


पाऊस थांबता थांबेना…
आजऱ्यातील परिस्थिती
ऐन गणेशोत्सव कालावधीत आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी धुवांधार पाऊस सुरूच असल्याने गणेशोत्सवावर मर्यादा येताना दिसताहेत. शुक्रवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणूकीकरता स्थानिक मंडळांनी विविध कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले आहे परंतु गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पावसाची सातत्याने हजेरी लागत असलयाने गणेश विसर्जन मिरवणूक कार्यक्रमावरही मर्यादा येताना दिसत आहेत.
सलग दोन वर्षे कोरोनामुळे गणेश उत्सव दणक्यात साजरा करण्यावर करण्यामध्ये अडचणी आल्या होत्या. यंदा मात्र कोरोनाचे संकट थोडेफार दूर असल्याने स्थानिक गणेशोत्सव मंडळांनी भक्त मंडळींचे आकर्षण असणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले आहे परंतु पावसामुळे यंदा विसर्जन मिरवणूकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


‘व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार

आजरा येथील ‘व्यंकटराव” हायस्कूलच्या शिक्षिका सौ. भारती प्रेमानंद कांबळे यांना कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेकडून आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे .
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सदर पुरस्कार सौ. कांबळे यांना जाहीर झाला आहे.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर्, गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख महेश लेखनावर, माजी खासदार अमरसिंह पाटील यांनी सदर पुरस्काराकरिता सौ कांबळे यांची निवड केली आहे.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात

मंगळवार दि 6 सप्टेंबर रोजी आजरा महाविद्यालय आजरा येथे झिम्मा फुगडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला
संस्कृतीचा वारसा जपावा, समाजात संघटीतपणा निर्माण व्हावा या हेतूने महाविदयालयात पारंपारीक नृत्य व झिम्मा- फुगडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन युवतींनी अनेक प्रकारच्या झिम्मा फुगड्याबरोबरच पारंपारीक गाण्यांचा आनंद लुटला. कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकआष्णा चराटी, सचिव रमेशआण्णा कुरुणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादले, अधिक्षक योगेश पाटील, व्होकेशनल विभागप्रमुख एम. एच. देसाई ,ज्युनिअर मराठी विभागप्रमुख प्रा. विनायक चव्हाण याची होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा धामणेकर व कु. निकिता कांबळे यांनी केले. आभार श्रीमती वैशाली देसाई यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद, प्राध्यापिका, प्रशासकिय बांधव उपस्थित होते.


वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी !
कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

नवी दिल्ली – करोना महामारीच्या कालावधीमध्ये भारतातील सर्वसामान्य नागरिकांची आरोग्यविषयक आणि औषधविषयक जागरूकता वाढली असली तरी याची दुसरी बाजू ही आता लक्षात आली आहे भारतातील बहुतांश नागरिक कोणताही विचार न करता औषधांचा वापर करत आहेत एका वर्षभरात तब्बल 500 कोटी रुपयांची अँटिबायोटिक औषधे भारतीयांनी खरेदी केली आहेत लासेन्ट या आघाडीच्या आरोग्यविषयक नियतकालिकाने आपल्य रिजनल साऊथ इस्ट एशिया या नियतकालिकात एका अहवालात माहिती देण्यात आली आहे.
ज्या काळात भारतात महामारी अत्युच्च स्थानावर होती त्या 2019 मध्ये भारतीयांनी एका वर्षात तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या अँटिबायोटिक गोळ्या वापरल्या यापैकी अनेक गोळ्यांना अन्न व औषध प्रशासनाची मान्यताही नसल्याचे समोर आले आहे हे संशोधन करताना लँसेंट ने भारतातील प्रायव्हेट विक्रेते आणि दुकानदार यांची माहिती संकलित केली.
देशातील एकूण 9000 औषध दुकानांनी केलेल्या विक्रीच्या माहितीचा आढावा घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रकाशित केलेल्या अहवालाप्रमाणे भारतीय नागरिक कोणताही विचार न करता अँटिबायोटिक औषधांचा वापर करत आहेत या औषधांचा आपल्या शरीरावर कोणता विपरीत परिणाम होईल याबाबत कोणतीही माहिती त्यांना नाही किंवा ही माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
एखाद्या जिवाणूचा मुकाबला करण्यासाठी किंवा त्या जीवाणूंमुळे झालेल्या आजारावर मात करण्यासाठी अँटिबायोटिक औषधे वापरली जातात खरेतर रुग्णाचा प्राण संकटात असेल तरच अँटिबायोटिक औषधांचा मारा करून त्याला बरे करण्याचा विचार केला जाऊ शकतो पण हजारो भारतीय नागरिक जलद बरे होण्याच्या उद्देशाने कोणताही विचार न करता त्यांची अशाऔषधांचा वापर करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. (source:online news network)







