mrityunjaymahanews
अन्य

बुधवार – सातच्या बातम्या

बुधवार  

दि.१४ऑक्टोबर २०२६

इच्छाशक्ती असेल तर कोणतेही गाव आदर्श होऊ शकते – आदर्श सरपंच पेरे-पाटील

आजरा : प्रतिनिधी

इच्छाशक्ती असेल तर कोणतेही गाव आदर्श होऊ शकते असे प्रतिपादन आदर्श सरपंच पेरे-पाटील यांनी केले ते छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी बोलत होते. श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना पेरे पाटील म्हणाले, देशाला महासत्ता बनवण्यासाठी ग्रामव्यवस्था मजबूत करावी लागेल. गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांना उत्तम सुविधा दिल्या तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाहीत हे आम्ही आमच्या पाटोदा गावात सिद्ध करून दाखवले आहे.

पाटोदा ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर उत्पन्नात वाढीसाठी वापरलेले वेगवेगळे मार्ग, महिला वर्गाची ग्रामीण विकासात असणारी महत्त्वपूर्ण भूमिका, ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळण्यासाठी राबवलेले विविध उपक्रम याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

गावातील स्मशानभूमी सुद्धा बागेसारखी सुंदर बनवली आहे. तिथे असंख्य जांभळाची झाडे लावली आहेत. तिथे गेल्यावर ती स्मशानभूमी आहे की बाग असा प्रश्न पडतो. प्रत्येक गल्लीत सहज हात धुता येतील असे बेसिन बसवले आहेत. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त केले आहे. विरोधकांच्या टीका टिप्पणीकडे लक्ष न देता सकारात्मक व विधायक काम करत राहिले तर निश्चितच लोकसहभाग आपोआप वाढून गावांचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन राकेश करमळकर यांनी केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भुईंबर, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते.

गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास; २५-० विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

आजरा : प्रतिनिधी

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. महायुतीकडे सुमारे चार हजार, तर महाविकास आघाडीकडे एक हजार ठरावधारक असल्याचे सांगत त्यांनी गोकुळमध्ये महायुतीचा २५-० असा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन केले. विरोधकांकडून मतदारांमध्ये मनभेद करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या मैदानावर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले. या मेळाव्यात गोकुळच्या निवडणुकीतील महायुतीची भूमिका, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आजरा तालुक्याचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहिला पाहिजे, ही महायुतीची भूमिका आहे. सहकार क्षेत्रात काम करताना सत्तेची साथ महत्त्वाची असते. गोकुळच्या निवडणुकीचा निकाल प्रसारमाध्यमांतील चर्चेवर नव्हे, तर प्रत्यक्ष ठरावधारकांच्या संख्येवर ठरणार आहे. आगामी काळात राजकारणात कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. महायुतीच्या विजयात आजरा तालुक्याचे योगदान मोठे असेल आणि येथून सर्वाधिक ठराव मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सत्तेचा लाभ सर्वांना समान पद्धतीने मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मेळाव्यात विष्णुपंत केसरकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, आदित्य रेडेकर, सुनील शिंदे आणि इंद्रजित देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, प्रभाकर खांडेकर, सुरेश होडगे, भिकाजी गुरव, परशराम बामणे, बाळ केसरकर, महेश खेडेकर, विजय थोरवत, संतोष भाटले, धनंजय पाटील, सुनील दिवेकर,   विठ्ठल उत्तूरकर, असिफ सोनेखान, जुबेर चाँद, राजू पोतनीस, सुषमा पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक शिंपी यांनी केले. शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रणजित सरदेसाई यांनी आभार मानले.

आजऱ्यात महाविकास आघाडीची भव्य निदर्शने…

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; भाजप सरकारवर नेत्यांची जोरदार टीका

आजरा : प्रतिनिधी

देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर होत असलेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ आजरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भाजप सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यावेळी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले की, हे आंदोलन भाजपच्या विरोधात नसून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू आहे. मात्र, ५६ इंच छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री पोलिसांच्या व सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन दडपण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, असा सवाल उपस्थित करत देशातील अनेक राजकीय पक्ष फोडून लोकशाही मोडीत काढण्याचा डाव सुरू असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीच्या काळात अचानक वाढलेली मते आणि त्याच्या जोरावर राज्यात व देशात सत्तेवर आलेली सरकारे, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.

कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की, देशाची राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे लोकशाही प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होत असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, लोकशाही आणि स्वातंत्र्याची मूल्ये न मानणाऱ्या मनुवादी विचारांचे सरकार सत्तेवर असल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचा चोळामोळा करण्याचे काम या सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या आंदोलनात कॉम्रेड शांताराम पाटकर यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, दयानंद भोपळे, युवा सेना तालुकाप्रमुख महेश पाटील, समीर चाँद, सागर नाईक, संजय येसादे, काँग्रेसचे संजय सावंत, रवी भाटले यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा निषेध आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत हे आंदोलन पार पडले.

आजऱ्यात पारंपरिक पशू खरेदी-विक्री बाजार पुन्हा सुरू करा

आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाची नगरपंचायतीकडे मागणी

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील कोरोना महामारीच्या काळापासून बंद असलेला पारंपरिक पशू खरेदी-विक्री बाजार पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाच्या वतीने आजरा नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या बाजारामुळे शेतकरी, पशुपालक, पशुव्यापारी तसेच स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होणार असून, शहराच्या आर्थिक उलाढालीलाही चालना मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

आजरा हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तसेच आजरा तालुका व पंचक्रोशीतील एक महत्त्वाचे व्यापारी आणि दळणवळणाचे केंद्र आहे. आजरा शहरात गेल्या ७० ते ८० वर्षांपासून पारंपरिक पशू खरेदी-विक्री बाजार भरत होता. या बाजारासाठी आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमधून तसेच कोकणातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव परिसरातून शेतकरी व पशुपालक येत असत. मात्र, कोरोना महामारीच्या काळात हा बाजार बंद करण्यात आला. कोरोना काळ संपून अनेक वर्षे उलटली तरी बाजार पूर्ववत सुरू झालेला नाही.

पशू खरेदी-विक्री बाजार हा केवळ जनावरांच्या व्यवहारापुरता मर्यादित नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या बाजारामुळे शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी सोयीचे ठिकाण उपलब्ध होते. तसेच पशुव्यापारी, चारा विक्रेते, कृषी साहित्य विक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, वाहतूक व्यावसायिक आणि इतर छोट्या व्यावसायिकांनाही रोजगार मिळतो. बाजार बंद असल्यामुळे या सर्व घटकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

पारंपरिक पशू बाजार पुन्हा सुरू झाल्यास शेतकरी व पशुपालकांना जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांमध्ये जाण्याची गरज कमी होईल. त्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचेल. आजरा शहरातील दळणवळण व वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल. बाजाराच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि अन्य लघु व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच आजऱ्याची पारंपरिक व्यापारी बाजारपेठ पुन्हा विकसित होण्यास मदत होईल.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन पशू बाजार सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी व्यापारी मंडळाने केली आहे. बाजारासाठी आवश्यक जागा, स्वच्छता, पाणी, वाहतूक, सुरक्षा, पशुवैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. निवेदनाची प्रत मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

पारंपरिक पशू बाजार पुन्हा सुरू करा, शेतकऱ्यांना बाजारपेठ द्या, व्यापाराला चालना द्या आणि आजऱ्याच्या अर्थव्यवस्थेला बळ द्या, असे आवाहन आजरा शहर एकसंध व्यापारी मंडळाने केले आहे.

आजरा – उत्तूरकडे मार्गावर अपघातात एका वृद्धाचा मृत्यू, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा

उत्तुर : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील मडिलगे गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने होन्याळी ता. आजरा येथील जोतिबा पुंडलिक सुर्यवंशी ( वय ६० वर्षे) हे दिनांक १३ ऑक्टोबर  रोजी सकाळी ९ वाजण्याच्या पूर्वी आजरा येथील रविराज हॉटेल पासून उत्तूरला जाणाऱ्या रोडवर मडिलगे हद्दीत रस्त्याच्या डाव्या बाजूला गवतात झोपलेले होते. त्यावेळी एका अज्ञात वाहन चालकाने हयगयीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून त्यांच्या डोक्यावरून चाक घातले व घटनास्थळावरून पलायन केले.

