सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५


आजऱ्यात २८ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण येत्या २८ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती छ. शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना विजयकुमार पाटील म्हणाले, सर्व जाती धर्माचे, राजकीय पक्ष व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आम.शिवाजी पाटील, खास.शाहू महाराज,साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्यासह सतेज पाटील, के.पी. पाटील,संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत हा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.२८ तारखेला धार्मिक विधीसह पोवाडे, आतषबाजी व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे
२९ तारखेला शिवजयंती निमित्त सकाळी ११ नद्यांच्या पाण्याचा जलाभिषेक, महिलांची शोभायात्रा संजीव देखावा, मर्दानी खेळ, महिलांची शोभायात्रा व सायंकाळी ४ वाजता महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू टोपले, अशोकराव चराटी, विलास नाईक,मारुती मोरे, संभाजी इंजल, संजयभाऊ सावंत, संतोष शेवाळे, सुमित सावंत, ॲड. सचिन इंजल, जितेंद्र शेलार, दिवाकर नलवडे, आनंदा कुंभार आदी उपस्थित होते.

लाखोंच्या दुचाकी पण अपघात कायम...
पुढे धोका आहे...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर काल देवर्डे येथील झालेल्या अपघातात कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलासराव रेडेकर यांच्या एकुलत्या एक मुलाचे मोटरसायकल अपघातात निधन झाले. मुलगा सिद्धेश हा वेगावर स्वार होऊन छंद म्हणून दुचाकीने भटकंती करणारा महाविद्यालयीन तरुणाईचे प्रतीक होता. अपघातग्रस्त मोटरसायकलची किंमत सुमारे १२ लाख रुपये इतकी होती. तर हेल्मेटची किंमत ७० हजारांच्या आसपास होती असे समजते. डोक्यावर हेल्मेट असूनही या अपघातात सिद्धेशला मृत्यूला सामोरे जावे लागले हे दुर्दैव म्हणावे लागेल.
सध्या झालेल्या संकेश्वर – बांदा महामार्गावरील हौस म्हणून रायडिंग करणाऱ्या दुचाकी स्वारांच्या बाबतचा पाचवा अपघात आहे. रस्त्यावरील वळणांचा अंदाज न आल्याने भन्नाट वेगाने जाणाऱ्या रायडर्सना यापूर्वीही असे अपघात होऊन रायडर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुळातच या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आजही कायम आहेत. ही वळणे जीवघेणी ठरत आहेत.
आर्किटेक्टचे शिक्षण घेणाऱ्या सिद्धेशच्या मृत्यूने वाहन कितीही महाग व सोयी- सुविधांनी युक्त असले तरीही वेळ सांगून येत नाही हा धडा निश्चितच तरुणाईला दिला आहे.

शिक्षक बांधवांच्या ‘रामतीर्थ’चा आज रौप्य महोत्सव…

रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा आज सोमवारी रौप्य महोत्सव समारंभ व नूतन इमारत भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे त्यानिमित्त…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या झेंड्याखाली एकत्र येत २५ वर्षांपूर्वी आजरा तालुक्यातील शिक्षकांनी जनार्दन नेऊंगरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाला उभारणी दिली. शासनाच्या अन्यायकारक धोरणांना, शिक्षणाची अव्यवस्था करणाऱ्या विचारांना, मोर्चे आंदोलने, धरणे आंदोलने याद्वारे अधिवेशनाच्या मांडवातून कडाडून विरोध केला.
संघटनेचा वाढता व्याप सांभाळत असताना स्वतःचे आर्थिक व्यवस्थापन करणारी सहकारी संस्था असावी या उद्देशाने १४ फेब्रुवारी २००० रोजी रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली संस्थापक जनार्दन नेऊंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्प भांडवलावर सुरू केलेली ही संस्था सभासदांच्या पाठबळाच्या जोरावर भरभराटीस आली. २० कोटीहून अधिक ठेवी १६ कोटी हून अधिक कर्जे यासह विक्रमी २८% पर्यंत लाभांश वाटपही केले.
महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पालकमंत्री नाम. प्रकाश आबीटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज संस्थेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभही होणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत रामतीर्थ समूहाचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे. तीन दशकाहून अधिक काळ शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत.
रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पत संस्थेने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप, मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सर्व अत्याधुनिक सेवा संस्था देत असून पारदर्शक व्यवहाराद्वारे विश्वासाचा ब्रँड ‘रामतीर्थ’ नेत्रदीपक प्रगती करत आहे…(ज्योतिप्रसाद सावंत)

आजरा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस विभागाचे आज उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक व सर्व अत्यावश्यक सेवांनी सुसज्ज डायलिसिस विभागाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज सोमवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.
आजरा व शेजारील सर्व खेड्यापाड्यातील गरजू गोरगरीब रुग्णांना सदर सेवेचा लाभ देण्याच्या उद्देशाने सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच स्वतंत्र सुसज्ज डायलिसिस मशीन, तज्ञ व अनुभवी डायलिसिस तंत्रज्ञ व कुशल सुज्ञ सपोर्टिंग स्टाफची व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुकावासीयांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

