
सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी ४२ कोटी ९० लाख रुपये मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

आजरा तालुक्याच्या हरीतक्रांतीला वरदायी ठरणाऱ्या सर्फनाला प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी ४२ कोटी ९० लाखरुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या १५ ते २० वर्षापासून सर्फनाला प्रकल्पाचे काम निधी व पुनर्वसनाअभावी रखडलेले होता. याकरीता प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकरीता शासन स्तरावर वेळोवेळी बैठका व पाठपुरावा करून प्रकल्प ग्रस्तांचा विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्फनाला मध्यम प्रकल्पाकरीता भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ एस.आर.क्र.२/२०/२२ मौजे पारपोली, ता.आजरा येथील क्षेत्र २९२०२.९५ चौ.मी.उपविभागीय अधिकारी आजरा-भुदरगड यांचेकडे भूसंपादन करणेकामी प्रस्ताव चालू आहे. या प्रस्तावाकरीता भरपाई रक्कम मिळणे गरजेचे होते, त्याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सदर प्रस्तावाची निवाडयाची अंदाजीत रक्कम ४२ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
यामुळे सर्फनाला प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रमुख अडचण असणाऱ्या भुसंपादनाचा प्रश्न सुटणार असून सर्फनाला प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले आहे.
वस्त्रोद्योग महासंघाच्या संचालकपदी अशोकअण्णा

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित मुंबईच्या स्विकृत संचालक पदी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांची निवड झाली आहे.
अशोकअण्णा चराटी आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकारासह सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आजरा साखर कारखान्यास संस्थापक अध्यक्ष यांचे नाव द्या… स्वाभिमानीची अध्यक्षांकडे मागणी

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांनी अत्यंत अडचणीच्या व प्रतिकूल परिस्थितीमध्ये केली आहे. कारखाना उभारणीमुळे तालुक्यातील शेतकरी, कामगार,वाहतूकदार व इतर घटकांचा विकास होण्यासाठी मदत झाली आहे.त्यामुळे त्यांच्या निरंतर आठवणी राहावे म्हणून आजारा साखर कारखान्यास स्व.वसंतराव देसाई यांचे नाव द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सौ. भारती कांबळे यांना विशेष पुरस्कार

येथील आजरा महाल शिक्षण मंडळातील सहाय्यक शिक्षिका सौ. भारती प्रेमानंद कांबळे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
या संस्थेमार्फत दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवले जाते. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सदर पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे होणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली, महेश मेघनावर, जिल्हा पोलीस प्रमुख श्री.सी. गोपाल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘ विद्यावर्धिनी ‘ ची वार्षिक सभा उत्साहात

आजरा येथील विद्यावर्धिनी शासकीय निमशासकीय व शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बळवंत शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये सुरुवातीस पांडुरंग शिप्पूरकर यांनी श्रद्धांजली चा ठराव मांडला. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात संस्थापक अध्यक्ष बळवंत शिंत्रे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संचालक दिनकर देसाई यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले तर एकनाथ ढवण यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले.रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्याबाबत सभेमध्ये सर्वानुमते ठरले. सभेमध्ये शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा,एन. एम.एम. एस. मार्गदर्शक शिक्षक, विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा व सुरेखा नाईक कविता चौगुले यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सभेस संस्थेचे संस्थापक सुभाष विभुते, सुनील सुतार, सौ. अनुजा वाळके, तुकाराम काटवळ, विनायक पुंडपळ, सुनील चव्हाण, बाबुराव शिवणगेकर, शिवाजी नांदवडेकर, एकनाथ आजगेकर, शरद परूळेकर,विजय कांबळे,मनोजकुमार पाटील, सौ. भारती चव्हाण, नीलिमा पाटील, सुनील शिंदे, सदाशिव दिवेकर, एकनाथ गिलबिले, सुधाकर आजगेकर, श्रावण जाधव ,सुभाष नाईक व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ घ्या : दाजी दाईंगडे

प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य जपले पाहीजेत. त्याबाबत जागरुक राहीले पाहीजेत. केंद्र व राज्य शासन विविध योजना जाहीर करत असून त्याचा घ्यावा असे आवाहन आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये आयुष्यमान भव मोहीमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी श्री. दाईगडे यांच्या हस्ते झाला. या वेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.. सोनवणे यांनी स्वागत केले. ते प्रास्ताविकात ते म्हणाले, केंद्र व राज्य शासनाचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत
मोहीम राबविली जाणार आहे. आयुष्यमान आपल्या दारी, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान मोहीम, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील शून्य ते अठरा वयोगटातील विद्यार्थीची आरोग्य तपासणी कार्यक्रम होतील.
श्री. दाईंगडे म्हणाले, दैनंदिन जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वयाच्या चाळीशी नंतर आरोग्याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक चाचण्या करून घ्याव्यात. या वेळी साठ कर्मचाऱ्यांची आधार कार्ड काढण्यात आली. या वेळी संकेत साजणे, युनूस सय्यद, विनोद कांबळे यांनी सहकार्य केले. या वेळी आरोग्य पर्यवेक्षक विनायक काटकर, श्रीमती सुमन मोहीते यांनी सहकार्य केले.
विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

.निधन वार्ता.
पांडुरंग नार्वेकर….

आजरा शहरातील ज्येष्ठ व्यापारी पांडुरंग उर्फ बंडा भिकाजी नार्वेकर यांचे बुधवार दि.१३ रोजी रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.निधनसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात मुलगा,विवाहित मुलगी,भाऊ असा परिवार आहे.


