

सभासदांच्या व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर जनता बँकेची वाटचाल : अध्यक्ष मुकुंद देसाई
बँकेची 60 वी वार्षिक सभा उत्साहात

जनता सहकारी बँक आजरा ही सर्वसामान्य सभासद ठेवीदार, कर्जदार, हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे. बँकेने तंत्रज्ञान वापरामध्ये विक्रम केला असून ग्राहकांना युपीआय सेवा सुरू करून दिली असल्याची माहिती चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली. बँकेच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
युपीआय सेवा देणारी जनता बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील पाचवी आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली बँक आहे. बँकेला गेल्या दहा वर्षात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विविध संस्था आणि शासनाचे पुरस्कार प्राप्त झाल्याचे चेअरमन देसाई यांनी सांगितले. तालुक्यातील काजू व्यवसाय बळकट करण्यात बँकेने योगदान दिले आहे. शिवाय आण्णासाहेब पाटील महामंडळ, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना बँकेकडून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अहवाल सालात बँकेला १ कोटी ५१ लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेकडे २७७ कोटी ९५ लाख्यांच्या ठेवी असून १८० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेने १२२ कोटी ९० लाखांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. रीझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या बालिंगा, सिध्दनेर्ली व उत्तूर या तीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्हा हे कार्यक्षेत्र होते. मात्र आता बँकेला शासनाने मुंबई तसेच उपनगरे, ठाणे जिल्हा, पुणे व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर केले असून लवकरच मुंबई येथे शाखा सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे देसाई यांनी सांगितले.
नोटीस वाचन तसेच अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी केले. यावेळी सभासद तानाजी देसाई, संभाजी इंजल, निवृत्ती कांबळे वसंतराव देसाई, मधुकर गुरव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, असिस्टंट जनरल मॅनेजर मिनीन फर्नाडिस यांनी उत्तरे दिली. यानंतर विविध परिक्षेत यश संपादन केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच बँकांच्या शाखांमधून अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अनुक्रमे हुपरी, आजरा व महागांव या शाखांचाही गौरव करण्यात आला.

या सभेला व्हा. चेअरमन बाबाजी नाईक, संचालक जयवंतराव शिंपी, महादेव टोपले, रणजित देसाई, विजय देसाई, जोतीबा चाळके, सहदेव नेवगे, महादेव पोवार,सौ. वृषाली कोंडूसकर, संदीप कांबळ सुनील डोणकर, के. जी. पटेकर, व्यवस्थापन मंडळ सदस्य लक्ष्मण पाटील, डॉ. राजलक्ष्मी देसाई यांच्यासह माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, राजू होलम, सुभाष देसाई, मधुकर येलगार, शिवाजी पाटील, पांडूरंग पाटील, गणपतराव पाटील, के. व्ही. येसणे,एस.डी. चव्हाण,विठ्ठल देसाई, अनिल फडके,तुळसाप्पा पोवार, मुकुंद तानवडे,सुरेश देसाई,निवृत्ती कांबळे, यांच्यासह समासद उपस्थित होते. संचालिका रेखा देसाई यांनी आभार मानले.
होनेवाडी च्या सरपंच प्रियांका आजगेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर
होनेवाडी (ता. आजरा) च्या सरपंच सौ. प्रियांका चंद्रकांत आजगेकर यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतचे लेखी पत्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार व संस्थापक बाबासाहेब पावसे – पाटील यांनी नुकतेच त्यांना दिले आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता असून महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.सरपंच आजगेकर यांच्या या आदर्श सरपंच निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

आज-यात पावसाची साथ…बाप्पांंना निरोप दणक्यात

गेल्या दोन-तीन वर्षातील उत्साहाची उणीव भरून काढत आजऱ्यात यावर्षी तालुक्यात बाप्पांना भावपूर्ण वातावरणात व उत्साहात निरोप देण्यात आला. वैशिष्ट्य म्हणजे दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही व्यत्यय आणला नाही.लेझीम,ढोल-ताशे,पारंपारीक वाद्ये,विद्युत रोषणाई अशा पार्श्वभूमीवर निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत तालुकावासिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे प्रथम गणेश मूर्ती विसर्जनाचा मान येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाले.
शिवसेनेच्या जय शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या संगीत व बहारदार नृत्याच्या मेजवानीला तरुणाईसह बालगोपाळांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूकी करता नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाई संगीताच्या ठेक्यावर नाचणा-या नृत्यांगना व जय भवानी… जय शिवाजी… चा जयघोष अशा वातावरणात गणेश भक्तांनी या मिरवणुकीला प्रचंड प्रतिसाद दिला.

येथील सुभाष चौक गणेशोत्सव मंडळाने हाजगोळी येथील आणलेले महिलांचे लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाने आणलेले वक्रतुंड ढोल ताशा मंडळाने , ढोल-ताशाच्या आकर्षक पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तर भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाने शंभुनाथ गर्जना व हलगी वादन कार्यक्रमाचे सादरीकरण मिरवणुकीचे केले या मिरवणुकीला महिलांचा प्रतिसाद मोठा लाभल्याचे दिसत होते.

गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष पथक, अधिकारी व गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तालुक्यात ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्त्यांचे उत्साहात विसर्जन करण्यात आले.

संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित, लंपी स्कीनला रोखण्यासाठी शासनाचे पाऊल

जनावरांमधील लंपी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगाबाबतीत संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.
शासनाने ८ सप्टेंबरला याविषयीची अधिसूचना जारी केली आहे. लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यामध्ये ८ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोवर्गीय प्रजातींमधील २९ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे. गुरे व म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगना व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आधीच पसरला आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोग हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे.
राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना व संघराज्य क्षेत्रांना सूचना दिलेली आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित केल्याने, लंपी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निमूर्लन करता येणार आहे.
गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे.
गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.
नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जनावरांच्या जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. पशुपालकांनी अधिसूचनेचे पालन करावे व पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.(source:online news network)


ऋषिकेश – बद्रीनाथ मार्गावर मुंबईच्या भाविकांवर काळाची झडप,
कार दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू
ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर ब्रह्मपुरी जवळ काळाने झडप घातली आणि कार अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हे भाविक दहिसर, कोळीवाडा, वसई, पालघर आणि ठाण्याचे रहिवाशी होते आणि बद्रीनाथ दर्शनासाठी निघाले असताना कारचा अपघात होऊन कार दरीत कोसळली. कार मध्ये 5 प्रवाशी होते.
ब्रह्मपुरी जवळ कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर एकाच उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी बाबर बुधकर, पुरुषोत्तम दत्तात्रेय खिलकूटी, जितेंद्र प्रकाश लोखंडे आणि धर्मराज नारायण असे मृतांची नावे आहेत. तर रवींद्र महादेव चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.







