सोमवार दि.२६ मे २०२५


पालकमंत्र्यांच्या घरावरील गिरणी कामगारांचा मोर्चा पोलिसांनी अडविला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या घरावरील गिरणी कामगारांचा मोर्चा पोलिसांनी अडविला. अखेर गिरणी कामगारांनी मोर्चाने क्रांती चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा स्थगित केला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने संख्येने गिरणी कामगार वारसदार गारगोटी येथे उपस्थित होते. १५ मार्च २०२४ रोजीचा जी आर रद्द करा व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देऊन पुनर्वसन करा या मागणीसाठी गिरणी कामगार वारसदार गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्याकरिता जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांना अडवले. यावेळी आक्रमक भूमिका घेत कामगार कामगारांनी गारगोटी बस स्थानकात मध्ये ठिय्या आंदोलन केले.अखेर प्रचंड पाऊस व लांबुन आलेले गिरणी कामगार यांच्याशी बोलून कॉ. अतुल दिघे यांनी या पुढे आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा देऊन हा मोर्चा स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
या मोर्चाला कॉ. अतुल दिघे, कॉ. धोंडीबा कुंभार, कॉ. शांताराम पाटील, गोपाळ गावडे, शिवाजी सावंत, नारायण भडांगे, कृष्णा चौगुले, अमृता कोकीतकर, पद्मिनी पिळणकर, तुकाराम तळप यांनी मार्गदर्शन केले व पुढील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
मोर्चाला वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौतुकास्पद…
पाच लाखांचा ऐवज प्रामाणिकपणे परत…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसच्या प्रतीक्षेत ते दांपत्य होते होते. बस आली. दांपत्य गाडी चढले व गाडी सुरूही झाली. प्रवास करत असताना आपली दागिने, पैसे व मोबाईल असणारी पर्स ज्या ठिकाणी आपण बसची वाट पाहत बसले होते तेथेच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पुन्हा पदरी पडेल की नाही याची शंका होती. फोन पर्समध्ये असल्यामुळे त्याच फोनवर दुसऱ्या फोनद्वारे रिंग केली. फोन उचलला गेला. तुम्ही काही काळजी करू नका तुमची पर्स आमच्या जवळ सुखरूप आहे… असा आश्वासक आवाज पलीकडून आल्याने ‘ त्या ‘ प्रवासी दांपत्याचा जीव भांड्यात पडला.
समोरून आवाज देणाऱ्या होत्या पेद्रेवाडी येथील सौ. स्मिता निलेश -हाटवळ. आणि ज्यांचा जीव भांड्यात पडला त्या होत्या किटवडे येथील सौ.शुभांगी अमित पाटील. -हाठवळ कुटुंबीयांनी त्यांची पर्स प्रामाणिकपणे त्यांच्या स्वाधीन केली.
आजरा – आंबोली मार्गावरील हॉटेल विनोद परीसरात घडलेला हा प्रकार कौतुकास्पद तर आहेच परंतु आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे याची अनुभूती देणाराही आहे.

पशुसंवर्धन विभागातील वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करावेत… डॉ. पी. डी. ढेकळे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विशेष घटक योजना व जिल्हा आदिवासी घटक योजनेअंतर्गत विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे.
आजरा तालुक्यातील पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक- युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक २ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.डी. ढेकळे यांनी केले आहे.

रस्त्याचे काम निकृष्ट…
सिरसंगी ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
५०५४-४३९१ इतर जिल्हा विकास व मजबुतीकरण करणे सन २०२३-२४ या योजनेतून केलल्या सिरसंगी -कागीनवाडी- सुळे रस्त्याचे काम हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर रस्त्याचे अंदाजपत्रकीय रक्कम ही २६,७६४८४/-आहे. सदर रस्ता गोठणदेव परिसरातील डांबरी रस्त्यापासून होणे गरजेचे होते. पण अंदाजे १०० मीटर अंतर सोडून सदर रस्त्याचे काम केले आहे. त्यामुळे पावसाळयात या भागातील सर्व शेतकऱ्यांना हा रस्ता असून खोळंबा नसून अडचण असल्यासारखे आहे. संबंधीत ठेकेदाराने परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर रस्ता केला आहे तरी ठेकेदाराने राहिलेला १०० मीटर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन द्यावा अशी मागणी तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन शिरसंगी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनावर शशीकांत राजाराम देसाई, वसंत लक्ष्मण दळवी,श्रावण धोंडीबा देसाई, चंद्रकांत बाबुराव देसाई, हणमंत वांजोळे, मारुती पत्ताडे, प्रमोद पत्ताडे आदींच्या सह्या आहेत.

पुढच्या वर्षी साळगावची लक्ष्मी यात्रा…
ग्रामस्थांची बैठक उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव (ता. आजरा) येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा ५ व ६ मे २०२६ रोजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या तब्बल १८ वर्षाचा कालावधी झाल्याने यात्रा करण्याची गरज ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
यानंतर ग्रामदैवत ज्योतिर्लिंग व लक्ष्मीदेवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. या यात्रेच्या अनुषंगाने केले जाणारे विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी यात्रेचे मानकरी, स्थानिक साळगावकर ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाऊस पाणी
पाऊस थांबता थांबेना…
उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्व मोसमी पावसाने उसंत न घेतल्याने उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहेच पण त्याचबरोबर पाऊस थांबल्याशिवाय खरिपाची तयारी करता येत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
गेले आठ दिवस तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्गाला खरिपाची पेरणीपूर्व तयारी करता आलेली नाही. तर उन्हाळी पिके घेतलेल्या शेतकरी वर्गाला पावसामुळे मोठा फटका बसला आहे. पिके कुजून जात आहेत.
उन्हाळी पिके वाया जात आहेत तर खरिपाची तयारी करता येत नाही अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी वर्ग अडकला आहे.
फोटो क्लिक



