mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार- सातच्या बातम्या

मंगळवार  

दि.१३ ऑक्टोबर २०२६

भास्करराव पेरे-पाटील आज आजऱ्यात

शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळातर्फे जाहीर व्याख्यान

आजरा : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचे ज्येष्ठ अभ्यासक, प्रभावी वक्ते आणि आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले भास्करराव पेरे-पाटील यांचे जाहीर व्याख्यान आज मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी आजरा येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगर येथे होणार आहे. या व्याख्यानातून ग्रामीण विकास, सामाजिक परिवर्तन, राजकारण, समाजकारण आणि व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.

भास्करराव पेरे-पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि ग्रामविकासाबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास यामुळे महाराष्ट्रात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभाग, लोकजागृती आणि ग्रामपंचायतीची प्रभावी भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत ते आपल्या व्याख्यानांतून सातत्याने मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा, गावांच्या विकासातील अडचणी आणि त्यावर करता येणारे उपाय यांची सोप्या व प्रभावी भाषेत मांडणी करण्याची त्यांची खासियत आहे.

ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी, गावांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधी, स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांसह व्यसनमुक्ती हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करून लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, तरुण पिढीला योग्य दिशा देणे आणि ग्रामविकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे, या विषयांवर ते प्रभावीपणे विचार मांडतात.

त्यांच्या व्याख्यानांमधून ग्रामीण भागातील प्रश्नांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. गावाच्या विकासासाठी केवळ सरकारी निधी पुरेसा नसून लोकसहभाग, नियोजन, पारदर्शक कारभार आणि सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश ते आपल्या मार्गदर्शनातून देतात.

शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भास्करराव पेरे-पाटील यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ आजरा तालुक्यातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि ग्रामविकासात रस असलेल्या नागरिकांना घेता यावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

या जाहीर व्याख्यानाला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचे मंथन अनुभवावे, असे आवाहन शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर पत्रकार संघ माध्यम प्रायोजक आहे.

निवडणूक आयुक्तांच्या  विरोधात आज आजरा येथे महाविकास आघाडीची  निदर्शने

आजरा : प्रतिनिधी

देशभर निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या युवक युवतींवर दडपशाही करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात आजरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने  निदर्शने करण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडी आजरा यांनी दिलेल्या जाहीर आवाहनानुसार उद्या मंगळवार दि. १३ रोजी ठीक ११.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, आजरा येथे हे आंदोलन होणार आहे.

देशभरात निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आंदोलन करणाऱ्या तरुणांवर केंद्र सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या दडपशाहीच्या निषेधार्थ हे निदर्शने आयोजित करण्यात आले आहेत.

या भव्य निदर्शनास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडी आजरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा-आंबोली रोडवर कार गॅरेजमध्ये घुसली ; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

गॅरेजमधील गाड्यांसह शेड व रॅम्पचे मोठ्या प्रमाणात नुकसान

आजरा : प्रतिनिधी

आजरा-आंबोली रोडवरील मिनर्वा हॉटेलजवळ भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसून भीषण अपघात झाला. या अपघातात धनराज प्रतापराव कल्याणकर (वय २३, रा. भोकर, जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला, तर शुभम श्रीमंत कावळे (वय २७, रा. तेरडा, देवतानगर, साईनगर, जि. नांदेड) हा तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

आजरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनराज कल्याणकर हे चारचाकी गाडीने आजरा-आंबोली रोडवरून जात होते. यावेळी मिनर्वा हॉटेलजवळ त्यांची कार रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान धनराज कल्याणकर यांचा मृत्यू झाला. शुभम कावळे याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताची तीव्रता मोठी असल्याने गॅरेजमधील गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच गॅरेजचे शेड आणि रॅम्पचे नुकसान झाल्याने गॅरेजचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भरवस्तीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

या अपघाताचा पुढील तपास आजरा पोलिस करीत आहेत.

 आजरा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शाही दसरा मेळावा उत्साहात संपन्न 

आजरा : प्रतिनिधी 

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे शाही दसऱ्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेमुळे शाळेच्या परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी आणि पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळा बंदच्या धोरणाविरोधात आजऱ्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन

आजरा : प्रतिनिधी

शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात आणि शिक्षकांवरील अतिरिक्त ऑनलाईन कामाचा ताण कमी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा आजरा यांच्यावतीने तालुकास्तरावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याची भीती असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच शिक्षकांवर दररोज वेगवेगळ्या लिंकद्वारे माहिती भरण्याचा अतिरिक्त बोजा टाकला जात असून त्याचा अध्यापनावर परिणाम होत आहे.

‘गाव तिथे शाळा आणि शाळा तिथे शिक्षक’ हे तत्त्व राबवावे, कोणतीही शाळा बंद करू नये आणि माहिती मागविण्यासाठी शनिवार हा एकच वार निश्चित करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

यावेळी शिवाजी बोडक ,एकनाथ गिलबिले, सुनील शिंदे, बळवंत शिंत्रे, कॉ. संपत देसाई, सौ.अनुष्का गोवेकर सौ. सुरेखा नाईक यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामतीर्थ येथे धार्मिक कारणासाठी येणाऱ्या भाविकांना पर्यटन शुल्कातून सूट

आजरा : प्रतिनिधी

घटस्थापना ते दसरा या कालावधीत रामतीर्थ येथे श्री महादेव मंदिर व श्री प्रभू राम मंदिर येथे दर्शन व तेल घालणे या धार्मिक विधीसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक कारणासाठी येणाऱ्या भाविकांकडून पर्यटन शुल्क वसूल करू नये, अशा सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी, आजरा यांनी दिल्या आहेत.

या सूचनेनुसार काही विशिष्ट दिवशी रामतीर्थ पर्यटक नाक्यावर पर्यटन शुल्क वसुली पूर्णपणे बंद राहणार आहे. शुल्क वसुली बंद असणारे दिवस पुढील प्रमाणे…

१७ ऑक्टोबर  शनिवार, १८ ऑक्टोबर  रविवार, १९;ऑक्टोबर  जागर आणि २० ऑक्टोबर २०२६ विजयादशमी दसरा.

तसेच १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रामतीर्थ पर्यटक नाका नियमितपणे सुरू राहील. या काळात केवळ पर्यटकांकडून नियमानुसार शुल्क वसूल करण्यात येईल. मात्र धार्मिक विधी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

आजचे पंचांग         

  दिनांक : १३ ऑक्टोबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया तिथी (रात्री ११.२७ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (१३ ऑक्टोबर रात्री ०१.४२ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : प्रीति योग (रात्री ०८.२३ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : तैतुला करण (सकाळी १०.४६ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : तुळ राशी (रात्री ०७.१२ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.२० ते सायंकाळी ०४.४८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४८
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत         

 

 

संबंधित पोस्ट

उचंगी येथे काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी…

mrityunjay mahanews

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

mrityunjay mahanews

जिल्ह्यात राजकीय त्सुनामी…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!