अपघात केल्यानंतर चालकाने जखमीला वैद्यकीय मदत न देता तसेच अपघाताबाबत कोणालाही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. यामध्ये जोतिबा सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत यांचा मुलगा पंकज जोतिबा सुर्यवंशी ( रा. जख्खेवाडी ता. गडहिंग्लज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये शाही दसरा महोत्सव साजरा

आजरा : प्रतिनिधी 

व्यंकटराव हायस्कूल ,ज्युनिअर कॉलेज व प्राथमिक विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ,”शाही दसरा महोत्सव” व “पारंपारिक वेशभूषा” कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला. या दिनानिमित्त ज्युनियर कॉलेज यांचे मार्फत विद्यार्थीनींनी शाळेत भव्य फुल सजावट करून मैदानात शाही दसरा असे लिहून त्यावर आरास सजवण्यात आले. प्राचार्य संजयकुमार पाटील व पर्यवेक्षिका व्हि. जे. शेलार यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक श्री आर.व्ही.देसाई, ज्युनिअर विभाग प्रमुख श्री एम ए पाटील, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एन.ए मोरे, सौ एस डी इलगे, श्री एस टी पाटील, श्री एम एस पाटील उपस्थित होते

पारंपारिक वेशभूषा व कला शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. सकाळच्या सत्रात ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी कार्यक्रमाचे नियोजन केले प्रार्थना परिपाठानंतर हायस्कूल मधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पारंपारिक वेशभूषेत येऊन त्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने आकर्षक अशा वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक आर् व्ही देसाई व त्यांचा स्टाफ यांनी नियोजन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका उपस्थित होते.

आजरा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शाही दसरा मेळावा उत्साहात संपन्न 

आजरा : प्रतिनिधी 

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे शाही दसऱ्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेमुळे शाळेच्या परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी आणि पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाही दसरा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये’ महाहादगा उत्साहात साजरा

आजरा : प्रतिनिधी

पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये महाहादग्याचे आयोजन करण्यात आले होते. महाहादगा व नवरात्रोत्सव कार्यक्रमांतर्गत’ खेळ पैठणीचा मायलेकीची जोडी’ शालेय विद्यार्थिनी व माता पालकांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. 

कुंभार एस. आर. यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा हेतू सांगून माता पालक आणि विद्यार्थिनीच्या आनंदाचा हा सोहळा आहे .आपल्या संस्कृतीची ओळख होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असे विचार मांडले. कांबळे एस .पी. यांनी हादग्याविषयी माहिती सांगून पाऊस, शेती आणि निसर्ग याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा , महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा सांगणारा हादगा सण का साजरा केला जातो याबद्दल आपले विचार व्यक्त केले. आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारी आपली संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर होणे गरजेचे आहे असे विचार नगरपंचायत च्या उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सोहनी मॅडम यांनी हादग्यासंबंधी ऐतिहासिक माहिती सांगून विद्यार्थिनींना आपल्या संस्कृतीवर प्रेम करण्याचा, आपल्या संस्कृतीशी नाळ जोडण्याचा संदेश दिला.’ खेळ पैठणीचा मायलेकींची जोडी ‘या कार्यक्रमाच्या आयोजनानिमित्त विद्यार्थिनी आणि मातापालक यांचं नातं सुधारण्याची संधी शाळेने दिली याबद्दल डॉ. स्मिता कुंभार त्यांनी शाळेचे आभार मानले .

