अशोकअण्णा चराटी, सुभाष देसाई, संभाजी पाटील,अभिषेक शिंपी,प्रा. सुनील शिंत्रे, संजय पाटील, युवराज पोवार, मारुती मोरे, संभाजीराव सरदेसाई, विकास बागडी, मधुकर यलगार ,जनार्दन नेऊंगरे,दशरथ घुरे, सौ.भारती जाधव, सी.आर.देसाई, संदीप चौगुले,बंडोपंत चव्हाण, बळवंत शिंत्रे, जी.एम. पाटील, शिवाजीराव नांदवडेकर,दिगंबर देसाई, दशरथ अमृते,गुरु गोवेकर,दादू केसरकर,शंकर पताडे, विनोद मुरकुटे, सुभाष सावंत, सुरेश सावंत,पांडुरंग लोंढे, रणजित कालेकर, ज्योतिप्रसाद सावंत, विश्वास जाधव, विजय थोरवत, धनंजय पाटील, दशरथ अमृते, संभाजीराव इंजल, सुरेश गिलबिले,जयवंत सुतार यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या स्मृतीदिनी रुग्णवाहिका देणार
सुतार यांनी आपले गुरु म्हणून राजकीय मार्गदर्शन केले. त्यांच्या स्मृती या कायम राहाव्यात यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मरणार्थ मुकुंददादा आपटे फाउंडेशनच्या वतीने रुग्णवाहिका देणार असल्याचे माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे यांनी जाहीर केले .
सुतार यांचे एक स्मारक असावे व त्यासाठी तालुका वासियांनी प्रयत्न करावा या मागणी बरोबरच केवळ त्यांच्या पुढाकाराने झालेल्या आजरा-नेसरी मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही वक्त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

आजरा कारखाना पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक
आजरा ,: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना संजय गटाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात आजरा साखर कारखाना चेअरमन व संचालकांसोबत दि.०३ रोजी आजरा विश्रामगृह मध्ये बैठक झाली. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत तालुका
प्रमुख श्री. संजय पाटील यांनी कारखान्यात झालेली बेरिंग चोरी तसेच शेअर्स रक्कम कमी भरलेल्या सभासदांना सभासद करुन घेणे याबाबत विचारणा केली होती. तसेच माजी आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई यांनी आजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा ही बोगस ताळेबंदावर आधारीत बोगस वार्षिक सभा असा आरोप केला. या आरोपाच्या स्पष्टीकरणाखातर कारखाना अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शेतक-यांचे साल २०१७/२०१८ व २०१८/२०१९ सालातील १२ कोटी २४ लाख देणे हे सन २०१९/२०२० पासुन देणे न दाखवता भागभांडवल अनामत व रिझर्व्ह फंडाकडे वळते करण्यात आले. तसेच जमीनीचे पुर्नः मुल्यांकन सन २०२३/२०२४ मध्ये जवळपास १५२ कोटींनी वाढवून २७ कोटी जमीनीचे व्हॅल्युएशन १८० कोटीपर्यंत नेण्यात आले, प्री-ऑपरेटिव्ह खर्च हे सन २०२१/२०२२ पासुन खर्चात न दाखवता मालमत्तेमध्ये २२ कोटी ३० लाख इतके दाखवण्यात आले, ते आता वाढवून सन २०२४/२०२५ मध्ये ३३ कोटी ४ लाख पर्यंत वाढवण्यात आले आहेत व त्यावर कोणत्याही प्रकारचा घसारा आकरण्यात येत नाही. साखर यंत्रसामग्रीत सन २०२४/२०२५ मध्ये जवळपास ७ कोटी ८४ लाखाची वाढ झालेली असुन सुद्धा एकुण गाळप क्षमतेत अपेक्षित वाढ झालेली नाही. हे सर्व पाहता कारखाना सन २०२४/२०२५ अखेर १२१ कोटी ७४ लाख तोट्यात नसून खरे पाहता तो अंदाजे ३२५ कोटी तोट्यात आहे. तसेच चालू वर्षी तो १ कोटी ४२ लाख नफ्यात नसून अंदाजे ३ कोटी ४० लाख तोट्यात असल्याचे दिसते. इतके असून सुद्धा संचालक मंडळाने चालू वर्षाअखेर ३ लाख २३ हजार २५० इतका बैठक भत्ता उचलला असून हि गोष्ट चिड आणणारी आहे. या सर्व मुद्यांच्या आधारावर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातल असतानाच संचालक मंडळाने एक आठवड्यात खुलासा न केल्यास मध्यम मुदत कर्ज १२२ कोटी पुरवठा करणा-या NCDC तसेच साखर सहसंचालक व साखर आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले होते.याची दखल घेऊन दि.०३ रोजी चेअरमन व संचालक मंडळासोबत शिवसेना पदाधिका-यांची बैठक आजरा विश्रामगृहावर करण्यात आली. यावेळी वरील सर्व मुद्यांचा उहापोह करण्यात आला. यावेळी प्राथमिक स्वरुपात शेतकरी देणे १२ कोटी २४ लाख सन २०१९/२०२० ताळेबंदाप्रमाणे वार्षिक अहवालात जसेच्या तसे दाखवणे व ते परत देण्याबाबत निश्चीत कार्यक्रम प्रसिद्ध करणे व शेअर्सपोटी काही रक्कम भरुन घेतलेल्या शेतक-यांना सभासद करुन घेणे व टप्या-टप्याने उर्वरीत शेअर्स रक्कम पुर्ण करुन घेणे, ५ हजार आतील शेअर्म धारकांना दिवाळी पुर्वी साखर देणेत यावी.
या वरील प्रमुख दोन मागण्यांबाबत संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारपरिषदेद्वारे याबाबत रितसर घोषणा करुन याचा अंमल तात्काळ करणेत यावा. अशी मागणी शिवसेना पदधिका-यांकडून करण्यात आली असून इतर मागण्याबाबत चर्चा वरील मुद्द्यावर निर्णय झालेनंतर करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी आजरा कारखाना चेअरमन श्री. मुकंदराव देसाई, व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. अनिल फडके तसेच कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत व अधिकारी उपस्थित होते.

