mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.४ जून २०२५       

पिसाळलेल्या कुत्र्याचा १४ जणांवर हल्ला…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा व बुरुडे येथे काल मंगळवारी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत केलेल्या हल्ल्यात १४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसभर शहर व परिसरात कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते. स्थानिक तरुणांनी अखेर त्या कुत्र्याला यमसदनी धाडले.

        बुरुडे येथून पिसाळलेले कुत्रे शहरात आले. त्यांने बुरुडे येथील काही जणांचा चावा घेतला. संताजी पुल ओलांडून ते सुतार गल्ली परिसरात वावरत होते. दरम्यान त्यांने दिसेल त्यांचा चावा घेतला. त्यामुळे शहरातील नागरीकांची धावपळ उडाली. पुढे ते कुत्रे आजरा ग्रामिण रुग्णालयाकडे गेले. तेथे त्याने काहींचा चावा घेतला. त्यानंतर ते चाफे गल्लीच्या दिशेने पळाले. दिवसभर त्याचा वावर शहरात राहील्याने नागरीकात भितीचे वातावरण होते.

      मनोहर नारायण पाटील (साळगाव), सखाराम आप्पा बागवे (बुरुडे), कविता बाबू बोलके (बोलकेवाडी), समीर चांद, समिना चांद, शिवाजी बंडू पारपोलकर, उदय श्रीपतराव सरदेसाई, वामन सामंत (आजरा) यांच्यासह सुमारे १४ जणांचा कुत्र्याने चावा घेतला आहे. शहरातील तरुणांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले.

कायमस्वरूपी उपाय नाहीच…

       शिवसेनेच्या वतीने भटक्या कुत्र्यांना घेऊनच बंदोबस्तासाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु या मोर्चाची फारशी गांभीर्याने नगरपंचायतीकडून दखल घेतली गेली नाही. सध्या पुन्हा एकवेळ शहरभर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसू लागले आहे.

स्वप्न साकार…
आयपीएल चषकावर कोरले ‘ आरसीबी ‘ चे नाव

       आयपीएल चषक पटकावण्याचे आरसीबी चे स्वप्न साकार झाले असून तब्बल १८ वर्षानंतर अंतिम सामन्यात पंजाबला नमवत आरसीबीने प्रथमच आयपीएल चषकावर आपले नाव कोरले.

     अंतिम फेरीतील आरसीबीच्या विजयानंतर आरसीबी समर्थकांनी देशभर जल्लोष केला.

     तालुक्यात  स्मार्ट मीटरला प्रतिबंध करा…

तालुका सरपंच संघटनेची वीज कंपनीकडे मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी घरगुती विज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. या मिटर्सना प्रतिबंध करणेत यावा अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आजरा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

    ग्रामीण भागातून या मीटरबाबत तक्रारी येत आहेत. शिवाय प्रामीण घरगुती विज बिले या मीटरमुळे वाढून येत आहेत. कांही ठिकाणी तर विज बिल दुप्पट येत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर यांना ही बिले परवडण्यायोग्य नाहीत. शिवाय ग्रामीण भागात विजेचा वापर कमी असतो. यामुळे येथील आकार कमी असायला हवा मात्र तसे होत नसल्याने या स्मार्ट मीटर वापराने ग्राहकामध्ये प्रचंड नाराजी आहे. एकीकडे शासन १०० युनिट बिज मोफत देणार अशी घोषणा करीत असताना स्मार्ट मिटर बसवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. तेव्हा ग्रामीण भागात घरोघरी लावलेली स्मार्ट मीटर काढून त्या ठिकाणी पूर्ववत विज मीटर बसविणेत यावीत, याची कार्यवाही न झालेस बिज बिलांची थकबाकी वाढणार आहे. तेंव्हा मीटर्स काढावीत अन्यथा तालुक्यातील जनता या मीटर्स विरोधात आंदोलन हाती घेईल पाची नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.

      यावेळी मारुती मोरे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बापू नेऊंगरे, सौ सुषमा पाटील, सौ. जयश्री गिलबिले, सौ. सरिता पाटील, सौ. स्वाती कोंडुसकर, सौ. भारती डेळेकर, संदीप चौगले, प्रशांत कोटकर , सविता जाधव, नारायण देसाई, समीर देसाई आदी उपस्थित होते.

