रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५

भविष्यात अल्बर्ट डिसोझा यांना चांगली संधी देऊ : माजी आम. राजेश पाटील
डिसोझा यांचा वाढदिवस उत्साहात

अल्पसंख्यांक समाजातून आलेले व बहुजन समाजाने स्वीकारलेले नेतृत्व म्हणजे सन्मित्र संस्था समूहाचे संस्थापक अल्बर्ट डिसोझा हे आहेत. स्वर्गीय बळीरामदादा देसाई, राजारामबापू देसाई, काशिनाथण्णा चराटी माधवराव देशपांडे, मुकुंदराव आपटे यांच्यासह ज्येष्ठ नेते मंडळींसोबत त्यांनी काम केले असून यापुढे स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल तर त्यांना योग्य त्या ठिकाणी संधी देऊ असा विश्वास आजरा चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त दिला. डिसोझा यांच्या ६९ व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घघाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना मा.आमदार राजेश पाटील म्हणाले की, वाढदिवस केवळ औपचारिकता न ठेवता समाजासाठी उपयुक्त अशा कार्याला जोडला गेला पाहिजे. अल्बर्ट डिसोझा यांनी घेतलेला पुढाकार हा समाजासाठी प्रेरणादायी आहे.श्री. अल्बर्ट डिसोझा हे गेली अनेक वर्षे समाजकार्यात सक्रिय असून गरीब, निराधार आणि वंचित घटकांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
यावेळी आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिवाजी नांदवडेकर, रजिना फर्नांडिस यांनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास आजरा तालुक्यातील विविध समाजघटकांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ,रक्तदाते उपस्थित होते. अनिल फडके,संभाजी पाटील, रजिना फर्नांडिस,सुभाष देसाई,एम. के. देसाई, मधुकर एलगार, शिवाजी नांदवडेकर,राजू होलम,राजू मुरकटे,एस.एल. पाटील, संजय पोवार, गुंडू सुतार, भीमराव वांद्रे, विलास कसलकर, जनार्दन बामणे, शंकर सुतार, श्रीकांत हातकर, शिवाजी पोवार, एकनाथ सुतार, बाळू कसलकर, भीमराव सुतार, बाळकृष्ण गिलबिले, प्रभाकर सोनार, सुनिता सोनार , डिसोझा यांचे कुटुंबीय, सन्मित्र संस्था परिवारातील पदाधिकारी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
अनिल देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अवयव दानासाठी जनजागृती करणार…
वाढदिवसाच्या निमित्ताने डिसोझा यांनी आपण स्वतः देहदान करणार असून यापुढे समाजामध्ये अवयव दानासाठी जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटात आजऱ्यात बापांना भावपूर्ण निरोप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह परिसरामध्ये बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटासह विविध धार्मिक, मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन मिरवणूकांदरम्यान करण्यात आले होते.
सालाबाद प्रमाणे प्रमाणात मंदिर आजरा येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने प्रथम मूर्ती विसर्जनाचा मान पटकावला.
शिवसेना प्रणित जय शिवराय तरुण मंडळाची मिरवणूक उपस्थितांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरली. हलगीच्या तालावर असणारा घोडा प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारा ठरला.
भाजी मंडई, सुभाष चौक गणेशोत्सव मंडळ यासह लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाने मिरवणूकीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
सुभाष चौक मंडळाने सादर केलेले मानवी देखावे उपस्थितांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरले तर लिंगायत गल्ली तरुण मंडळाने धनगरी नृत्य आणले होते.
मिरवणुकांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
पावसाने उघडीप दिल्याने मिरवणूक पाहण्याकरता अबाल वृद्धांनी गर्दी केली होती.
मिरवणूक कालावधीत पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दरम्यान तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
उत्तूर परिसरातही जल्लोष…

उत्तूर शहरासह पंचक्रोशीत गणेश विसर्जन मिरवणुका दणक्यात काढण्यात आल्या. बॅन्जो पारंपारिक वाद्यांच्या तालावर थिरकताना दिसत होती.
रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरूच होत्या.

उचंगी येथे हत्तीचा धुमाकूळ
चार चाकी फोडली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उचंगी तालुका आजरा येथे हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घालत चार चाकी फोडण्यासह शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
शुक्रवारी रात्री आलेल्या हत्तीने रवळनाथ देसाई यांची चारचाकी तुडवून व ढकलून लावून चार चाकीचे मोठे नुकसान केले आहे. याचबरोबर शेती पिकांचेही मोठे नुकसान केले आहे

मृत सभासदाच्या वारसास जिल्हा बँकेकडून मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे तालुका आजरा येथील मल्लिकार्जुन विकास संस्थेचे कर्जदार सभासद विष्णू महादेव जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये दोन लाखांचा निधी धनादेश स्वरूपात पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते समारंभ पूर्वक वारसांना प्रदान केला.
यावेळी बँकेचे अधिकारी सुनील दिवटे यांनी बँकेकडून राबवल्या जाणाऱ्या पीक कर्जांसह इतर कर्जे व विमा योजना संदर्भात माहिती दिली.
संचालक सुधीर देसाई यांनी बँकेकडे असणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. बँक अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कर्ज वाटपासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी बँकेचे अधिकारी विजय कुंभार,संदीप बोडके, सपना नारळकर, आजरा कारखाना संचालक राजू मुरकुटे, उपसरपंच चाळू केंगारे बाबुराव सावंत, विश्वास बुगडे ,चंद्रकांत बुगडे, हिराबाई इक्के, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, सुधीर पाटील ,किशोर जाधव, संजय घाटगे, मल्लिकार्जुन विकास सेवा संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सचिव अशोक शिंदे यांनी आभार मानले.

निधन वार्ता
संतोष घाटगे

किणे ता. आजरा येथील संतोष शिवाजी घाटगे केसरकर व ४० वर्षे यांची हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, आई वडील असा मोठा परिवार आहे.
शालन कालेकर
पेरणोली( ता. आजरा) येथील शालन अशोक कालेकर ,(वय ६४ वर्षे) यांचे काल शनिवारी निधन झाले.
त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार (ता. ८) पेरणी येथे सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम होईल.



