
आजरा येथे घरफोडी… पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

आजरा:प्रतिनिधी
आजरा येथे लाडजी कॉलनीमधील साबीया इजाज खान याच्या राहत्या घराचे कुलूप फोडून घरातील दाग-दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लाडजी कॉलनी येथील घरामध्ये खान कुटुंबीय राहतात. नाताळच्या सुट्टीनिमित्त विजापूर येथे आपल्या पाहुण्यांकडे सदर कुटुंबीय २२ डिसेंबर रोजी गेले होते. त्यानंतर ते काल बुधवारी घरी परतले.घरी आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून आतील तिजोरी कटवणीच्या सहाय्याने तोडून त्यातील सोन्याचे दागिने, व्हाईट गोल्डचे दागिने व रोख रक्कम रुपये ८० हजार असा सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी आजरा पोलिसात वर्दी देण्याचे काम सुरू असून आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, गडहिंग्लजचे विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले हे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत आहेत.
लाडजी कॉलनी मध्ये एका बाजूला असणाऱ्या या घरामध्ये इतरही भाडेकरू कुटुंबीय असताना सदर प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.



