
जाहीर प्रचार थंडावला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये जाहीर प्रचाराची सांगता करण्यात आली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीसह इंडिया महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांची खरेदी काढून रॅली द्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
दोन्हीही आघाड्यांचे प्रमुख मतदारांना आपल्याच आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत होते.

उन्हाचा तडाखा असल्याने मतदारांकडून मात्र या रल्यांना अल्प प्रतिसाद मिळाला.
महायुतीच्या रॅलीमध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी, तालुका अध्यक्ष आणि अनिरुद्ध केसरकर, विलास नाईक,जनार्दन टोपले, आनंदा कुंभार,विजयकुमार पाटील उमेश पारपोलकर, बापू टोपले, डॉ. दीपक सातोसकर ,अनिल पाटील, विजय थोरवत यांच्यासह महायुती समर्थक मंडळी सहभागी झाली होती.
इंडिया ,महाविकास आघाडीच्या रॅलीमध्ये नौशाद बुड्ढेखान, संजयभाऊ सावंत, प्रभाकर कोरवी, संभाजी पाटील, मुकुंदराव देसाई आदी मंडळी दिसत होती.
दाभिल येथे अंतीम टप्प्यात प्रचाराचा धडाका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्व श्रमिक संघटना यांच्या वतीने, गिरणीकामगार संघटना अध्यक्ष काॅ. शांताराम पाटील याच्या नेतृत्वाखाली, शाहू महाराज छत्रपती याच्या प्रचारासाठी, काॅग्रेस पक्षाचे चिन्ह, हात व भुमिका सर्व सामान्य जनतेला समजणे आवश्यक आहे .यासाठी गिरणीकामगार संघटनेने तालूका पिंजून काढला असून अंतिम टप्प्यात दाभिल येथे घरोघरी पत्रके वाटण्यात आली.
यावेळी ज्ञानदेव गुरव ,रघुनाथ पाटील, संदीप कांबळे ,शंकर कदम, पांडूरंग पाटील, महादेव पाटील ,ज्ञानदेव येसणे, जय गुरव, मुरलीधर जाधव, अमर कांबळे, शशिकांत कांबळे, चिमाजी कांबळे याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजरा शहरात आंब्याची आवक वाढली…
दरही गडगडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये गेल्या चार दिवसात आंब्याची आवक प्रचंड वाढली असून रत्नागिरी हापूस सह स्थानिक आंबा बाजारपेठेत दिसू लागला आहे. अचानकपणे आंब्याची आवक वाढल्याने आंब्याचे प्रति डझन दर दोनशे रुपये ते चारशे रुपयांच्या आसपास दिसत आहेत.
यावर्षी उष्णता वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आंबा पिकण्यावर होत असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये लवकर व भरपूर आंबा उपलब्ध होत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
फसवणूक टाळण्यासाठी…
आंबा खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी खात्रीशीर व नेहमीच्या विक्रेत्याकडूनच आंबा खरेदी करावा. अनेक ठिकाणी गारा लागलेले आंबे ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचे दिसते. त्यामुळे वरून आकर्षक दिसणारा आंबा आतून बाद असण्याची शक्यता असल्याने व तसा अनुभव येत असल्याने ग्राहकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

यात्रांसह विवाह समारंभांचा हंगाम आटोपला…
प्रमुख गावांमधील यात्रा समारंभ उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील कोवाडे ,पेद्रेवाडी, दाभेवाडीसह सुळे या प्रमुख गावच्या लक्ष्मी यात्रा उत्साहात पार पडल्या. यात्रांबरोबरच ठीक ठिकाणचे विवाह सोहळेही पार पडले असून सुदैवाने या कालावधीत पावसाने ग्रामस्थांना चांगली साथ देण्याचे दिसते.
कोवाडे पंचक्रोशीतील यात्रांमुळे मुंबईकर व बाहेरगावचा चाकरमानी मोठ्या प्रमाणावर तालुक्यात आला आहे. विशेषता पेद्रेवाडी गावची यात्रा ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली होती. प्रशासनाच्या योग्य भूमिकेमुळे या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
गेल्या आठवड्यात तालुक्यात शंभरभर विवाह सोहळे पार पडले आहेत. यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीतच हे विवाह सोहळे पार पडले.


