mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार  

दि.१६ ऑक्टोबर २०२६

गोकुळ मध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार : अशोकअण्णा चराटी

आजरा : प्रतिनिधी

महायुतीतील सर्वच घटक पक्ष प्रामाणिकपणे प्रचार यंत्रणा राबवत असल्याने महायुतीच्या सर्वच उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांनी व्यक्त केला. ते ‘मृत्युंजय महान्यूज’शी बोलत होते.

महायुतीच्या प्रचारास मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होत आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळी ही प्रचार यंत्रणा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवत असून प्रत्येक गावात महायुतीच्या कामांची माहिती पोहोचवली जात आहे. तालुक्यातून विक्रमी मतदान महायुतीला होणार आहे हे स्पष्ट होत आहे.

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुतीने केलेली कामे आणि भविष्यातील योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

येत्या निवडणुकीत मतदार महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आणि गोकुळमधून महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही चराटी यांनी यावेळी व्यक्त केला.

आजऱ्यात पाण्याचा प्रचंड अपव्यय ; दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना नगरपंचायतीचे दुर्लक्ष

आजरा : प्रतिनिधी

एकिकडे यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे आजरा शहरात पाणीपुरवठा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा भयंकर अपव्यय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

शहरातील अनेक भागात नळांना तोट्या न बसवणे, आलेले पाणी थेट गटारात सोडणे, त्याच पाण्याने वाहने धुणे, अंगण धुणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. परिणामी अनेक ठिकाणी  डबक्यांचे साम्राज्य तयार झाले असून स्वच्छ पाणी वाया जात आहे. पाणी हेच जीवन असताना त्याची किंमत शहरवासीयांना कळणार तरी कधी? असा सवाल सुजाण नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे अनेकांनी गरज नसताना विनापरवाना दोन-दोन, तीन-तीन नळ कनेक्शन घेतल्याची चर्चा आहे. गरज नसताना घेतलेली ही जादा कनेक्शनच पाणी वाया घालवण्यास कारणीभूत ठरत आहेत. मात्र नगरपंचायत प्रशासन याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

उपाययोजना करणे गरजेचे –

 शहरातील सर्व नळांना तोट्या बसविणे बंधनकारक करावे आणि तोटी न बसवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी,विनापरवाना आणि एकापेक्षा जास्त घेतलेली अनधिकृत नळ कनेक्शन तात्काळ तोडावीत व त्यांचे सर्वेक्षण करावे,
पिण्याच्या पाण्याने वाहने धुणे, बांधकामासाठी वापर करणे यावर बंदी घालून जनजागृती करावी.पाणी बचतीबाबत शाळा, मंडळे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवावी.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे असताना प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

आजऱ्यात उमेद महिला ग्रुप आयोजित महा दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : प्रतिनिधी

आजरा येथे उमेद महिला ग्रुप आयोजित उमेद महा दांडिया २०२६ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते झाला.

यावेळी प्रास्ताविकात सौ. धनश्री मानसिंग देसाई यांनी ग्रुपच्या कार्याची माहिती दिली. महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे आणि अडचणीतील महिलांना मदत करावी, या उद्देशाने ग्रुप कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला योगेश पाटील,राघव सरदेसाई ,डॉ. स्मिता कुंभार, निशा चांद, सुरेखा भालेराव, नूरजाहा सोलापूरे, श्रद्धा देसाई, राजश्री पाटील, मुग्धा चराटी, राजलक्ष्मी देसाई, अनुसया पाटील, ज्योत्स्ना चराटी आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजक गीताताई पोतदार आणि भैरवी सावंत यांनी महिलांनी संघटित होऊन सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. सौ. रचना होलम यांनी मनोगत व्यक्त केले, तर आभार माधुरी पाचवडेकर यांनी मानले. सूत्रसंचालन  अमोल देसाई यांनी केले.

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण : आजरा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

आजरा : प्रतिनिधी 

वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन प्रा. रमेश चव्हाण यांनी केले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, विद्यार्थी विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार अध्यक्षस्थानी होते, तर प्रारंभी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्यावरील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

प्रा. चव्हाण म्हणाले की, डिजिटल युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांमुळे वाचनाची सवय कमी होत आहे, विद्यार्थ्यांनी दररोज नियमित वाचनासाठी वेळ द्यावा. पुस्तके विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्ती समृद्ध करतात आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन देतात. उत्तम साहित्य वाचनातून संवेदनशीलता, विवेकशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होते. प्रभारी प्राचार्य डॉ. पोतदार यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, ज्ञानसाधना करावी आणि अभ्यासक्रमाबरोबरच चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, कविता आणि वैचारिक साहित्याचे वाचन करून व्यक्तिमत्त्वाला दिशा द्यावी, असे मार्गदर्शन केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. अविनाश वर्धन, प्रा. विनायक चव्हाण, डॉ. आप्पासो बुडके आणि प्रा. रत्नदीप पोवार यांनी केले.

निधन वार्ता 

वसंत जांभूळकर

कोवाडे तालुका आजरा येथील वसंत कृष्णा जांभुळकर (वय ५२ वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

आजरा : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक बंडोपंत चव्हाण यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत करून डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली, तर राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कलकत्ता यांच्याकडून मिळालेल्या संगणक संच व प्रिंटरचे पूजन उपाध्यक्षा विद्या हरेर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दिवसभर “वाचनध्यास…” हा सलग वाचन उपक्रम घेण्यात आला. यात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उर्दू प्राथमिक विद्यामंदिर, कुमार भवन विद्यामंदिर, पं. दिनदयाळ विद्यालय, आजरा महाविद्यालय, अभ्यासिकेचे विद्यार्थी आणि वाचक, सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमास निसार लाडजी, रिजवान माणगावकर, शुभांगी पेडणेकर, संतोषी कुंभार, शुभांगी निर्मळे, संतोष लाड, दयानंद भंडारी आणि अश्विनी परीट यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास ज्येष्ठ सभासद सुरेश पत्की, शिवाजीराव पाटील, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, सुचेता गडडी, शुभांगी सोनुले, सदिच्छा चौगुले, सानिका गुंजाळ, सविता वायल, समिक्षा वाक्कर, दिपा कानडे, सानिया काकतीकर उपस्थित होते. ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील यांनी संयोजन केले तर आभार कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी मानले.

आजचे पंचांग 

दिनांक : १६ ऑक्टोबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (१७ ऑक्टोबर सकाळी ०५.५४ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (सकाळी ०६.४७ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : शोभन योग (रात्री १०.०५ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : कौलव करण (दुपारी ०४.३८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (सकाळी ०६.४७ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५६ ते दुपारी १२.२४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.३४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत यश

आजरा : प्रतिनिधी 

जिल्हास्तरीय ४ × १०० मीटर रिले स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

दि. १३ व १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी वेग, समन्वय आणि सांघिक भावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेत उत्कर्ष उमेश जाधव, नियंत अजित पोवार, आरुष नितीन कुंभार, मोहम्मद रहीम तुला आणि ऋतुराज सागर गिरी गोसावी यांनी सहभाग घेतला.

या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. एम. एस. गोरे व श्री. एम. पी. चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे आजरा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!