



आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा..
बैलांसह तिघे झाले जखमी
पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

शर्यतीत मित्राची बैलगाडी पुढे जात असल्याचा राग मनामध्ये ठेवून झालेल्या शिवीगाळीचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये ओंकार पांडुरंग खवरे, रविराज प्रकाश देसाई, विशाल श्रीकांत कदम (सर्व रा.सुलगाव, ता.आजरा) या तिघांसह बैलाला मारहाण केल्याने यात सर्व जण जखमी झाले असून या प्रकरणी आजरा पोलिसांनी मजिद दरवाजकर, आयाज दरवाजकर यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी आजरा-महागाव मार्गावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी पार पडलेल्या या शर्यती वेळी स्पर्धकांमध्ये प्रचंड चढाओढ सुरू होती. ज्यावेळी मजीद दरवाजकर, आयाज दरवाजकर व त्यांचे अन्य तीन साथीदार आपल्या गाडीचा शर्यतीमध्ये पहिला नंबर यावा म्हणून इतर स्पर्धकांशी प्रचंड चढाओढ करत होते. याच वेळी ओंकार पांडुरंग खवरे यांची बैलगाडी पुढे असल्याने ती नंबरात येण्याच्या शक्यतेचा राग मनामध्ये धरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर काट्यांसह दगडानी झालेल्या मारहाणीत ओंकार खवरे, रविराज देसाई व विशाल कदम यांच्यासह त्यांच्या मालकीचा पाळीव बैलही जखमी झाला.
मेंढोली गावानजीकच्या कमानीजवळ झालेल्या या प्रकारा मुळे शर्यती वेळी गोंधळ उडाला. खवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरवाजकर यांच्यासह अन्य तिघाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास आजरा पोलिस करत आहेत.
….







