मंगळवार दि.२८ मे २०२५

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती निवारण प्रात्यक्षिके

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील चित्री प्रकल्पावर आपत्ती व्यवस्थापनाने आपत्ती पूर्व तयारी म्हणून बोटीसह बचाव साहित्याची रंगीत तालीम घेतली. नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने याचे नियोजन केले होते. महसुल विभागासह विविध गावचे सरपंच, चित्री परिसरातील गावातील नागरीक सहभागी झाले होते. पास रेस्क्यु फोर्सचे राहूल कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम झाली.
पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबाबत प्रशासन दक्ष झाले आहे. नैसर्गिक आपत्तीपुर्वीची तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून येथील चित्री प्रकल्पावर रंगीत तालीम घेण्यात आली. बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, यासह अन्य बचाव साहित्याची चाचणी या वेळी पार पडली. चित्रीच्या तलावात बोटीतून बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फेरफटका मारला.त्याचबरोबर बचाव साहित्याचीही चाचणी करण्यात आली.
तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी समीर जाधव, तलाठी श्री. माने यांच्यासह बचाव कार्य दलाचे कर्मचारी, सरपंच व नागरीक उपस्थित होते.

चुकीच्या वीज बिलांचे तातडीने निराकरण करा अन्यथा मोर्चा… सेनेचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वीज वितरण विभागाकडून ज्या शेतकऱ्याच्या ५ एच पी ची मोटार आहे त्या शेतकर्याना १० एच पी ची बिल पाठविण्यात आलेली आहेत. त्याच बरोबर अनेक वर्ष वर्ष बंद असलेल्या शेती पंपाची सुद्धा वीज बिल आपल्या कंपनीकडून शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेली आहेत. शासनाने ७.५ एच पी च्या शेती पंपांना वीज बिल माफ केलेले असताना देखील शेतकऱ्यांना वीज बिल पाठवून व कारवाईच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांची नाहक बदनामी व चेष्टा केलेली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा बिलांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या (उबाठा) वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर संभाजी पाटील, उपजिल्हा प्रमुख, युवराज पोवार तालुकाप्रमुख, समीर चांद उपशहरप्रमुख, शिवाजी आडाव, संजय येसादे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, विभाग प्रमुख दिनेश कांबळे यांच्यासह असून निवेदन देताना युवा सेना शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्सून पूर्व पावसातच धनगरमोळ्यात महामार्गालगतच्या वस्तीत पाणी शिरले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धनगरमोळा (ता. आजरा) येथील संकेश्वर-बांदा लगतच्या वस्तीत मान्सूनला सुरुवात होण्याआधीच झालेल्या मुसळधार मान्सून पूर्व पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महामार्ग होऊन एक वर्ष झाले तरी गटार बांधले गेले नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षी मुख्य पावसाळा सुरू होण्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसात गटारीअभावी घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अन्य ठिकाणी गावात स्थलांतरित व्हावे लागले.
गतवर्षी हीच अवस्था असल्याने महामार्गावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ५० मीटर लांबीची गटर बांधण्याचे आश्वासन महामार्ग अधिकारी अनिल पाटील यांनी दिले होते. तरीदेखील गेले वर्षभर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान दुर्लक्ष केल्यामुळे यावर्षी पहिल्याच पावसात घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आता पूर्ण पावसाळभर वारंवार या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
तातडीने गटर बांधकाम न केल्यास माजी सरपंच चंद्रकांत जाधव, आनंदा शेडगे, बाळकू बारदेस्कर, बाबू बारदेस्कर, योगेश जाधव, यशवंत जाधव आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रा. डॉ. शिवानंद गजरे यांना भारत सरकारचे पेटंट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शिवानंद प्रकाश गजरे आणि यशंवतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड महाविद्यालयातील डॉ. किशोर जगधने यांना डीव्हाईस फॉर डीटेक्शन ऑफ व्हीटॅमिन बी-२ इन वॉटर या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले.
शरीरामध्ये जीवनसत्व बी-२ पर्याप्त उर्जास्तर राखून ठेवण्यास मदत करतो, जे शरीराच्या सामान्य कार्य व गतिविधींना सहाय्य करते. तसेच शरीरात जीवनसत्व बी-२ च्या इतर घटाकांचे सामान्य स्तर राखून ठेवण्यास मदत करते. जसे की बी-६ आणि बी-९ शरीरात वापरु शकल्या जाणा-या त्यांच्या सक्रिय रुपांमध्ये परिवर्तीत करुन हे साध्य केले जाते.
जीवनसत्व बी-२ कमतरतेमुळे थकवा, सुजलेला घसा, अस्पष्ट दृष्टी आणि नैराश्यपणा येऊ शकतो. तोंडाभोवती त्वचेला तडे, खाज सुटणे आणि त्वचारोग होवून त्वचेवर परिणाम होवू शकतो. त्याचे रुपांतर कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर होऊ शकते. याची दखल घेत पाण्यामधील जीवनसत्व बी-२ याचा सेंद्रीय संयूग वापरुन शोध घेणे सोपे केले.
या संशोधनाकरीता शिवाजी विद्यापिठातील रसायन शास्त्राचे प्रा. डॉ. जी. बी. कोळेकर आणि प्रा. डॉ. पी.व्ही. अनभुले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. ए. व्ही. माळी, डॉ. एस. एच. बुरुंगले यांचे सहकार्य लाभले.

शिवारे गेली पाण्यात…
खरिपावर मान्सूनपूर्वचे संकट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मान्सूनपूर्व पावसाने घातलेल्या धुमाकुळाचा परिणाम खरीपावर होण्याची शक्यता दिसत असून शेतजमिनी तयार नसल्याने पेरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे उन्हाळी पिके वाया गेली असताना दुसरीकडे खरिपाची तयारी करता येत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे.
अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिके शेतातच कुजत आहेत तर जमिनी तयार झालेल्या नसल्याने खरिपाची पेरणी अडचणीत आली आहे. पूर्वमोसमी बरोबरच मोसमी पावसाचीही चाहूल लागत असल्याने पाऊस थांबण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकरी वर्गाला आतातरी दुसरा पर्याय दिसत नाही.
निधन वार्ता
पार्वती आसबे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील पार्वती शंकर आसबे (वय ७६ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे.
शांताराम आसबे व अर्जुन आसबे यांच्या त्या मातोश्री होत.

