mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार

दि.६ ऑक्टोबर २०२६

देहदानाचा संकल्प कृतीत उतरविणारे अनंत तिबिले यांचे निधन

उत्तूर : प्रतिनिधी

शेतकरी कुटुंबातून आलेले आणि हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अनंत तिबिले यांनी सव्वा वर्षापूर्वी देहदान व अवयवदानाचा संकल्प केला होता. उत्तूरमध्ये अशा प्रकारचा संकल्प करणारे ते पहिले व्यक्ती ठरले. रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार निधनानंतर त्यांचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे सुपूर्द करण्यात आला.

देहदानाचे पत्र महाविद्यालयाकडे सादर केल्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेला सत्कारही त्यांनी नम्रपणे नाकारला होता. देहदानाबाबत ते परिसरात सातत्याने जनजागृती करीत होते.

मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा, हा त्यांनी घेतलेला निर्णय आता त्यांच्या कृतीतून प्रत्यक्षात आला. देहदानाच्या माध्यमातून समाजोपयोगी विचार रुजविण्याचा त्यांनी दिलेला संदेश परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे .

अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्याचा सांगता समारंभ


आजरा : प्रतिनिधी

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ आण्णा यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम झाला.

मुख्याध्यापक ए. आर. व्हसकोटी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले, यावेळी व्ही. पी. हरेर यांनी काशिनाथ आण्णा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. आजरा महाविद्यालयात झालेल्या अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्यातील निबंध स्पर्धेत आजरा हायस्कूलची अक्षरा सर्जेराव पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला, तिला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील सहभागींनाही प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक एम. एस. गोरे यांचे प्रोत्साहन मिळाले. सूत्रसंचालन सौ.एम. एस. शेलार यांनी तर आभार एस. एस. कुराडे यांनी मानले.

आजरा महाविद्यालयात अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्त तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. उद्घाटक म्हणून जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार होते, तर प्रमुख उपस्थितीत संचालक के. व्ही. येसणे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील होते. आयोजन संयोजिका व्ही. एम. देसाई, सदस्य एस. एस. कुलकर्णी, व्ही. डी. हाक्के, बी. व्ही. गावडे यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम समृद्धी उत्तम वांद्रे – पेरणोली हायस्कूल, द्वितीय संस्कृती रवींद्र गुरव – व्यंकटराव हायस्कूल आजरा, तृतीय अश्विता दत्तात्रय शिमणे – भादवण हायस्कूल, उत्तेजनार्थ आर्या अजित येसादे – आर्दाळ विद्यालय व कस्तुरी शिवाजी भगुत्रे – मलिग्रे हायस्कूल यांनी मिळविला.

निबंध स्पर्धेत प्रथम अक्षरा सर्जेराव पाटील – आजरा हायस्कूल, द्वितीय प्रियांका युवराज सुतार – मडिलगे हायस्कूल, तृतीय स्वराली रमेश वांद्रे – आर्दाळ विद्यालय, उत्तेजनार्थ अन्वया रणजीत देसाई – व्यंकटराव हायस्कूल व श्रुती तुकाराम बापट – वाटंगी हायस्कूल यांनी मिळविला.

वन्यजीव सप्ताहानिमित्त आजरा येथे सापांविषयी जनजागृती कार्यक्रम


आजरा : प्रतिनिधी

वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त वनविभाग आजरा यांच्या वतीने व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे वन्यजीव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम परीक्षेत्र वन अधिकारी आजरा श्री. सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. पाटील होते.

यावेळी प्रमुख वक्ते वन्यजीव अभ्यासक व निसर्ग मार्गदर्शक श्री. विकास माने* यांनी “साप, सापांच्या प्रजाती, समज व गैरसमज” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मानद वन्यजीव रक्षक कोल्हापूर श्री. विजय पाटील यांनी “मानव व वन्यजीव संघर्ष” या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास परीक्षेत्र वन अधिकारी श्री. सचिन सावंत तसेच परिमंडळ वन अधिकारी उत्तर आजरा श्री. कृष्णा डेळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वनपाल उत्तर आजरा श्री. कृष्णा डेळेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्री. शिवाजी पारळे यांनी तर आभार प्रा. श्री. महादेव पाटील यांनी मानले.

