




५५ जणांचा चावा…
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार तरी कधी…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एकीकडे नवरात्र उत्सवाची धूम सुरू असताना आजरा शहर व परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून रात्री- अपरात्री नवरात्र उत्सव कार्यक्रमासाठी येणाऱ्या तब्बल ५५ जणांचा चावा गेल्या आठ दिवसात कुत्र्यांनी घेतला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपंचायत प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरल्याचे यातून अधोरेखित होत आहे.
गेल्या वर्षभरापासून आजरा शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. केवळ आजरा शहरच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचा त्रास नागरिकांसह बच्चे कंपनी व महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. सध्या नवरात्रीनिमित्त रात्रीच्या वेळी शहरातील विविध मंडळाच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना प्रथम कुत्र्यांपासून सावधानता बाळगावी लागत आहे. त्यातूनही कोपऱ्या -कोपऱ्यावर असणारी भटकी कुत्री सर्वसामान्यांवर हल्ला करताना दिसतात.गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल ५५ जणांचा चावा कुत्र्यांनी घेतला असून जखमींनी आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले असल्याचे समोर येत आहे. इतरत्र उपचार घेणाऱ्यांची संख्या वेगळी आहे.शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार तरी कधी ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दोघांना सर्पदंश…
सध्या सुगीचे दिवस सुरू असल्याने भात कापणी वेगावली आहे. यामुळे शेतामध्ये जाणाऱ्या मंडळींवर सर्पदंशांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून दोन रुग्ण सर्पदंशावर उपचार घेत आहेत. शेतकरी वर्गाने सर्पदंशापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या भूमिकेने कार्यकर्ते सुखावले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ॲड.वीरेंद्र मंडलिक यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात उतरण्याचा निर्णय जाहीर केल्याने आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी खासदार संजय मंडलिक यांचे कार्यकर्ते सुखावले असून मंडलिक यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.
मंडलिक कुटुंबीयांवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात मोठी आहे. लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर मंडलिक यांच्या कार्यकर्ते नाराज तर झाले होतेच परंतु या पराभवाची कारणे शोधण्यामध्ये व्यस्तही होते. यामध्ये प्राधान्याने काही मंडळींनी दगा फटका केल्याची चर्चा आजही होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच वीरेंद्र यांनी आपली कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी राहणार असे स्पष्ट केले आहे.
ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या या निर्णयामुळे उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह दिसू लागला आहे.



स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमनपदी दयानंद भुसारी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व सुधीर मधुकर चोडणकर रा. आजरा यांची रिक्त संचालकपदी निवड करण्यात आली.
सुजय येजरे अध्यक्ष आधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आजरा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.नुतन चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी व नुतन संचालक सुधीर चोडणकर यांचा सत्कार सुजय येजरे यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक शिवाजीराव येसणे, सुकाणू समिती सदस्य मलिककुमार बुरुड व अरुण नारायण देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सुकाणू समिती सदस्य व सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आभार संचालक सुधीर कुंभार यांनी मांडले.


नवरात्रीच्या उत्साहावर पावसाचे पाणी…
अनेक कार्यक्रम रद्द…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नवरात्रीच्या उत्साहावर पाणी पडले असून अनेक मंडळांना पावसामुळे महाप्रसाद, दांडिया सह विविध धार्मिक, मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यातची वेळ आली आहे.
नवरात्र शुभारंभ प्रसंगी पावसाने उघडी दिल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.यामुळे मंडळांनी आयोजित केलेले विविध कार्यक्रम दणक्यात सुरू होते मात्र सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमावर अनेक मर्यादा आल्याचे जाणवत आहे.
नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मंडळांना आर्थिक फटकाही बसत आहे.


शिरसिंगी येथे चोरीचा प्रयत्न फसला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई यांचे बंधू हणमंतराव यशवंतराव देसाई यांच्या घरी दरवाज्याचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी केलेला चोरीचा प्रयत्न घरामध्ये काहीही मौल्यवान वस्तू न ठेवल्याने फसला.
हणमंतराव देसाई हे पुणे येथे राहावयास असतात. त्यांचे सिरसंगी-किणे मार्गावर घर आहे या घराच्या दरवाजाचे कडी – कोयंडे उचकटून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला परंतु देसाई यांचे या घरामध्ये क्वचितच वास्तव्य असल्याने कोणतीही मौल्यवान वस्तू चोरट्यांच्या हाती लागली नाही. काल सदर प्रकार उघडकीस आला.



उद्या आजऱ्यात बुद्ध विहारचे भूमिपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील गांधीनगरमध्ये बुध्द विहाराचा शुक्रवार (ता. ११) दुपारी २ वाजता भूमीपुजन समारंभ होत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर समारंभ होणार आहे . विहारासाठी आमदार आबिटकर यांनी २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. अशी माहीती आजरा तालुका दलित मानवी हक्क संरक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. पी. कांबळे, कार्याध्यक्ष शशिकांत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दलित मानवी हक्क संरक्षक संघटनेची गांधीनगर येथे साडेचार गुंठे जागा आहे. यापैकी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून पन्नास लाखांचे सामाजिक सभागृह उभारण्यात आले आहे. उर्वरीत जागेत बुध्द विहार उभारले जाणार आहे. यामध्ये भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, सभागृह, निवास व्यवस्था, डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट मांडणारे दालन असेल. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अण्णा भाऊ समुहाचे प्रमुख अशोक चराटी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावेळी सरचिटणीस विष्णु कांबळे, नारायण कांबळे, दौलती कांबळे, विश्वास कांबळे, अशोक कांबळे, श्रावण कांबळे, उत्तम कांबळे, तानाजी कांबळे, गुणाजी कांबळेसह पदाधिकारी उपस्थित होते.


सर्वोदय सेवा संस्थेकडून सभासदाना ९ टक्के लाभांश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळेरान (ता. आजरा) येथील सर्वोदय सेवा संस्थेला यंदाच्या आर्थिक वर्षात ४ लाख ३४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दिवाळीला सभासदांना ९ टक्के प्रमाणे लाभांश दिला जाईल. अशी माहीती संस्थचे अध्यक्ष लहू विठ्ठल पाटील यांनी दिली.
सुळेरान (ता. आजरा) येथील सर्वोदय सेवा संस्थेची ७२ वी वार्षिक सभा उत्साहात झाली. श्री. पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सभासद गोविंद गोविंद नारायण पाटील यांची आजरा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. संचालक अशोक तांबेकर यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. सचिव दिलीप पाटील यांनी अहवाल व आर्थिक पत्राचे वाचन केले.
यावेळी उपाध्यक्ष आनंदा खरुडे, चंद्रकांत जाधव, रामचंद्र पाटील, मार्यान बार्देस्कर, उतम माडभगत, वैष्णवी पाटील, सत्वशिला शेटगे, प्रकाश मोरुस्कर, लक्ष्मण अडकूरकर, दिलीप खरुडे, जयसिंग पाटील यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. निवृत्ती अडकूरकर यांनी आभार मानले.

(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



