मंगळवार दि.२७ मे २०२५

तहसील समोर आंदोलन होणारच…
बहुजन मुक्ती पार्टीचा वन्य प्राण्यांच्या संदर्भात इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वन्य प्राणी प्रश्नांसाठी तहसील कार्यालयासमोर आदोलनाचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या कार्यालयात वनाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक झाली. मागण्यांची पुर्तता झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही शुक्रवारी आंदोलन केले जाईल असा इशारा या वेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
डॉ .उल्हास त्रिरत्ने म्हणाले, वन्यप्राण्याकडून हल्ल्यातील मृत व जखमींना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. वनतळी तसेच जंगलातील प्राण्याचे खाद्य याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी. वन्यप्राणी जंगलातून शेतात व गावात येवू नयेत यासाठी प्रयत्न करावेत. नुकसान भरपाईची प्रकिया किचकट आहे ती सुलभ करावी याबाबत तातडीने कार्यवाही करावी वनविभागाचे वनपाल बी. आर. निकम व वनपाल श्री. मुजावर यांनी याबाबत वरीष्ठांशी चर्चा करून सांगणार असल्याचे सांगीतले. डॉ .त्रिरत्ने यांनी उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना चर्चसाठी बोलवावे असा आग्रह धरला. मागण्यांची पुर्ततेसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
डॉ .सुदाम हरेर, राहुल मोरे, दत्त्तराज पाटील, रोहीदास दारुडकर यानी चर्चेत भाग घेतला. सुरेश दिवेकर, इर्शाद भडगावकर, सुर्यकांत कांबळे, अल्फीकार शेख यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

भुईमूग भुईसपाट…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील दहा हेक्टरवरील उन्हाळी भुईमुगाचे पिक पावसामुळे वाया गेल आहे. शेतजमिनीमध्येच भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे सात लाखापर्यंत नुक्सान झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
चित्री, सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकरी उन्हाळी पिके घेत आहेत. तालुक्यात आजरा, सोहाळे, हाजगोळी, हाजगोळी बुद्रक, भादवण, कोवाडे, पेरणोली, कोरीवडे, हरपवडे, मडिलगे, दाभिल, वेळवडी, सोहाळे यासह नदीकाठावरील विविध गावात शेतक-यांनी उन्हाळी भुईमुगाचे पिक घेतले आहे. तालुक्यात यंदा ४५ हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाचे पिकाची लागवड झाली. काही शेतकऱ्यानी हवामानाचा अंदाज घेवून पंधरा दिवसापूर्वी पिकाची काढणी केली ते नुकसानीपासून वाचले. पण ज्यांनी काढणी केली नाही त्यांना फटका बसला आहे. पावसामुळे वावरात पाणी साचल्यामुळे भुईमुगाच्या शेंगा उगवल्या आहेत. पाण्यामुळे शेंगा कुजून जाणार आहेत.

निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी रामतीर्थ परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने आजरा तालुक्याच्या पश्चिम भागासह आंबोली परिसरात ओढे, नद्या, नाले तुडुंब वरून वाहू लागले आहेत . हिरण्यकेशी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे खुले करण्यात आल्याने रामतीर्थ धबधबा पुन्हा एक वेळ पूर्ण क्षमतेने गर्जू लागला आहे. यामुळे रामतीर्थ धबधबा व रामतीर्थ परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत.
पोलीस बंदोबस्त हवाच…
काही अतिउत्साही पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालून रामतीर्थ धबधबा परिसरात सेल्फी काढणे, रील्स बनवणे असे प्रकार अवलंबत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या विचारात घेता या परिसरात पोलीस बंदोबस्ताची गरज अधोरेखित होत आहे.

शृंगारवाडी फाटा ते आजरा मार्ग ठरतोय धोकादायक
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शृंगारवाडी ते आजरा या रस्त्यावर खड्डे पडले असून यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झाली असून वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरती खड्डे असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडून गेल्या दोन महिन्यापूर्वी मातीचा मुरूम टाकून मलम पट्टी लावण्याचा प्रकार केला आहे . सध्या गेले महिनाभर पाऊस पडत असून खड्ड्यांमधून पाणी साचले आहे यामुळे वाहने चालवताना रस्त्याचा अंदाज येत नसून वाहनांचे दुचाकी व चार चाकी वाहनांचे अपघात होत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे दुचाकी चालकांना वाहने हाकताना खूप त्रास सहन करावा लागत आहे तर काहींचे या ठिकाणी अपघातही घडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवालही वाहन चालक करू लागले आहेत.

शहरात बिन पाण्याची स्वच्छतागृहे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे ठिकठिकाणी उभा करण्यात आली आहेत. शासनाचे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या स्वच्छतागृहांपैकी कांही स्वच्छतागृहे चुकीच्या ठिकाणी उभा केल्यामुळे तर कांही स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे वापराअभावी पडून आहेत.
स्वच्छतागृहांची देखभाल होत नसेल तर ही स्वच्छतागृहे उभा कशासाठी केली ? असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी आजरा महाविद्यालयात विद्यार्थी मदत केंद्र

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चालू वर्षीची इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु असून यासंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणेस मदत होण्यासाठी आजरा महाविद्यालय आजरा येथे मदत केंद्र स्थापन केले आहे तर व्होकेशनल विभागाचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे यांनी दिली.
आजरा तालुक्यातील एकही विद्यार्थी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे व विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार कॉलेज व शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयामार्फत मुलांना फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत गोंधळून जाऊ नये . प्रत्येक विद्यार्थ्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात मदत केंद्र स्थापन केला आहे. प्रत्येक शाखेनुसार संबंधित शिक्षकांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही अडचण असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे यांनी केले आहे.
फोटो क्लिक

हेडलाईन्स….
♦ संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट.
♦ गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांचे नाव निश्चित.
♦ आयपीएल मध्ये पंजाब कडून मुंबई इंडियन्स पराभूत.
पाऊस पाणी
आजरा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवार अखेर चित्री प्रकल्पात ३१.५५ % इतका पाणीसाठा झाला आहे.