यावेळी वनरक्षक श्रीमती प्रियांका पाटील, संगीता राठोड, सरिता बावस्कर, वनसेवक श्री. कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, सुरेश पताडे तसेच वन्यजीव बचाव पथक सदस्य श्री. राहुल गवळी, समीर केरकर, साहिल डेळेकर, विनायक पताडे, अक्षय पाटील आदींसह विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रिफॉर्म-२०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न

आजरा : प्रतिनिधी

आजरा महाविद्यालयात ‘नॅक रिफॉर्म-२०२४’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेस प्रमुख वक्ते न्यू कॉलेज, कोल्हापूरचे नॅक समन्वयक प्रा. डॉ. निलेश पवार उपस्थित होते. त्यांनी नॅक रिफॉर्म-२०२४ अंतर्गत नवीन मूल्यांकन पद्धती, गुणवत्ता निकष, सुधारित दहा विभाग, गुणदान पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, डेटा संकलन व वेबसाइटवर अहवाल-व्हिडीओ अपलोड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रभारी प्राचार्य डॉ. के.जी. पोतदार  यांनी प्राध्यापकांनी आतापासूनच नॅकच्या तयारीला लागावे, असे आवाहन केले.

या कार्यशाळेस कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, समन्वयक प्रा. एस. बी. सावंत , प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एस. कर्पे यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बी. एम. मोहिते यांनी, तांत्रिक सहाय्य प्रा. एस. के. जाधव यांनी तर आभार प्रा. डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी मानले. कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबाबत लेनिनवादी कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रपतींना निवेदन

आजरा : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबाबत मा. राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना आजरा तहसीलदार यांचेमार्फत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) च्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ज्ञानेश कुमार यांच्यावर तात्काळ महाभियोग चालवावा, एसआयआर (SIR) प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, एसआयआर (SIR) सुरू झाल्यापासून झालेल्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात आणि संबंधित राज्यांमध्ये नव्याने निवडणुका घेण्याचा आदेश द्यावा,निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या भावनेचा आदर ठेऊन घटनादुरुस्ती करावी आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजात तटस्थता, पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

यावेळी कॉ. शांताराम पाटील, कॉ. संजय घाटगे, कॉ. काशिनाथ मोरे, कॉ. नारायण राणे, कॉ. नारायण भडांगे, रघुनाथ सातका, गोपाळ गावडे, महादेव होडगे, मगाप्पा कोळी, तुकाराम कासार, मालोजी पाटील, बाबुराव सावंत, शिवाजी सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रह्मांडनायक सहकारी गृहतारण संस्था अध्यक्षपदी श्री. सुधीर सरदेसाई, उपाध्यक्षपदी संतोष भाटले.

आजरा : प्रतिनिधी

ब्रह्मांडनायक सहकारी गृहतारण संस्था मर्या,आजरा या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. सुधीर सरदेसाई यांची तर उपाध्यक्षपदी श्री. संतोष भाटले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जे. एन. बंडगर निवड सभेत अध्यक्षस्थानी होते.

या वेळी संतोष डोंगरे, रोहन पाटील, पांडुरंग सावंत, संतोष जाधव, सौ. भारती डेळेकर, सौ. धनश्री देसाई , संतोष जाधव, संकेत डाफळे, अंजली सुतार आदी उपस्थित होते. तसेच सचिव प्रविण हळवणकर यांनी आभार मानले.

आज गणराया पुरस्कार वितरण सोहळा व नवरात्रौत्सव  शांतता बैठक

आजरा : प्रतिनिधी

नवरात्र उत्सव शांतता मीटिंग व गणराया पुरस्कार २०२६ चे आज मंगळवार दि.६ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसील कार्यालय आजरा येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

गणराया पुरस्कार वितरण सोहळा व नवरात्र उत्सव सण शांतता बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी केले आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ६ ऑक्टोबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : एकादशी तिथी (७ ऑक्टोबर रात्री १२.३४ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (रात्री १०.१७ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : सिद्ध योग (सकाळी ०७.१९ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : भाव करण (दुपारी ०१.१९ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कर्क राशी (रात्री १०.१७ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.२४ ते सायंकाळी ०४.५३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०३ ते दुपारी १२.५०
सूर्योदय : सकाळी ०६.३१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: ,१९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी अनिकेत चराटी… तालुका कोरोना अपडेट्स

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

mrityunjay mahanews
error: Content is protected !!