


कुटुंब उध्वस्त…

आजरा:प्रतिनिधी
आजरा आंबोली मार्गावर काल दत्तात्रय गोवेकर या हाळोली येथील ४३ वर्षिय दुचाकीस्वाराची चारचाकी गाडीला धडक होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय यांच्या मृत्यूने त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
व्यवसायाने गवंडी काम करणाऱ्या दत्तात्रय यांच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. हा पहिला धक्का गोवेकर कुटुंबीयांना बसला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन महिन्यापूर्वी पुनर्विवाह केला होता. दत्तात्रय यांचे कुटुंबीय सावरत असतानाच अल्पावधीतच त्यांना अपघातासारख्या घटनेला सामोरे जाऊन मृत्युला कवटाळावे लागल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली आहेत.
संकेश्वर – बांदा महामार्गाचे सुरू असलेले काम अनेकांच्या जीवावर बेतत आहे. किमान रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभे करून अपघात रोखण्याचे आवाहन आता महामार्ग प्रशासनासमोर आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून यापूर्वीही अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना दवाखान्यांची वाट धरावी लागली आहे.



रामतीर्थ रस्त्याचे काम वनविभागाने अडवले… विनापरवाना काम करत असल्याचा दावा

आजरा: प्रतिनिधी
रामतीर्थ तिठ्ठयापासून ते पुढे श्री राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुरू असलेल्या कामामध्ये वनविभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याची परवानगी न घेतल्याच्या कारणास्तव वनविभागाने सदर काम बंद पाडले. याबाबत पोलिसात संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार देण्याच्या हालचाली वनविभागाकडून सुरू होत्या.
याप्रकरणी परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली माहिती अशी की, या मार्गाचे पॅचवर्क केले जाणार असे सुरुवातीला सांगितले गेले. त्यामुळे वन खात्याने हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. वास्तविक डांबरीकरणापूर्वी वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात वनविभागाला कल्पना देऊन रितसर परवानगी घेणे आवश्यक होते. असा कोणताही प्रकार संबंधित ठेकेदाराकडून घडला नाही.

याच मुद्द्यावरून सदर काम बंद करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहेत.जोपर्यंत रीतसर परवानगी घेतली जात नाही तोपर्यंत हे काम करू दिली जाणार नाही असेही परिक्षेत्र वन अधिकारी डाके यांनी सांगितले.


आजरा कारखान्याची १५ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा

आजरा:प्रतिनिधी
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि.१ डिसेंबर ते १५ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्र.मे.टन रू.३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठा शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावरती जमा करण्यात आली आहे तसेच तोडणी वाहतुकीची रोखीने निघणारी बिले बैंक खाती वर्ग केले असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.
हंगाम २०२३-२४ मध्ये करखान्याने ३.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपूर्ण ऊसाची बिले रू.३१००/- प्र.मे.टन प्रमाणे विनाकपात एकरकमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमितपणे आदा केली जाणार आहेत.
कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन नवनिर्वाचीत व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. कांही क्षेत्रामध्ये जंगली जनावरांचा त्रास होत आहे अशा ठिकाणी यंत्रणा देवून सदर ठिकाणचा ऊस काढणेचे नियोजन देखील कारखान्या मार्फत केले जात आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेल्या ऊसाची माहिती घेवून तो वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. मधुकर देसाई, संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, श्री. मुकुंदराव देसाई, श्री.मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री.अनिल फडके, श्री.दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री.संभाजी पाटील (हात्तीवडेकर), श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरूकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री.गोविंद पाटील, श्री.अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, तसेच कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री.व्ही.के.ज्योती व अधिकारी उपस्थित होते.



अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाचे निंगुडगे येथे स्वागत.

आजरा:प्रतिनिधी
अयोध्या येथून आलेल्या श्री राम अक्षता कलशाचे निंगुडगे गावामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी अक्षता कलशाची भव्य अशी संपूर्ण गावातून शोभा यात्रा काढणेत आली. यामध्ये शिवप्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते, विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळ, शाळकरी मुले व मुली , महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


भोवताल…
भरधाव जीप झाडाला ठोकरुन एकाचा मृत्यू

आजरा:प्रतिनिधी
लातूरहुन गोव्याच्या दिशेने पर्यटनासाठी जाणाऱ्या थार जीप गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्या शेजारील झाडाला जोराने आदळून झालेल्या अपघातात धाराशिव येथील दत्तात्रय व्यंकट जाधव ( वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर महादेव बांगर (३९), गणेश साळुंखे (२२) बालाजी बांगर (४०), सुनील भैया (३१) नवनाथ जाधव (३९) विष्णू बागर आदी गंभीर जखमी झाले. काल बुधवारी दुपारी आंबोली नांगरतासवाडी येथे सदर अपघात झाला.


निधन वार्ता…
गणपतराव देसाई

आजरा कारखान्याचे संचालक सुभाष देसाई यांचे वडील व सिरसंगी येथील रहिवासी गणपतराव गोविंद देसाई वय ८७ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दि ४ रोजी सकाळी ८.३० वा.अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

.

