मंगळवार दि.३ जून २०२५


आजऱ्यात दोन गावे, वाड्यांना भूस्खलनचा धोका
आपत्ती व्यवस्थापनाचे लक्ष दररोज रहाणार लक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोली, हरपवडे या दोन गावासह पेरणोली पैकी नावलकरवाड़ी, वझरेपैकी खोतवाडी या कड्यांना भूस्खलनचा धोका आहे. संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेवून नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात ही गावे व वाड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.दररोज येथील माहीती घेतली जाणार आहे. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
सन २०१८ मध्ये तालुक्यात विक्रमी पाऊस झाला. पावसाळ्यात वेळोवेळी अतिवृष्टीही झाली. यामध्ये पेरणोली व हरपवडे जंगलामध्ये भूस्खलन झाले. जंगलाला तडे गेले होते. आजही येथे भूस्खलनामध्ये गाडलेले गेलेली झाडे व तडे दिसून येतात. या वेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने या भागातील नागरीकांना दक्षता घेण्याची सुचना दिली होती.
भूगर्भशास्त्र विभागाचे पथकानेही येथील परिसराची पहाणी केली होती त्या वेळेपासून पेरणीली, हरपवडे या दोन गावासह पेरणोली पैकी नावलकरवाडी, वझरे पैकी खोतवाडी याकडे सध्या लक्ष केंद्रीत केले जात आहे. यंदाही पावसाळ्यात ही गावे व वास्त्यांवर प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. पोलीस पाटील, सरपंच याना दररोज माहीती देण्याची सुचना करण्यात आली आहे.

आजरा तालुक्यातील वाडया-वस्त्यांवर स्मार्ट मिटरची सक्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पूर्व भागातील सरोळी, प्रमाणे मलिग्रे, सरबंळवाडी, हारूर, गजरगाव, सुळे, लाकूडवाडी या गावात बंद असणा-या घरांचे जूने मिटर तसेच नादुरुस्त मिटर काढून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर जोडण्याचे काम कंपनी चे कर्मचारी करीत असून चाळोबावाडी, येमेकोंड, बोलकेवाडी अशी तालूक्यातील छोटी गावे व वाडी वस्तीवर स्मार्ट मिटर बसवण्याचा सपाटा चालवला आहे. काही गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून लेखी पत्र दिले असले तरी नादूरूस्त मिटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मिटर बसवली जात आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील स्मार्ट मिटरला झालेला विरोध लक्षात घेऊन अदानी कंपनीने आजरा, चंदगड तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे .
पेरणोली येथे आरोग्य शिबिर उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामपंचायत पेरणोली व कमते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटर, गडहिंग्लज यांच्या मार्फत महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमधून पेरणोली येथे सर्व उपचार सुविधेवर मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
सरपंच प्रियांका संतोष जाधव यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन झाले. शिबीरामध्ये गावातील सुमारे १०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
डॉ.हर्षद कमते, डॉ .सरिता कमते, डॉ .आरती कुंभार,श्वेता कुंभार, प्रिती जोशी, कार्तिक आरगुंडी, राहुल मासुले, उपसरपंच संदीप नावलकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरोळी येथे वासरू संगोपन स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरोळी ता.आजरा येथे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ) मार्फत जागतिक दूध दिनानिमित्त वासरू संगोपन स्पर्धेचे आयोजन केले होते . या स्पर्धेमध्ये गावातील भावेश्वरी दूध संस्था , धनलक्ष्मी दूध संस्था, मंगाई देवी दूध संस्था, श्रीकृष्ण दूध संस्था या संस्थेच्या दूध उत्पादक ६० सभासदांनी नोंदणी केली होती त्यापैकी ३५ सभासदांनी भाग घेतला होता. यामध्ये ० ते ६ महिने गटात आणि ६ ते १२ महिने गटात स्पर्धा झाल्या. प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३०००, २०००,१००० व पारितोषक देण्यात आली. यावेळी गोकुळ संघाचे असिस्टंट मॅनेजर डॉ. अविनाश जोशी यांनी वासरू संगोपणाविषयी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ.अक्षय अवताडे (पशुवैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन) व डॉ.पी एम जालकर (पशुवैद्यकीय अधिकारी गोकुळ )यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये दूध उत्पादक रामदास पाटील, रेखा पांडुरंग पाटील, शिवाजी देसाई, यशवंत पाटील, तानाजी पाटील, जयवंत पाटील, बाबासो पाटील, पुंडलिक पाटील, प्रभावती पाटील, सुदाम पाटील हे विजेते ठरले. विजेत्याना आजरा कारखाना संचालक एम. के. देसाई, गणपती पाटील, सागर पाटील, रमेश देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी गावातील सर्व दूध संस्थांचे सचिव,पदाधिकारी ,कर्मचारी, दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त

ना. प्रकाशरावजी आबिटकर कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री कोल्हापूर जिल्हा यांची हरपवडे ग्रामस्थ, सरपंच, सदस्य व देवस्थान कमिटीच्या अध्यक्षा मनीषा गुरव यांनी सदिच्छा भेट घेवून हरपवडे गावातील विविध विकास कामाबाबत चर्चा केली. तसेच श्री रासुबाई देवालयाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी विनंती करण्यात आली. त्यावेळी अशोकअण्णा चराटी,माजी सरपंच गोविंद गुरव, सरपंच सागर पाटील सदस्य संगीता जाधव, नंदाताई गुरव, पूनम पोवार, आनंदा कदम, सरफराज मुल्लाणी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग धाटूबे तसेच देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व गुरव मंडळी उपस्थित होती.

निधन वार्ता
शंकर जाधव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खानापूर ता.आजरा येथील शंकर लक्ष्मण जाधव उर्फ शंकर बुवा ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
वारकरी संप्रदायाची आवड असणारे व गावात शंकर बुवा म्हणुन परिचित असणारे सेवानिवृत्त गिरणी कामगार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी ,सूना, नातवंडे असा परिवार आहे.
सरस्वती यलगार

शिरसंगी ता.आजरा येथील सरस्वती गोपाळ यलगार (वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ज्ञआजरा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक व शिरसंगी रवळनाथ विकास सेवा संस्थेचे चेअरमन मधुकर यलगार यांच्या त्या आई होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पाऊस पाणी
आजरा शहर व परिसरात पावसाचा जोर ओसरला असून बळीराजा शेतीकामात गुंतला आहे. काल दिवसभर पावसाने उघडीप दिली..

फोटो क्लिक



