mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

झक मारला तुमचा हायवे…


          ✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत…

       गेले वर्षभर सुरू असलेल्या संकेश्वर-बांदा या महामार्गाच्या कामाला आता आजरा तालुकावासीय जनता कंटाळली असून होणारा धुळीचा त्रास, छोटे-मोठे होणारे अपघात, पाणीपुरवठा योजनेला लागलेली गळती, वारंवार विजेचा खंडित होणारा पुरवठा यामुळे शहरवासीयांसह या मार्गावर असणाऱ्या गावातील ग्रामस्थ आता कंटाळले असून ‘ झक मारला तुमचा हायवे’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

     गेले वर्षभर या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाच्या निमित्ताने गडहिंग्लज ते आंबोली मार्गावरील पारंपारिक वृक्षांची प्रचंड तोड झाली आहे. त्यामुळे निसर्गरम्य आजरा ही बिरूदावली आता संपुष्टात येऊ लागली आहे. संपूर्ण खुदाईमुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा झाले असून मुळातच एक दिवस आड येणारे पाणीही आता दुर्मिळ होत चालले आहे. केलेल्या खुदाईमध्ये मोबाईलचे केबल उसपून टाकण्यात आल्याने मोबाईलची रेंज गायब होणे, कॉल ड्रॉप होणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत.यामुळे आर्थिक संस्थांसह शासकीय कार्यालयातील व्यवहार वेळोवेळी ठप्प होताना दिसत आहेत.

     नव्याने विद्युत खांब टाकण्याचे काम सुरू असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून याचा अप्रत्यक्ष परिणामही शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकावर होऊ लागला आहे. सर्वत्र धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले असल्यामुळे याचा शहरवासीयांना प्रचंड त्रास सुरू असून दोन दोन महिने खोकल्यावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. या महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय जवळ जवळ बंद अवस्थेत आहेत.

    नुकसान भरपाईसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी व महामार्ग बाधित नागरिकांचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या मार्गावर छोटे-मोठे अपघात वारंवार होऊ लागले आहेत. ठिकठिकाणी कामामुळे एसटी महामंडळाचे वेळापत्रकही कोलमडू लागले आहे.

     एकंदर परिस्थिती पाहता झक मारला तुमचा हायवे… असे म्हणण्याची वेळ आता आजरा तालुकावासियांवर आली आहे हे निश्चित…

साखर कारखाना गळीतावर परिणाम

      महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा फटका साखर कारखान्याच्या गळीतासही बसू लागला आहे. रस्ता खराब झाल्याने ट्रॅक्टर व छकडा गाड्यातून कमी क्षमतेने उसाची वाहतूक होत आहे. खड्डे व खडीमुळे ठिकठिकाणी ट्रॅक्टर बंद पडणे ते पलटी होणे असे प्रकार ही घडू लागले आहेत.


डॉ.जे.पी. नाईक पतसंस्थेच्यावतीने व्याख्यान


                    आजरा: प्रतिनिधी

        येथील शिक्षणतपस्वी डॉ. जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आत्माराम पाटील यांचे “हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी आत्माराम पाटील यांनी आपल्या सहज सोप्या शब्दांतील निखळ विनोदाने सर्वच लहानथोर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन खळखळून हसवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे म्हणाले, “सध्या आजूबाजूला इतका ताणतणाव भरलेला आहे की, त्यामध्ये माणूस हास्यच विसरुन गेला आहे. जगताना मनाबरोबर शरीरालाही हसणे आवश्यक आहे. आणि ते काम आत्माराम पाटील उत्तमरित्या पार पाडत आहेत.” यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाच्या आणि पाडवा गोड झाला या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

        आजरा हायस्कूल व पंडीत दीनदयाळ हायस्कूल या हास्कूलमधील विदयार्थ्यांचा सहभाग मोठया प्रमाणात होता. यावेळी उपाध्यक्ष सुभाष विभुते, रवींद्र देसाई, शिवाजी बिद्रे, भारती सुर्यवंशी, मनोज गुंजाटी, शिवाजी कांबळे, श्रावण जाधव, दयानंद उपासे, प्रकाश ओतारी, भगवान पवार, शामल हरेर, मंजिरी यमगेकर, बळवंत शिंत्रे, उपस्थित होते. तर जनरल मॅनेजर संतोष जाधव, संजय तेजम, निकिता स्वामी, प्रताप होलम, तुषार येरुडकर, उत्तम कुंभार व सुभाष पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


आदित्य शेलार कडून ट्रेकिंग कॅम्प यशस्वी

                     आजरा:प्रतिनिधी

      आजरा हायस्कूल, आजरा चा विद्यार्थी आदित्य शेलार याने एन.सी.सी. अंतर्गत ऑल इंडिया केरळ ट्रेकिंग कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला या कॅम्पमध्ये चार राज्यातून पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.आदित्यने ४५ किलोमीटर चालणे, मोठे डोंगर चढण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन कॅम्प पूर्ण केल्याबद्दल त्याला प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.

      त्याला ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर पुतिन गोगिया व एन.सी.सी. विभाग प्रमुख ए.एल. तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.


 लेकिंनी केले सावित्रीआईला अभिवादन

                    आजरा:प्रतिनिधी

आजरा येथे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून सावित्रीबाईंच्या स्मृतींचा जागर करण्यात आला.

       यावेळी गंगामाई वाचन मंदिराच्या संचालिका सौ. गीताताई पोतदार यांच्यासह वाचून मंदिराचे ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुस्कर व स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


आजरा व परिसरात पावसाची हजेरी


                      आजरा:प्रतिनिधी

गेले दोन दिवस आजरा तालुक्यात पावसाचे वातावरण तयार झाले असून काल गुरुवारी सकाळी आजरा परिसरात पावसाच्या अल्प प्रमाणात हजेरी लावली. एकीकडे थंडी व दुसरीकडे ढगाळ वातावरण, धुके असे विचित्र हवामान सध्या आजरेकर अनुभवत आहेत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्याजवळ चित्री नदीपात्रात महीलेचा मृतदेह आढळला… ‘उत्तर’ च्या लढतीकडे आजरातालुकावासियांचे लक्ष लागून….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!