बकरी ईद शांततेत व उत्साहात साजरा करा : रामदास इंगवले

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      बकरी ईद कालावधीत नमाज पठण वेळी गोंधळ, गडबड करू नये, नमाज पडण्याच्या ठिकाणी स्वच्छ्ता ठेवावी, उघड्यावर कुर्बानी करण्यात येऊ नये. सण उत्साहात व शांततेत साजरा करावा असे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी केले आजरा पोलीस स्टेशन मध्ये बकरी ईद पार्श्वभूमीवर आयोजित मुस्लिम बांधवांच्या बैठकीत ते होते.

      यावेळी इंगवले म्हणाले, सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, आक्षेपार्ह पोष्ट होणार नाही याबाबत समाजातील जाणकार मंडळींनी इतरांना सजग करावे. नगरपंचायत प्रशासन यानी वेस्टेज टाकण्याकरीता व्यवस्था केलेल्याच ठिकाणी वेस्टेज टाकण्यात यावेत. उघड्यावर वेस्टेज टाकण्यात येऊ नये असेही त्यांनी सांगितले.

      यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, नगरपंचायतीचे निहाल नायकवडी, अमर कांबळे, संजय यादव हे अधिकारी, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, नौशाद बुड्ढेखान, युनुस सय्यद, सलीम लतीफ, अमजद माणगावकर, बबलू दरवाजकर, मंजूर मुजावर,अबू पठाण, अष्कर लष्करे, हुसेन दरवाजकर, जब्बार वंटमुरे, तौफिक काकतीकर आजरा शहरातील  मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्ती, मशीद ट्रस्टी, मजीद मौलवी  उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी शिबिरात माजी आमदार राजेश पाटील यांचे मार्गदर्शन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीला प्रारंभ झाला असून वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघातील वाटंगी गावातून शिबिराद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सन्मित्र पतसंस्था सभागृहात सदर शिबिराचे आयोजन केले होते.

      यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस कडून राबवण्यात आलेले विकास कामे तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून. पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सभासद नोंदणी शिबिर आयोजित केले असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष अनिल फडके, अल्बर्ट डिसोजा आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई ,एम. के. देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे ) , वाटंगीचे सरपंच मधुकरराव जाधव, जनार्दन बामणे, बाबुराव गिलबिले, यांच्या किणे, कोळिंद्रे, शिरसंगी, वाटंगी मोरेवाडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजीराव नांदवडेकर यांनी आभार मानले.

पुढच्या वर्षी सोहाळेची लक्ष्मी यात्रा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सोहाळे (ता. आजरा) येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा २८ व २९ एप्रिल २०२६ रोजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या श्री महालक्ष्मी-मरगुबाई मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

      यापूर्वी झालेल्या तब्बल १४ वर्षाचा कालावधी झाल्याने यात्रा करण्याची गरज ग्रामस्थांनी बोलून दाखवली. यानंतर ग्रामदैवत भावेश्वरी, जिनोबा व लक्ष्मीदेवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. या यात्रेच्या अनुषंगाने केले जाणारे विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

      यावेळी यात्रेचे मानकरी, स्थानिक सोहाळेकर ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कोल्हापूर जिल्हा कोरोना अपडेट...

       कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे एकूण १६ रुग्ण आढळले असून यामध्ये कोल्हापूर महापालिका हद्दीतील  ११ रुग्णांचा तर ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यात निदान झालेले दोन रुग्ण आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे.

     पाऊस पाणी

      आजरा शहर व परिसरात काल दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. विशेषतः पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. आज बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.

वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हिवताप जनजागरण मोहीम

 आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रमांतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून महिन्यात आरोग्य विभागामार्फत हिवताप चीकून गुनिया, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन या आजारांच्या प्रतिरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणी मध्ये जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेऊन प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वीच म्हणजेच जून महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो.
वाटंगी तालुका आजरा येथील आरोग्य उपकेंद्रामार्फत जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

       या जनजागरण मोहिमेमध्ये शहर पातळीवर कीटकजन्य रोगांची लक्षणे उपचार व विविध उपाय योजना यांची माहिती योग्य माध्यमाद्वारे पोहोचविणे आवश्यक आहे. डास उत्पत्ती प्रतिबंध उपाय योजनांमध्ये लोक सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे व हाच या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉल्बी नकोच…

mrityunjay mahanews

पोलिसांना सुट्टीतील कामाचा मोबादला म्हणून महिन्याचा पगार द्या!.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!