गुरुवार दि.५ जून २०२५


अतिवृष्टी व महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील नदीकाठावरील ११ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका आहे. २०१९ मध्ये या ११ गावाना महापुराचा वेढा पडला होता. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाकडून दक्षता घेतली जाणार आहे. तालुका प्रशासनाकडून या गावांची पहाणी केली जाणार असून स्थानिक प्रशासनाला सुचना देण्यात येणार आहेत. संभाव्य महापूर परिस्थिती गृहीत धरून प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या हिरण्यकेशी, चित्री, चिकोत्रा या नद्यांच्या काठावर ४० गावे आहेत. पण यापैकी ११ गावांना पुराचा धोका संभवतो. सन २०१९ मध्ये या गावांना महापुराचा वेढा पडला होता. पिक व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही कुटुंबे बेघर झाली होती. या काळात प्रशासनाने प्राथमिक शाळामध्ये निवारा केंद्र सुरु केली होती. जून महीना सुरु झाला आहे. मान्सुनला सुरवात होणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यान्वीत झाला आहे. या गावात संभाव्य पुर, महापुराची शक्यता असल्याने विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. धोकादायक घरे, रेशन धान्य यासह विविध गोष्टीबाबत आतापासून कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने दक्षतेच्या सुचना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.
पुराचा धोका असणारी गावे-
गजरगाव, कोवाडे, किटवडे, शेळप, देवकांडगाव पैकी तेजम वसाहत, खेडे, मडिलगे, हारुर, साळगाव, वडकशिवाले, विनायकवाडी या गावांना पुराचा धोका संभवतो.
” तालुक्यातील ११ गावाना पुराचा धोका संभवतो आहे. त्यामुळे या गावात पावसाळ्यात विविध उपयायोजना कराव्या लागतील. या गावांना भेट देवून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देणार आहे.”
…. समीर माने (तहसीलदार, आजरा)

उघड्यावर मद्यपान…
पोलिसांची कारवाई सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील रिकाम्या जागा, सध्या सुट्ट्यामुळे बंद असणाऱ्या अंगणवाड्या, शाळा, मैदानांचा परिसर याचा वापर मद्यपींकडून कडून ओपन बार म्हणून केला जात आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पहात थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे उघड्यावर मद्यपान करणाऱ्या मंडळींची चांगलीच अडचण झाली आहे.
बारमध्ये मद्याचे दर परवडत नसल्याने अनेक जण अशा ओपन बारचा वापर करत असल्याचे दिसत आहे. यामुळे ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. काही ठिकाणी तर या बाटल्या फोडून टाकल्याचेही दिसते. याचा निश्चितच इतरांनाही त्रास होतो.

मुंबई प्रवासाचा दर वधारला…
खाजगी वाहन चालकांकडून लुट सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने सुट्टीनिमित्त गावी आलेल्या मुंबईस्थित चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. मोठ्या संख्येने आलेला चाकरमानी आठवडाभरामध्ये पुन्हा मुंबईला परतणार असल्याने खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मुंबई साठी प्रतिव्यक्ती बाराशे ते दोन हजार रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे.
आजरा, चंदगड, गडहिंग्लज भागातील मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले असल्याने परतणाऱ्यांची प्रचंड संख्या व एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बस फेऱ्या याचा परिणाम म्हणून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट आकारणी भरमसाठ वाढ केली आहे.
कांही प्रवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंधरा दिवस ते महिनाभर आधीच आरक्षण केले आहे. हे आरक्षणही बऱ्यापैकी जादा दरानेच करण्यात आलेले आहे.
एकंदर मुंबईकर तालुकावासियांची लूट पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

पावसाची रिपरिप…
भात तरव्यांची अडचण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मे महिन्यातील शेवटच्या पंधरवड्यात सातत्याने झालेल्या पावसाने खरीप हंगामासाठी शेतजमिनी तयार नसतानाच पावसाची रिपरीप सुरूच आहे . यामुळे भात तरवे तयार करताना सततच्या पावसाचे संकट कायम आहे. सध्या जमिनीमध्ये ओलावा कायम असल्याने तरवे तयार करण्यात अडचणी येत आहेत.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा दणका उन्हाळी पिकाला बसलाच आहे. भुईमुगासह उन्हाळी पिके अडचणीत आली. किमान खरीप हंगाम व्यवस्थित पार पडेल अशा अपेक्षेत बळीराजा असताना मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाने उघडीप देणे गरजेचे बनले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे (ता. आजरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. भीम गर्जना कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देवर्डे या तालुक्यातील पहिल्यांदा बौद्ध धम्म स्वीकारलेल्या गावातून आणलेल्या धम्मज्योतीचे स्वागत करून तिची आणि सर्व महामानवांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, सकाळी सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून, बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रवीण कांबळे, अनुराग कांबळे, सुरज कांबळे, योगेश कांबळे, किरण कांबळे, प्रतीक कांबळे, सुमित.कांबळे, सुधीर कांबळे, रोहन कांबळे, रूपक कांबळे, परसू कांबळे, नेताजी कांबळे, गौतम कांबळे, सचिन कांबळे, मिथुन कांबळे, बाबासाहेब कांबळे, आकाश कांबळे, राकेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधानाचे घरोघरी वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान म्हणजे त्यांचे विचार घरोघरी पोहोचवणे, हे तत्व लक्षात घेऊन ॲड. गायत्री धनाजी कांबळे यांच्या वतीने भीमनगरमध्ये घरोघरी भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले.

आजरा साखर कारखान्यामार्फत सभासदांना साखर वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत भाग भांडवल रु.१५०००/- व रू.१०,०००/- जमा असलेल्या सभासदांना साखर वाटप सुरू आहे. कारखान्याकडे शेअर्स पोटी रु.५०००/- ते रू. १००००/- पर्यंत रक्कम जमा असलेल्या मंजुर सभासदांनाही प्रत्येकी १० किलो साखर प्रति किलो रू.२५/- या सवलतीच्या दरात देणेचा निर्णय घेणेत आला आहे. सदर साखर साखर उचलणेची मुदत दि.३० जून अखेर ठेवणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचा पुर्ण सभासद रू. १५९९९/- चा असलेने ज्या सभासदांना शेअर्स रक्कम रू. १००००/- किंवा रू.१५०००/- पुर्ण करावयाची आहे त्यांनी अपुरी रक्कम दि.३० जून पुर्वी जमा केलेस त्यांनाही शेअर्स रक्कमेच्या प्रमाणात २५ किलो व ५० किलो साखर उचल दिली जाईल. कारखान्याच्या रु.५०००/- व त्यावरील शेअर्स रक्कम भरलेल्या मंजुर सभासदांनी कारखान्याचे संबंधीत शेती सेंटर ऑफीस मधुन साखर कार्ड घेवून आपल्या तालुका संघाच्या शाखेमधुन मुदतीत साखर उचल करावी असे आवाहन चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. सुभाष देसाई, कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत व सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.