यानंतर ‘खेळ पैठणीचा माय लेकींची जोडी’  हा कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये माता पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वेगवेगळ्या खेळांतून आनंद घेतला. सौ. वर्षा व लेक तनुजा निकम ही जोडी पैठणीची प्रथम मानकरी ठरली. सौ तेजश्री , कु.दूर्वा बुरुड द्वितीय तसेच सौ.शितल ,लेक कु.शुभ्रा कांबळे तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. यानंतर विद्यार्थिनींनी आणि प्रमुख पाहुणे, इतर मान्यवर महिलांनी हादग्याची सांगता केली. पैठणीच्या मानकरी ठरलेल्या जोडीना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज तसेच उपाध्यक्षा श्रीम.विमल भुसारी यांच्या हस्ते योग्य ते बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमासाठी संगीता पाटील, प्रिया नार्वेकर, माता पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी.बी.बुरुड व आभार निर्मळे एस .ए .यांनी मानले.

      

   झुलपेवाडी बंधारा क्रमांक ४ च्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाचा पुढाकार

उत्तूर : प्रतिनिधी 

आजरा तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पांतर्गत झुलपेवाडी येथील बंधारा क्रमांक ४ मधील पाण्याची गळती, अडकलेली झाडे-लाकडे आणि वाढलेल्या झुडपांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्यांमुळे पाणी साठवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यासंदर्भात शेतकरी अनिल कृष्णा माने यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे तक्रार दाखल करून बंधाऱ्यातील अडथळे दूर करणे व गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी एम. के. चव्हाण यांनी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.चिकोत्रा प्रकल्प हा आजरा तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत असून, त्यातील पाणीसाठा शेतीच्या सिंचनासाठी उपयुक्त ठरतो. या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन आणि साठवणूक झाल्यास परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती आणि पाण्याची गळती रोखणे आवश्यक आहे.बंधाऱ्यातील अडथळे दूर करून गळती रोखण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या प्रश्नाला प्रसिद्धी देऊन सहकार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचे अनिल माने यांनी आभार मानले.

खुल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनाळी संघाने मारली बाजी!

 लोककलेचा जागर

पेरणोली :प्रतिनिधी

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त धर्मवीर संभाजीनगर, पेरणोली येथे आयोजित भव्य खुल्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत सोनाळी संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत विजेतेपद पटकावले. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक नृत्याविष्कार, उत्कृष्ट तालबद्धता आणि संघभावनेच्या जोरावर सोनाळी संघाने उपस्थितांची मने जिंकली.

 पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देणे, ग्रामीण संस्कृतीचे जतन करणे आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत सहभागी महिला संघांनी पारंपरिक झिम्मा, फुगडी आणि विविध नृत्यप्रकारांचे बहारदार सादरीकरण केले. महिलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे १५,००१/- रुपयांचे पारितोषिक उद्योजक श्री. युवराज जाधव , द्वितीय क्रमांकाचे १०,००१/- रुपयांचे पारितोषिक उद्योजक श्री. पांडुरंग धडाम, तर तृतीय क्रमांकाचे ७,००१/- रुपयांचे पारितोषिक श्री. संतोष भाटले यांनी प्रायोजित केले होते. तसेच कॉन्ट्रॅक्टर श्री. आरिफ दरवाजकर यांनी २,००१/- रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रायोजित केले होते.
या स्पर्धेत सोनाळी संघाने प्रथम क्रमांक पटकावून १५,००१/- रुपयांच्या पारितोषिकाचा मान मिळवला. 

या कार्यक्रमाच्या  आयोजनासाठी धर्मवीर संभाजीनगर शारदीय नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच यश फाऊंडेशन, पेरणोली यांच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

आजचे पंचांग 

दिनांक : १४ ऑक्टोबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (१५ ऑक्टोबर रात्री ०१.१४ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (१५ ऑक्टोबर सकाळी ०४.०२ पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : आयुष्मान योग (रात्री ०८.३८ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : वाणीजा करण (दुपारी १२.१६ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.२४ ते दुपारी ०१.५२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छाया वृत्त…

वाटंगी येथे हत्तीने धुमाकूळ घालत ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी माजी सभापती अल्बर्ट डिसोजा यांच्यासह शेतकरी वर्गाने हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शुक्रवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!