बोलीभाषांचे संवर्धन ही काळाची गरज – प्रा. दिलीप संकपाळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिकीकरणामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना बोलीभाषांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रा. दिलीप संकपाळ यांनी नुकतेच व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रा. संकपाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
प्रा. संकपाळ पुढे म्हणाले की, गेल्यावर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्याबद्दल सर्वत्र अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे. अशावेळी मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण थोपवायचे असेल तर मराठीच्या बोलीभाषांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर डॉ. आप्पा बुडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. सुषमा पारकर, प्रा. सुवर्णा धामणेकर, प्रा. वैशाली देसाई, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील आदी उपस्थित होते.

निधन वार्ता
जयश्री शिवणे

आरदाळ ता. आजरा येथील सौ.जयश्री जोतिबा शिवणे ( वय ३८ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती असून रक्षा विसर्जन मंगळवार ७ रोजी आहे.
श्रीमती पार्वती पाटील

कानोली (ता. आजरा ) येथील श्रीमती पार्वती गणपती पाटील ( वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे, रक्षा विसर्जन मंगळवार दि. ७ रोजी कानोली मुक्कामी आहे.
गजानन दूध संस्थेचे व्हा. चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

आजरा हायस्कूलमध्ये हादगा पूजनातून आरोग्य जागर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे पारंपरिक महाहादगा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिला, विद्यार्थिनी व मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात हादगा पूजन व हादगा फेर ने झाली. त्यानंतर विभाग प्रमुख श्रीम. एस. एस. कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. प्रतिभा चव्हाण यांनी “सुखी आरोग्याचा मूलमंत्र” या विषयावर मार्गदर्शन करत सद्यस्थितीतील महिलांचे रोग, लसीकरणाचे फायदे, तसेच सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थिनी व पालकांसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली. तसेच डॉ. सौ. सुप्रिया रुद्रापगोळ व डॉ. गीता कोरे यांनी आरोग्य, स्वच्छता व संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. विविध प्रात्यक्षिकांद्वारे मुलींना संरक्षणाचे धडेही दिले गेले.
हादगा निमित्त पाककला व एकपात्री प्रयोग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना व परीक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अध्यक्षीय मनोगत सौ. मुग्धा अनिकेत चराटी यांनी व्यक्त केले. त्यांनी हादगा या पारंपरिक सणाच्या आठवणींना उजाळा देत मुलींना उपयुक्त मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला डॉ. सौ. अंजनी अनिल देशपांडे, सौ. ज्योत्स्ना योगेश पाटील (माजी नगराध्यक्ष), माजी मुख्याध्यापिका व सल्लागार सुरेखा भालेराव, सौ.नूरजहॉं सोलापुरे ,महिला पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. अजित तोडकर सर, उपमुख्याध्यापक सौ. हेमलता कामत , पर्यवेक्षक श्री. आनंदा व्हसकोटी यांचे प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एम. एस. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. व्ही. एच. अडकूरकर यांनी मानले.

छायावृत्त…

पावसाने उघडीप दिल्यानंतर तालुक्याच्या पूर्व भागात भात कापणी व मळणीची कामे वेगावली आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मागणी करत असताना सुळे परिसरातील शेतकरी.

आजऱ्यातून दीपावली साठी पुणे-मुंबईसाठी जादा बस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा एसटी आगारातून दीपावली सणासाठी १५ ऑक्टोबरपासून बोरीवली, परेल, वल्लभनगर, स्वारगेट या मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख प्रवीण पाटील यांनी केले आहे. आजरा आगारातून सकाळी ६ वाजता आजरा – स्वारगेट, दुपारी ४:३० वाजता आजरा – बोरिवली, सायंकाळी ६ वाजता आजरा – परेल व सायंकाळी ७ वाजता आजरा वल्लभनगर या बस सोडण्यात येणार आहेत. प्रवासी वर्गाने
या बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर होणार

नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज दि.६ /सोमवारी जाहीर होणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर बुधवारी दिनांक ८ रोजी प्रभाग निहाय मतदार यादी व सदस्य पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे.


