mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरुवार  

दि.१५ ऑक्टोबर २०२६

आजरा तालुक्यात नवरात्रोत्सवाची धूम, जंगी कार्यक्रमांचे आयोजन

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यात नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून तालुकाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांसह मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध सांस्कृतिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले आहे.

यंदा तालुक्यात राज दांडिया, प्रवचन, कीर्तन, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, भजन स्पर्धा, महिला मंडळांचे होम मिनिस्टर खेळ, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच मान्यवरांची व्याख्याने अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. दररोज सायंकाळी देवीची आरती झाल्यानंतर हे कार्यक्रम सुरू होत असून रात्री उशिरापर्यंत भक्तांची गर्दी दिसून येत आहे.

विशेषतः छत्रपती शिवाजीनगर, सुळेरान, भादवण, गवसे, देवर्डे, उत्तूर, लाटगाव, खानापूर, वाटंगी येथील मंडळांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. काही मंडळांनी गड-किल्ले तर काहींनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. यामध्ये ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण या विषयांवरील देखाव्यांना नागरिकांची पसंती मिळत आहे.

छत्रपती शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामविकासावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाला  मोठा प्रतिसाद दिला. त्याचबरोबर इतर मंडळांमध्येही कीर्तनकार व प्रवचनकारांची कीर्तने सुरू आहेत.

दांडिया आणि गरबा खेळासाठी महिला व युवतींमध्ये विशेष उत्साह दिसत असून पारंपरिक वेशभूषेत महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बालगोपाळांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धांमुळे लहान मुलांमध्येही नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

एकंदरीत आजरा तालुक्यात नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता तो सांस्कृतिक आणि प्रबोधनाचा उत्सव ठरत असून या कार्यक्रमांना बालगोपाळांसह महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सर्किट बेंचच्या निर्णयाने जिल्हा बँक वर्तुळात खळबळ…


कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

संचालकांना सलग दहा वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत राहता येणार नाही, या केंद्र सरकारच्या निर्णयावर कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी शिक्कामोर्तब केले. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती, त्यावर हा निकाल देण्यात आला. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ मध्ये सुधारणा करत सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम करण्यावर निर्बंध आणले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेतील हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक, निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भय्या माने, राजू आवळे, संतोष पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर ही जिल्ह्यातील बडी राजकीय मंडळी अडचणीत आली आहेत.

साहेब, देवीची वात आहे… ठराव धारकांची नेत्यांना विनंती की…?

आजरा : प्रतिनिधी

ऐन नवरात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील वातावरण भक्तीमय असतानाच राजकीयदृष्ट्याही तापले आहे. या निवडणुकीत ठराव धारकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्यांचा भाव सध्या चांगलाच वधारला असल्याचे चित्र आहे.

दसऱ्यासोबतच दिवाळीची जोडणीही जुळून आल्याने ठराव धारकांची दिवाळी यंदा आधीच साजरी होत आहे. मात्र नेते मंडळींची चांगलीच दमछाक होत असून ठराव धारकांकडून दगाफटका होऊ नये यासाठी त्यांना सहलीवर पाठवण्याची लगबग सुरू आहे. हॉटेल बुकिंगपासून ते प्रवासाच्या नियोजनापर्यंत सर्व तयारी नेत्यांच्या पातळीवरून सुरू आहे.

दुसरीकडे काही ठराव धारकांनी एकाच वेळी अनेक उमेदवार /गटांसोबत ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याची कुजबुज आहे. त्यामुळे आता सहलीला पाठवताना अडचणी येत आहेत. साहेब, घरात देवीची वात आहे, खंडेनवमीचे बकरे आणायचे आहे, शेतातली कामे आहेत, अशी विविध कारणे सांगून काही ठराव धारक सहलीला जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे जोपर्यंत सहल होत नाही तोपर्यंत ठराव पक्का कसा करायचा, याची चिंता नेते मंडळींना लागली आहे. नवरात्रोत्सवात देवीची आराधना सुरू असताना गोकुळच्या राजकारणात कोणाची वात तेवत राहणार आणि कोणाची विझणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आवंडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन २० ते २४ वर्षांपासून रखडले

२० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेण्याची मागणी ; अन्यथा चित्री धरणातील पाणी रोखण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील आवंडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या २० ते २४ वर्षांपासून प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुनर्वसनाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

आवंडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आंबर्डी ग्रामपंचायतीने भूखंडांच्या नोंदी घेतलेल्या नाहीत तसेच घरठाण पत्रक तयार केलेले नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या घरठाणांना मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे.

भूमी अभिलेख कार्यालय, आजरा यांनी सिटी सर्व्हेचा नकाशा तयार केलेला नाही. तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या भूखंडांच्या नकाशाला नगररचना विभागाची मंजुरी मिळालेली नसल्याने पुनर्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना देण्यात आलेल्या नागरी सुविधांच्या हस्तांतरणाबाबतही आवश्यक नोंदी आणि सह्या अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुनर्वसनासंबंधीच्या आदेशाची तसेच पुणे विभागीय आयुक्तांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घ्यावी आणि पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सुनावणी न झाल्यास चित्री धरणातील पाणी रोखण्याचा इशारा....

प्रशासनाने २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुनावणी घेऊन न्याय न दिल्यास चित्री धरणातून एक थेंबही पाणी सोडू न देण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. धरणस्थळावर उपोषण करून पाणी सोडण्यास विरोध करण्यासह आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत आजरा पोलीस ठाण्यालाही देण्यात आली आहे.

या निवेदनावर आप्पासो पाटील, चंद्रकांत निकम, जितेंद्र नवार, विलास अस्वले, संतोष चौगुले, बाळू दारोटे, शंकर सावंत, रघुनाथ ठिकार आणि रामचंद्र मांगले यांच्या सह्या आहेत.

आंबर्डी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी मिळतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निधन वार्ता 

आरदाळ येथील मीनाताई ठाकरे दूध संस्थेचे संस्थापक संचालक सुभाष कृष्णा येजरे( वय ६२) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी,. तीन भाऊ, एक बहीण तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

      

आजचा महाप्रसाद….

लायन्स किंग फ्रेंड सर्कल नवरात्र उत्सव मंडळ

वेळ : दुपारी १२.०० ते ४.००

आजचे पंचांग 

दिनांक : १५ ऑक्टोबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (१६ ऑक्टोबर पहाटे ०३.२५ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (१६ ऑक्टोबर सकाळी ०६.४७ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : सौभाग्य योग (रात्री ०९.१४ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : भाव करण (दुपारी ०२.१६ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०१.५२ ते दुपारी ०३.१९पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.३४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सावधान…उभ्या गाड्यांमधील डिझेल चोरीचे प्रकार आज-यात वाढले…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!