व्यंकटराव संकुल आजरा येथे ‘सायन्स अकॅडमी वर्ग ‘ शुभारंभ …

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मार्फत ‘सायन्स ॲकॅडमी’ वर्गाचा शुभारंभ कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते इतिहास अभ्यासक, लेखक व कवी प्रा. मधुकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
‘ उद्याच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक यांची भूमिका’ या विषयावर बोलताना प्रा.मधुकर पाटील म्हणाले, विद्यार्थ्याने लहानपणापासून आपले ध्येय निश्चित करावे ते करत असताना प्रथम आपल्या परिस्थिती आणि डोळ्यासमोर आई-वडिलांचे काबाड कष्ट यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि इतर अवांतर गोष्टीकडे त्याचे मन वळणार नाही. कष्ट करण्याची तयारी आणि वेळेचे नियोजन तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून गरीब परिस्थितीतही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनेक ध्येयवादी विद्यार्थ्यांनी प्रशासनात नाव कमवले आहे.
संस्थेचे सचिव श्री. अभिषेक शिंपी यांनी प्रास्ताविकामध्ये आजरा शहरात प्रथमच व्यंकटराव संकुलामार्फत सुरू होणाऱ्या सायन्स अकॅडमी या वर्गाचा उद्देश स्पष्ट करताना तालुक्यातील गाव व खेडोपाड्यातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना जेईई,नीट, परीक्षेची तयारी करता यावी आणि पुढे आपल्या अकॅडमी मधून आयआयटीमध्ये प्रवेश, शास्त्रज्ञ ,उत्कृष्ट इंजिनियर, डॉक्टर, तसेच अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी ही या वर्गातून करून घेतली जाणार आहे. यासाठी इयत्ता आठवी नववी दहावी साठी फाउंडेशन कोर्स व अकरावी बारावी ॲकॅडमीचा कोर्स सुरू करत आहोत यामध्ये दिल्ली येथील नामांकित कॉलेजमधील अकॅडमी वर्गातील अध्यापनाचा अनुभव असणारे चार प्राध्यापक ज्ञानदान करणार आहेत असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. जयवंतराव शिंपी यांनी प्रशालेच्या या यशस्वी वाटचालीमधील अकॅडमी वर्गाचा शुभारंभ म्हणजे आपल्या व्यंकटराव प्रशालेतून अनेक विद्यार्थी प्रतिवर्षी पालक शिक्षक यांच्या संस्कार आणि ज्ञानाच्या जोरावर देशातील विविध क्षेत्रात आजऱ्याच्या मातीचा सुगंध दरवळत ठेवणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्री. एस. पी. कांबळे, खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक कृष्णा पटेकर, श्री. सचिन शिंपी, श्री. पांडुरंग जाधव, श्री. सुधीर जाधव , श्री. विक्रांत पटेकर, श्री. अशोक पोवार,प्राचार्य श्री.आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे. शेलार, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. पन्हाळकर, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी चव्हाण, भादवण हायस्कूल मुख्याध्यापक श्री. एस. एन. पाटील, सिरसंगी हायस्कूल मुख्याध्यापक श्री. महादेव नागुर्डेकर, देवर्डे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. सुभाष सावंत ,पालक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले, आभार सौ. व्ही.ए वडवळेकर यांनी मानले.

राईवला महिला दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सातेवाडी येथील राईवला महिला दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. २००३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची स्थापनेपासूनच निवडणूक सातत्याने बिनविरोध झाली असून बिनविरोधची ही परंपरा कायम राहीली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून ऋषिकेश कुलकर्णी यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव बंडू पाटील यांनी काम पाहिले.
या निवडणूकीत विद्यमान चेअरमन सुमन पोतनीस, वृषाली पोतनीस, शारदा पोतनीस, स्वाती पोतनीस, मनिषा पोतनीस, शोभा पोतनीस, राजश्री पोतनीस, अनुराधा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक राजाराम पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यासाठी नंदा पोतनीस, सुनीता पोतनीस, सरस्वती पोतनीस, रत्नाबाई पोतनीस, रेश्मा पोतनीस, द्रौपदा शेडगे, जयश्री पोतनीस, अनिता पोतनीस, शांताबाई पोवार यांचे सहकार्य लाभले.

हंदेवाडी येथे रेणुकादेवीचा जागर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी ता. आजरा येथे पत्रकार पुंडलिक सुतार व रेणुका महिला भक्त यांचेवतीने श्री रेणुका देवीचा जागर उत्साहात पार पडला. यावेळी सोनाली प्रभाकर कदम व सहकारी कलाकार यांनी केली. श्री रेणुकादेवीचा जागर केला. माजी उपसरपंच व सदस्य सदाशिव हेबाळकर यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गायक सोनाली कदम,निर्माता दिलीप सावंत ,शाहीर शांताराम कांबळे वेसरडे,यांनी गायन केले.यानंतर सोनाली कदम व दिलीप सावंत यांनी रेणुका देवीची जन्म कथा सांगितली. श्री रेणुका देवी आरती ने जागराची सांगता झाली.स्थानिक व पंचक्रोशीतील भाविकांनी जागराचा लाभ घेतला.

निधन वार्ता
प्रदीप मुठाणे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता. आजरा येथील श्री प्रदीप रघुनाथ मुठाणे ( वय ६४ वर्षे ) सेवानिवृत्त वाहन चालक जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने कोल्हापूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून आजरा पंचायत समिती कडील सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षिका सुमन मोहिते यांचे ते बंधू होत.


